गोंदिया, दि.01 : राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमांतर्गत टीबी मुक्त ग्रामपंचायत कार्यक्रम राबविण्याबाबत सेंट्रल टीबी डिव्हिजन कडील मार्गदर्शक सुचनेनुसार जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतीची टीबी मुक्त ग्रामपंचायत उपक्रमांतर्गत नामांकनाच्या दाव्याच्या पात्रतेसाठी आवश्यक असणाऱ्या 6 निर्देशकांची जानेवारी ते डिसेंबर 2023 या कालावधीतील माहिती अद्ययावत करावी. जसे की, दर हजारी 30 संशयीत क्षयरुग्ण तपासणी करणे. टीबी नोटीफिकेशन रेट 0 ते 1 असणे अपेक्षीत आहे. ट्रिटमेंट सक्सेस रेट हा 90 टक्के पेक्षा जास्त असणे आवश्यक आहे. ड्रग सस्पेक्टीबीलिटी रेट 60 टक्के होणे आवश्यक आहे. निक्षय पोषण योजना 100 टक्के आवश्यक आहे. सर्व क्षयरुग्णांना फुट बास्केट 100 टक्के मिळणे आवश्यक आहे.
अशाप्रकारे टीबी मुक्त ग्रामपंचायतीची उपक्रमांतर्गत नामांकनाच्या दाव्यासाठी 6 निर्देशांकानुसार पात्र होणाऱ्या जिल्ह्यातील ग्रामपंचायतीची तालुका निहाय यादी तयार झालेली आहे. त्यामध्ये गोंदिया तालुका- 22 ग्रामपंचायत, गोरेगाव तालुका- 10 ग्रामपंचायत, आमगाव तालुका- 12 ग्रामपंचायत, सालेकसा तालुका- 7 ग्रामपंचायत, सडक अर्जुनी तालुका- 13 ग्रामपंचायत, अर्जुनी मोरगाव तालुका- 12 ग्रामपंचायत, देवरी तालुका- 10 ग्रामपंचायत, तिरोडा तालुका- 12 ग्रामपंचायत. अशा एकूण 98 ग्रामपंचायत टीबी मुक्त होण्यासाठी नामांकन दाखल केलेले आहेत.
त्यासाठी जिल्हास्तरावर समिती गठीत करण्यात आलेली आहे. त्यामध्ये जिल्हा आरोग्य अधिकारी- अध्यक्ष, जिल्हा क्षयरोग अधिकारी- सचिव, त्याचबरोबर उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत)- सदस्य, सर्व तालुका आरोग्य अधिकारी, आयएमएचे सचिव, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथील प्राध्यापक व औषध वैद्यकशास्त्र, निवासी वैद्यकीय अधिकारी केटीएस सामान्य रुग्णालय व वैद्यकीय अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्र हे सर्व सदस्य जिल्हास्तरावर टीबी मुक्त ग्रामपंचायत उपक्रम राबविण्याकरीता पडताळणी समिती गठीत करण्यात आलेली आहे.
त्याचबरोबर तालुका स्तरावर टीबी मुक्त ग्रामपंचायत उपक्रम राबविण्याकरीता तालुकास्तरीय पडताळणी समिती गठीत करण्यात आलेली आहे. त्यामध्ये गटविकास अधिकारी- अध्यक्ष व तालुका आरोग्य अधिकारी हे सचिव व विस्तार अधिकारी (आरोग्य), विस्तार अधिकारी (पंचायत) व वैद्यकीय अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्र हे सदस्य असणार आहेत.
सदर मोहिम ही 10 मार्च 2024 पर्यंत पुर्ण करुन 24 मार्च जागतिक क्षयरोग दिनानिमीत्त प्रमाणपत्र व प्रथम पुरस्कार- गोल्ड मेडल, द्वितीय पुरस्कार- सिल्व्हर मेडल आणि तृतीय पुरस्कार ब्राँझ मेडल देण्यात येणार आहे. जिल्ह्यात एकूण 547 ग्रामपंचायत आहेत व टीबी मुक्त ग्रामपंचायत मोहिमेअंतर्गत सर्व ग्रामपंचायतीचा सहभाग घेण्यात येणार असून सदर मोहिम सलग तीन वर्षे राबविण्यात येणार आहे. अशी माहिती जिल्हा क्षयरोग अधिकारी, गोंदिया यांनी दिली आहे.