एकाच दिवशी 4 प्राथमिक आरोग्य केंद्राचे लोकार्पण

0
12
वाढदिवसाच्या शुभेच्छा

नागरिकांना आरोग्याच्या दर्जेदार सेवा उपलब्ध करुन द्या- पालकमंत्री धर्मरावबाबा आत्राम

गोंदिया,दि.26 : सडक अर्जुनी तालुका हा डोंगराळ व नक्षलग्रस्त भागाच्या जलद विकासाकरीता विशेष कृती कार्यक्रमांतर्गत लोकसंख्या व अंतर निकषाचे विचारात घेऊन या तालुक्यात प्राथमिक आरोग्य केंद्र स्थापन करण्यात आलेले आहे. चार दुर्गम भागातील नविन प्राथमिक आरोग्य केंद्र स्थापन झाल्यामुळे जिल्ह्यातील आरोग्य सेवा नागरिकांना नियमितपणे दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध करुन देण्याचे प्रतिपादन अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी केले.

        सडक अर्जुनी तालुक्यातील चिखली येथे नविन प्राथमिक आरोग्य केंद्र इमारतीचे प्रत्यक्ष उद्घाटन तसेच देवरी तालुक्यातील पालांदूर/जमी येथील प्राथमिक आरोग्य केंद्र, सालेकसा तालुक्यातील गोर्रे येथील प्राथमिक आरोग्य केंद्र व अर्जुनी मोरगाव तालुक्यातील इळदा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे ई-लोकार्पण करण्यात आले, त्यावेळी श्री. आत्राम बोलत होते.पालकमंत्री धर्मरावबाबा आत्राम यांच्या हस्ते घोगरा घाट पुलाचे लोकार्पण, खोडशिवनी नदीवरील पुलाचे लोकार्पण, म्हसवाणी नदीवरील पुलाचे लोकार्पण व घोटी घटेगाव मुंडीपार रस्त्यावरील पुलाचे लोकार्पण करण्यात आले.

        कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार मनोहर चंद्रिकापुरे हे होते. जि.प.उपाध्यक्ष यशवंत गणवीर, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल पाटील, पं.स.सभापती सडक अर्जुनी संगीता खोब्रागडे, जि.प. सदस्य कविता रंगारी, पं.स.सदस्य सडक अर्जुनी चेतन वडगाये, शिवाजी गहाणे, सपना नाईक, सरपंच चिखली चित्रा भेंडारकर, उपसरपंच अनिल बोरकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नितीन वानखेडे, उपविभागीय पोलीस अधिकारी संकेत देवळेकर, तालुका वैद्यकीय अधिकारी सडक अर्जुनी डॉ. नितीन कापसे, गटविकास अधिकारी सडक अर्जुनी रविकांत सानप यांची यावेळी प्रामुख्याने उपस्थिती होती.

       पालकमंत्री श्री. आत्राम म्हणाले, ग्रामीण क्षेत्रातील नागरिकांचे आरोग्य बळकटीकरणा अंतर्गत सदर चार प्राथमिक आरोग्य केंद्राच्या माध्यमातून आरोग्य विषयक व इतर सोयी-सवलती उपलब्ध करुन देता येतील. ग्रामीण भागातील माता व बालमृत्यू दर कमी करण्यास या माध्यमातून बरीच मदत होणार असून या मागास क्षेत्रातील लोकांची आरोग्य विषयक होणारी गैरसोय व पायपीट दूर होण्यास मदत होणार आहे.

      ग्रामीण भागातील नक्षलगस्त क्षेत्रातील नागरिकांना आरोग्याच्या चांगल्या सुविधा मिळण्यासाठी सडक अर्जुनी तालुक्यातील चिखली येथील प्राथमिक आरोग्य केंद्र इमारतीचे 3 कोटी 82 लक्ष रुपये खर्च करुन बांधकाम करण्यात आले. देवरी तालुक्यातील पालांदूर/जमी प्राथमिक आरोग्य केंद्र इमारतीचे 4 कोटी 22 लक्ष रुपये खर्च करुन बांधकाम करण्यात आले. सालेकसा तालुक्यातील गोर्रे प्राथमिक आरोग्य केंद्र इमारतीचे 4 कोटी 92 लक्ष रुपये खर्च करुन बांधकाम करण्यात आले व अर्जुनी मोरगाव तालुक्यातील इळदा प्राथमिक आरोग्य केंद्र इमारतीचे 6 कोटी 23 लक्ष रुपये खर्च करुन बांधकाम करण्यात आले. सदर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेला आरोग्याच्या चांगल्या सुविधा उपलब्ध होणार आहेत.

