नवयुवकांनो ! मतदार नोंदणी करुन मतदानाचा हक्क पार पाडा-जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस.

0
5
????????????????????????????????????
  • 14 वा राष्ट्रीय मतदार दिवस उत्साहात साजरा
  • मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांचा सत्कार

वाशिम, दि. 25 : जिल्हयातील वर्ष पुर्ण केलेल्या नवयुवकांनी मतदार नोंदणी पूर्ण करुन राष्ट्रहिताच्या दृष्टीने मतदानाचा हक्क पार पाडावा. जिल्हयातील काही नवमतदारांनी अद्यापही मतदार नोंदणी केलेली नाही. अशा नवयुवकांनी नोंदणी करुन मतदान प्रक्रियेत सहभागी होणे गरजेचे आहे. जिल्हयात व्हीव्हीपॅटच्या माध्यमातून मतदानात सहभागी होण्यासाठी जनजागृती व प्रचार प्रसार करण्यात येत आहे. सुदृढ लोकशाही प्रक्रियेसाठी तरुणांनी मतदान प्रक्रियेत सहभाग नोंदविणे आवश्यक असल्याचे मत जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी बुवनेश्वरी एस. यांनी व्यक्त केले.

आज २५ जानेवारी रोजी १४ व्या राष्ट्रीय मतदार दिवसानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील नियोजन भवन सभागृहात जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने आयोजित कार्यक्रमात श्रीमती बुवनेश्वरी एस.अध्यक्षस्थानावरुन बोलत होत्या. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे व उपजिल्हा निवडणूक अधिकारी कैलास देवरे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.

श्रीमती बुवनेश्वरी पुढे म्हणाल्या, जिल्हयात मतदार नोंदणी आणि मतदार जनजागृतीचे काम मागील सहा महिन्यापासून प्रभावीपणे करण्यात येत आहे. या कामाची दखल घेऊन राज्य निवडणूक आयोगाने जिल्हयाला यावर्षी देखील सन्मानित केले आहे. नवीन मतदारांनी मतदार नोंदणी केल्यामुळे त्यांना मतदार ओळखपत्र देण्यात येत आहे. मतदार जनजागृती करण्यात येत असल्यामुळे भविष्यात नवीन मतदार देखील वेळीच मतदार नोंदणी करुन मतदार ओळखपत्र प्राप्त करुन घेतील आणि आगामी निवडणूकीत ते मतदानाचा हक्क बजावतील. त्यामुळे मतदानाची टक्केवारी वाढेल. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन आता इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशिन अर्थात इव्हीएमच्या माध्यमातून मतदान करण्यात येत आहे. जिल्हयात मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांनी मतदार नोंदणीत चांगले काम केल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

प्रास्ताविकातून श्री.देवरे म्हणाले, लोकशाहीचा मूळ पाया मतदार आहे.जगातील सर्वात मोठी लोकशाही म्हणून भारत देशाकडे बघितले जाते. याचा आपण सार्थ अभिमान बाळगला पाहिजे. २५ जानेवारी १९५० रोजी भारत निवडणूक आयोगाची स्थापना झाली. आयोगाचा हा स्थापना दिवस २०११ पासून दरवर्षी देशात राष्ट्रीय मतदार दिवस म्हणुन साजरा करण्यात येतो. हा दिवस साजरा करण्यामागचा उद्देश हा विशेषत: नवमतदारांना मतदार यादीत नाव नोंदणीसाठी प्रोत्साहन देणे व सुलभरित्या त्यांची नांव नोंदणी करुन घेणे हा आहे. केंद्रस्तरीय नोंदणी अधिकारी यांनी घरोघरी जाऊन जनजागृती करुन नावनोंदणी वाढविण्यासाठी राष्ट्रहिताच्या दृष्टीने महत्वाचे कार्य केले असल्याचे त्यांनी यावेळी म्हणाले.

यावेळी मतदार नोंदणीमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या मतदान केंद्रस्तरीय अधिकारी व पर्यवेक्षक यांचा सत्कार करण्यात आला. यामध्ये रिसोड तालुक्यातील एस.डी.जावळे, अम्रपाली पठाडे,दिलीप पवार,राजेंद्र गिरी.मालेगांव तालुक्यातील मनोज वाजुंळकर, संजय सुरेकर, सचिन भटकर, उत्तम आरु. वाशिम तालुक्यातील आशा आदबाणे,  ज्ञानेश्वर ढेंगळे, राधेश्याम महाले,छाया भगत. मंगरुळपीर तालुक्यातील एस.व्ही.राईकर, धीरज चव्हाण, उमेश पाचे, अश्विनी भगत. कारंजा तालुक्यातील गोपाल खाडे, अल्ताफ पटेल, योगेश घोडसाळ, निशांत कचरे व मानोरा तालुक्यातील अशोक भंडारे, अर्चना बैकरे, विनोद नांदे व विशाल उंदरे यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

चित्रकला स्पर्धेत प्रथम क्रमांक भुमिका ठवकर, व्दितीय क्रमांक चंचल ठाकूर, तृतीय क्रमांक अक्षरा गोणेकर व प्रोत्साहनपर कृष्णा मुसळे, पायल धनगर आणि निबंध स्पर्धेत प्रथम क्रमांक आरुषी घोडके, व्दितीय क्रमांक खुशी वाढवे, तृतीय क्रमांक शिवाणी भुतकर व प्रोत्साहनपर सार्थक पांडे, समर्थ विभुते यांनासुध्दा सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

यावेळी प्रातिनिधीक स्वरुपात नवमतदारांना मतदार ओळखपत्र देण्यात आले. सभागृहात उपस्थितांनी राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त प्रतिज्ञा वाचन केले. शाहिर विलास भालेराव व त्यांच्या सहकारी कलावंतांनी मतदार प्रबोधन गीत सादर केले. बाकलीवाल विद्यालयाच्या राष्ट्रीय छात्र सेनेच्या विद्यार्थ्यांनी मतदार जनजागृतीबाबत पथनाटय सादर केले. मतदार जनजागृतीविषयक विविध चित्रफिती दाखविण्यात आल्या. कार्यक्रमाला बाकलीवाल विद्यालयाचे शिक्षक अमोल काळे, जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी-कर्मचारी, मतदान केंद्रस्तरीय अधिकारी व पर्यवेक्षक यांची मोठया संख्येने उपस्थिती होती. कार्यक्रमाचे संचालन जिल्हा आपत्ती व व्यवस्थापन अधिकारी शाहू भगत यांनी केले. उपस्थितांचे आभार नायब तहसिलदार सतिश काळे यांनी मानले.

मतदार जनजागृती रॅली उत्साहात

प्रारंभी मतदारांमध्ये मतदानाविषयी जनजागृती करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातून रॅली काढण्यात आली. या रॅलीला अपर जिल्हाधिकारी शहाजी पवार यांनी हिरवा झेंडा दाखवून मार्गस्थ केले. ही रॅली तहसिल कार्यालय,डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, पाटणी चौक, सिंधी कॅम्प, अकोला नाका येथून जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचून रॅलीचा समारोप करण्यात आला. रॅलीमध्ये बाकलीवाल विद्यालयाच्या राष्ट्रीय छात्र सेनेचे विद्यार्थी, नगर परिषद महात्मा गांधी शाळेचे विद्यार्थी व जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले.