. राष्ट्रीय जंतनाशक दिन 13 फेब्रुवारीला
गोंदिया, दि.31 : जिल्हयात आमगाव, सालेकसा, देवरी व सडक अर्जुनी या चार तालुक्यात १३ फेब्रुवारी हा राष्ट्रीय जंतनाशक दिन राबविण्यात येणार आहे. राष्ट्रीय जंतनाशक दिनानिमित्त आरोग्य विभागामार्फत 1 ते 19 वर्षे वयोगटातील लाभार्थ्यांना 13 फेब्रुवारी 2024 रोजी एकुण 1 लाख 11 हजार 186 बालकांना जंतनाशक गोळया देण्यात येणार असल्याची माहिती डॉ. वेदप्रकाश चौरागडे व डॉ. रोशन राऊत यांनी पत्रकार परिषदेत दिली.
जागतिक आरोग्य संघटनेच्या संशोधनानुसार भारतात 1 ते 19 वर्षे वयोगटातील 68 टक्के बालकांमध्ये कृमी दोष (जंतदोष) आढळुन येतो. तसेच 15 ते 19 वर्षे वयोगटातील 56 टक्के किशोरवयीन मुलींमध्ये व 30 टक्के किशोरवयीन मुलांमध्ये रक्तक्षय आढळतो.
जिल्हयात 13 फेब्रुवारी 2024 रोजी ही मोहिम आमगाव, सालेकसा, देवरी व सडक अर्जुनी या चार तालुक्यातील 776 अंगणवाडी केंद्र, 664 शाळेमध्ये राबविण्यात येणार आहे. या मोहिमेमध्ये एकुण 1 लाख 11 हजार 186 बालकांना जंतनाशक गोळी देण्याचे उद्दिष्ट ठरविण्यात आले आहे. राष्ट्रीय जंतनाशक दिनानिमित्त 1 ते 19 या वयोगटातील बालकांना व किशोरवयीन मुला-मुलींना अंगणवाडी व शाळास्तरावर जंतनाशक गोळी देण्यात येईल.
ज्या मुलांनी 13 फेब्रुवारी 2024 रोजी गोळी खाल्ली नसेल त्यांना मॉप अप दिन 20 फेब्रुवारी 2024 रोजी जंतनाशकाची गोळी देण्यात येणार आहे. राष्ट्रीय जंतनाशक दिनाचा उद्देश हा 1 ते 19 वर्षे वयोगटातील सर्व मुला-मुलींना शाळा व अंगणवाडी केंद्र स्तरावर जंतनाशक गोळी देऊन त्यांचे आरोग्य चांगले ठेवणे, पोषण स्थिती, शिक्षण व जीवनाचा दर्जा उंचावणे हा आहे.
13 फेब्रुवारी 2024 राष्ट्रीय जंतनाशक दिन ही मोहिमेची तारीख असून 20 फेब्रुवारी 2024 मॉप अप दिन असणार आहे. 1 ते 19 वर्षे वयोगटातील बालक व किशोरवयीन मुले-मुली लाभार्थी असून सोबतच्या संस्थांमार्फत मोहिम राबविण्यात येणार आहे. सर्व शासकिय शाळा/शासकीय अनुदानित शाळा/आश्रम शाळा/महानगरपालिका शाळा, सर्व खाजगी अनुदानित शाळा, सर्व खाजगी विनाअनुदानित शाळा, आर्मी स्कुल, सी.बी.एस.ई. स्कूल, नवोदय विद्यालय, सुधार गृह, सर्व खाजगी इंग्रजी माध्यमिक शाळा, मदरसे, मिशनरी स्कूल, गुरुकूल, संस्कार केंद्रे, सर्व कनिष्ठ महाविद्यालय व वरिष्ठ महाविद्यालयाचे प्रथम वर्षाचे विद्यार्थी (नर्सिंग कॉलेज, आय.टी.आय., पॉलिटेक्नीक, इंजिनिअरिंग, कला, वाणिज्य व विज्ञान, फार्मसी महाविद्यालय, डी.एड. महाविद्यालय इत्यादी) सर्व ग्रामीण व शहरी अंगणवाडी व मिनी अंगणवाडी केंद्रे यामध्ये मोहीम राबविण्यात येणार आहे अशी माहिती त्यांनी दिली.