       शिक्षण, आरोग्य व सिंचनाची सुविधा निर्माण करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या 2515 च्या माध्यमातून या क्षेत्रातील आमदारांनी विशेष लक्ष देवून कामे करुन घ्यावी. राज्य शासनाने महिलांना एसटी प्रवासात 50 टक्के सवलत दिलेली आहे याचा जिल्ह्यातील महिलांनी लाभ घ्यावा. महिला सशक्तीकरण करण्याचे काम राज्य शासनाद्वारे करण्यात येत आहे. महिला आर्थिक विकास महामंडळामार्फत महिला बचतगट तसेच उमेदच्या माध्यमातून महिलांना रोजगार मिळण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील आहे. चिखली, पालांदूर/जमी, गोर्रे व इळदा या प्राथमिक आरोग्य केंद्र इमारतीच्या माध्यमातून या परिसरातील नागरिकांनी आरोग्य सेवेचा लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

      आमदार मनोहर चंद्रिकापुरे म्हणाले, शेतकऱ्यांना 8 तास ऐवजी 12 तास विजेचा पुरवठा झाला पाहिजे, तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रात मनुष्यबळ वाढविण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी यावेळी आश्वासीत केले.

       यशवंत गणवीर म्हणाले, गोंदिया जिल्हा हा नक्षलग्रस्त असून डोंगराळ भाग आहे. जिल्ह्यातील मुख्य व्यवसाय शेती आहे. आज चिखली, पालांदूर/जमी, गोर्रे व इळदा या प्राथमिक आरोग्य केंद्र इमारतीचे लोकार्पण करण्यात आल्यामुळे या परिसरातील नागरिकांसाठी मंगलमय दिवस आहे. जिल्ह्यात शिक्षकांची पदे रिक्त असल्यामुळे पदभरती करणे आवश्यक आहे. सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये मनुष्यबळ कमी असल्यामुळे आरोग्याच्या बळकटीकरणा करीता रिक्त पदे भरण्यात यावे. या परिसरातील नागरिकांना आरोग्याच्या सुविधा देण्यासाठी तसेच औषधांचा पुरवठा करण्यासाठी त्याचप्रमाणे प्राथमिक आरोग्य केंद्रात संगणक व इतर बाबींची सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी जिल्हा नियोजन समिती मधून निधीची उपलब्धता करुन द्यावी अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.

       अनिल पाटील म्हणाले, गेल्या तीन वर्षापासून सदर इमारतीच्या लोकार्पणाचे उद्घाटन न झाल्यामुळे या परिसरातील नागरिक आरोग्याच्या सुविधेपासून वंचित होत होते. आता चिखली, पालांदूर/जमी, गोर्रे व इळदा या प्राथमिक आरोग्य केंद्र इमारतीचे लोकार्पण झाल्यामुळे या परिसरातील नागरिकांना या माध्यमातून उत्तम आरोग्याच्या सुविधा मिळणार आहेत, त्यामुळे जनतेनी आरोग्य सुविधांचा लाभ घेण्याचे आवाहन केले. प्राथमिक आरोग्य केंद्राची मान्यता मंजूर झाल्यानंतर निधी मंजूर करतांना मनुष्यबळ पदासह व इतर बाबींची आर्थिक तरतुदीनुसार निधी मंजूर करण्यात यावा असे त्यांनी यावेळी सांगितले.

       यावेळी जि.प.सदस्य कविता रंगारी व सरपंच चिखली चित्रा भेंडारकर यांनीही आपले मनोगत व्यक्त करतांना चिखली गावाचा आरोग्याचा प्रश्न निकाली काढल्याबद्दल पालकमंत्र्यांचे व आरोग्य प्रशासनाचे आभार मानले.

       कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नितीन वानखेडे यांनी केले. सुत्रसंचालन आरोग्य सहायक सेवक मेश्राम यांनी केले तर उपस्थितांचे आभार तालुका वैद्यकीय अधिकारी सडक अर्जुनी डॉ. नितीन कापसे यांनी मानले. कार्यक्रमास लगतच्या गावातील सरपंच व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.