शिवजयंती निमित्त जय जिजाऊ जय शिवरायचा निनाद चंद्रपूर शहरात

0
3

मनपाच्या वेशभूषा स्पर्धेस उत्स्फुर्त प्रतिसाद

चंद्रपूर १९ फेब्रुवारी –  छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त हजारो शिवराय,माँ जिजाऊ व मावळे शहरात अवतरल्याचे दृश्य काल चंद्रपूरकरांना पाहावयास मिळाले. चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे छ.शिवाजी महाराज व राजमाता जिजाऊ यांच्यावर आधारीत वेशभूषा स्पर्धा शालेय विद्यार्थ्यांसाठी सकाळी ९ वाजता आयोजीत करण्यात आली होती. यात सहभागी विद्यार्थ्यांनी या विविध वेशभूषेसह कार्यक्रमात उपस्थीत राहुन शिवकालीन इतिहासाला उजाळा दिला.
शिवजयंती उत्सवाची सुरवात गिरनार चौक येथे आयोजीत मोठ्या कार्यक्रमात मा.पालकमंत्री श्री.सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते राज्यगीताच्या फलकाचे अनावरण करून करण्यात आली. याप्रसंगी बोलतांना मा. पालकमंत्री यांनी छ.शिवरायांची प्रेरणा अक्षय ऊर्जेचा स्रोत असल्याचे सांगितले.शिवजयंती उत्सव एक दिवसाचा असला तरी महाराजांच्या विचारांची प्रेरणा ही अनंत आहे.महाराजांनी बांधलेले अभेद्य गडकिल्ले हे स्थापत्य कलेचे अप्रतिम उदाहरण आहे,हे युनेस्कोच्या माध्यमातुन जगासमोर आणण्याचा प्रयत्न करणार असुन लवकरच शिवकालीन सैनिकांचे शस्त्र दांडपट्टा आता राज्यशस्त्र म्हणुन ओळखले जाणार आहे.
अठरापगड जातीं,धर्मांतील लोकांना महाराजांनी समान मानले,त्याच विचारांना धरून महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारणे,गडकिल्यांचे अतिक्रमण हटविणे,महात्मा फुले यांच्या वंशजांस न्याय देण्याचा विषय, बाबुराव शेडमाके व संताजी महाराज यांच्यावर पोस्ट तिकीट काढण्याचा विषय असो वा   सिंदखेडराजासाठी ४०० कोटी रुपयांचा विकास आराखडा करण्याचा विषय असो असे विविध कामे करण्याचे सौभाग्य मला लाभत आहे त्याबद्दल धन्यवाद मानत असल्याचे मा.पालकमंत्री यांनी याप्रसंगी सांगितले.
गिरनार चौक ते गांधी चौक येथील रस्त्यांवर शिवराय,माँ जिजाऊ व मावळे यांची वेशभूषा करून हजारो विद्यार्थी शाळानिहाय उभे असल्याने रस्ते शिवकालीन झाल्याचे दिसुन येत होते.यातील उत्कृष्ट वेशभूषा केलेले विद्यार्थी हे मनपा पार्कींग जवळील कार्यक्रम स्थळी आले व त्यांना मा.पालकमंत्री यांच्या हस्ते अँड्रॉइड टॅब,सायकल,ट्रॉली बॅग अश्या स्वरूपाची बक्षिसे देण्यात आली. सहभागी प्रत्येक शाळेला स्कुल बॅग,वॉटर बॉटल,कंपास या स्वरूपाची ३ बक्षिसे सुद्धा दिली गेली त्याचप्रमाणे प्रत्येक सहभागी विद्यार्थ्याला प्रोत्साहनपर बक्षीससुद्धा देण्यात आले.कार्यक्रमात जवळपास १५०० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.
याप्रसंगी जिल्हाधिकारी विनय गौडा, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन, पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन,मनपा आयुक्त विपीन पालीवाल,निवासी उपजिल्हाधिकारी संजय पवार,तहसीलदार विजय पवार,अतिरिक्त आयुक्त चंदन पाटील,उपायुक्त मंगेश खवले,उपायुक्त अशोक गराटे      राहुल पावडे,डॉ. मंगेश गुलवाडे व सर्व शिवप्रेमी उपस्थीत होते.