व्यक्तीमत्व घडविण्याचे काम पुस्तकेच करतात – श्याम पेठकर

0
18

 ग्रंथोत्सवाचे थाटात उद्घाटन

       गोंदिया, दि.9 : ग्रंथोत्सवाच्या माध्यमातून वाचन संस्कृतीला चालना मिळते. वाचन संस्कृती वृध्दींगत होण्यासाठी हा उपक्रम उपयुक्तच आहे. पुस्तके वाचल्याने आपल्या ज्ञानात भर पडते, आपले विचार प्रगल्भ होतात. महापुरुषांची पुस्तके वाचली तर त्यामधून आपल्याला प्रेरणा मिळते. ज्ञान प्राप्ती सोबतच व्यक्तीमत्व घडविण्याचे काम पुस्तकेच करतात, असे मत साहित्यिक व चित्रपट लेखक श्याम पेठकर यांनी व्यक्त केले.

          श्री शारदा वाचनालय गोंदिया येथे आयोजित गोंदिया ग्रंथोत्सवाच्या उदघाटन प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघाचे अध्यक्ष डॉ. गजानन कोटेवार हे होते. सहायक ग्रंथालय संचालक रत्नाकर नलावडे, जिल्हा माहिती अधिकारी रवी गिते, जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष शिवकुमार शर्मा, श्री शारदा वाचनालयाचे ट्रस्ट बोर्ड अध्यक्ष गोविंद बजाज व जिल्हा ग्रंथालय अधिकारी मिनाक्षी कांबळे यांची यावेळी प्रामुख्याने उपस्थिती होती.

         श्याम पेठकर म्हणाले, ग्रंथोत्सवाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील जनतेला यामुळे पुस्तके उपलब्ध होण्यास मदत होणार  आहे. विद्यार्थ्यांचे करियर घडविण्याचे काम पुस्तके करतात. आपण महापुरुषांची पुस्तके वाचली पाहिजे. पुस्तके वाचल्याने आपली विश्लेषणात्मक तर्कशक्ती सुधारते. तुम्ही जितके जास्त पुस्तके वाचाल तितकी तुमची कल्पनाशक्ती विस्तारित होईल. पुस्तके वाचल्याने एकाग्रता वाढते. वाचन केवळ तुम्हाला हुशार बनवते असे नाही तर वयानुसार प्रगल्भ आणि विश्लेषणात्मक बनवते. पुस्तके ही जोडीदारा प्रमाणेच आपल्या जीवनाचा अभिभाज्य भाग आहे. पुस्तके वाचल्याने स्मरणशक्ती तर सुधारतेच सोबतच एखाद्या गोष्टीवर लक्ष केंद्रीत करण्याची क्षमताही वाढते असे ते म्हणाले. शब्द कुठे वापरायचे, शब्द कसे वापरायचे याकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे. कारण शब्द इकडे तिकडे झाले की, खुपच गडबड होत असते. गाडगेबाबा अडानी असले तरी गाडगेबाबांनी आपल्याला आयुष्याचे तत्वज्ञान शिकविले. ज्ञानेश्वरी, तुकारामांची गाथा वाचली पाहिजे. आज समाजमाध्यमांच्या माध्यमातून जग खुपच पुढे गेले आहे. मोबाईलमुळे आता पुस्तकांचा आणि आपला संबंध दुरावल्यासारखे वाटत आहे. आपले जीवन जगण्याची साधने काय आहेत हे आपल्याला समजले पाहिजे. सकारात्मक विचार करण्याची आपल्यात शक्ती असायला पाहिजे. असे कां ? या प्रश्नाचे उत्तर सापडल्यावरच आपल्या ज्ञानाची सुरुवात होते. आपण नेहमी जागृत असलो पाहिजे. पुस्तके आपल्यात समज निर्माण करतात, ती वाढविण्यासाठी शक्ती देतात. स्वलिखित ‘तेरवं’ नावाचे चित्रपट 8 मार्च 2024 रोजी सगळीकडे प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट सर्वांनी आवर्जुन पहावे. आपली उन्नती करायची असेल तर सुरुवात आपल्यापासूनच करावी. ग्रंथांमध्ये व पुस्तकांमध्ये प्रेरणा असते. छोटी छोटी पुस्तके वाचायला सुरुवात करा असे त्यांनी यावेळी सांगितले.

          कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरुन मनोगत व्यक्त करतांना डॉ. गजानन कोटेवार म्हणाले, प्रत्येकाने सकारात्मक विचार केला तर वाचनाने जगण्याचा मार्ग सुकर होतो. डॉ. बाबासाहेबांचे विचार स्मरणात ठेवावे. विद्यार्थ्यांनी वेळेचे नियोजन केले पाहिजे. प्रतिकुल परिस्थितीतून यश संपादन करुन आपल्या आई-वडिलांचे नावलौकीक करा. आपल्या लेखनीमध्ये जबरदस्त शक्ती असते. ग्रंथोत्सवाचे आयोजन लाख मोलाचे आहे. ग्रामीण भागात सार्वजनिक वाचनालयाच्या माध्यमातून विद्यार्थी व नागरिक समृध्द होत आहेत. वाचन चळवळीला चालना मिळावी याकडे वरिष्ठ स्तरावर प्रयत्न करण्याची गरज आहे. ग्रंथालय चळवळीला समृध्द करता आले पाहिजे, त्यासाठी ग्रंथालय बळकटीकरणाकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे. या सभागृहात गर्दी कमी असली तरी उपस्थित असलेले नागरिक दर्दी आहेत याचा मला अभिमान आहे असे त्यांनी सांगितले.

          रवी गिते यांनी सांगितले की, वाचन संस्कृती वाढावी, वाचन संस्कृती जोपासली जावी यासाठी दरवर्षी जिल्ह्यात ग्रंथोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. महापुरुषांचे ग्रंथ वाचावे व त्यांचे अनुकरण करण्याचे प्रयत्न करावे. पुस्तके वाचल्याने आपले विचार प्रगल्भ होत असतात. पुस्तके वाचन केल्याने आपल्या विचारांच्या कक्षा रुंदावतात. ‘भारताचे संविधान’ हा ग्रंथ सर्वांनी वाचला पाहिजे. प्रत्येकाच्या घरात ‘भारताचे संविधान’ हा ग्रंथ असायला पाहिजे. कर्तृत्वाने मोठे व्हायचे असेल तर अवांतर पुस्तके वाचा व वाचनाने मोठे व्हा. प्रत्येकाने आठवड्यातून एकतरी पुस्तक वाचावे असे त्यांनी सांगितले.

         कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा ग्रंथालय अधिकारी मिनाक्षी कांबळे यांनी केले. प्रास्ताविकातून त्यांनी सांगितले की, ग्रामीण भागातील लोकांमध्ये वाचन संस्कृतीत वाढ व्हावी तसेच पुस्तके वाचनाची सवय लागावी. कारण महापुरुषांची पुस्तके वाचल्याने त्यांच्याकडून आपल्याला जगण्याची प्रेरणा मिळते. प्रत्येक वाचकाला ग्रंथ मिळाला पाहिजे तसेच ग्रंथाला वाचक मिळाले पाहिजे यासाठी दरवर्षी ग्रंथोत्सवाचे आयोजन करण्यात येते असे त्या म्हणाल्या.

         गोविंद बजाज म्हणाले, गोंदिया जिल्ह्याला मध्यप्रदेश व छत्तीसगड राज्याच्या सीमा लागलेल्या आहेत. त्यामुळे या जिल्ह्यात हिंदी भाषिक लोकं जास्त प्रमाणात आहेत. वाचन संस्कृतीत वाढ व्हावी, तसेच वाचन संस्कृतीला चालना मिळावी यासाठी जिल्ह्यातील नागरिकांनी ग्रंथोत्सवाचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

         कार्यक्रमाचे सुत्रसंचालन अभय बिसेन यांनी केले. कार्यक्रमास जिल्हा ग्रंथालय संघाचे सचिव डी.डी.रहांगडाले, तांत्रिक निरीक्षक रत्नरक्षीत शेंडे, अंकुश कटरे, सार्वजनिक ग्रंथालयाचे पदाधिकारी, कर्मचारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांचे आभार ग्रंथालय निरीक्षक अस्मिता मंडपे यांनी मानले.