युवकाने भररस्‍त्‍यात स्‍वत:ला पेटवून घेतले…

0
7

अमरावती : शहरातील वर्दळीच्‍या एका चौकात एक युवक हाती एक बाटली घेऊन येतो. काहीही न बोलता शांतपणे अंगावर पेट्रोल ओतून घेतो. लोकांना काही कळण्‍याआधीच तो स्‍वत:ला पेटवून घेतो. क्षणात तो होरपळून जातो.

लोक त्‍याचा जीव वाचविण्‍यासाठी धावतात. अंगावर पाणी शिंपडतात. पोलिसांना पाचारण केले जाते. हा थरारक प्रसंग येथील पंचवटी चौकात सोमवारी दुपारी घडला. प्रवीण रामराव देशमुख (२७, रा. लक्ष्‍मीनगर) असे या घटनेत गंभीररीत्‍या भाजलेल्‍या युवकाचे नाव आहे. हे पाऊल त्‍याने का उचलले याचे कारण अद्याप समोर येऊ शकले नाही.

शहरातील पंचवटी चौक हा अत्‍यंत वर्दळीचा चौक मानला जातो. सोमवारी दुपारी १ वाजताच्‍या सुमारास प्रवीण हा पेट्रोल भरलेली बाटली सोबत घेऊन चौकात पोहचला. रुरल इन्स्टिट्यूटच्‍या बाजूने पदपथावर तो उभा होता. त्‍याने काही क्षणात अंगावर पेट्रोल ओतून स्‍वत:ला पेटवून घेतले. पदपथावर व्‍यवसाय करणारे काही जण त्‍याच्‍या दिशेला धावले. काही लोकांनी त्‍याच्‍या अंगावर पाणी ओतले. पण, या घटनेत तो ७० टक्‍के भाजला.

या घटनेची माहिती मिळताच गाडगेनगर पोलीस ठाण्‍याचे पथक घटनास्‍थळी पोहचले. त्‍यांनी प्रवीणला येथील जिल्‍हा सामान्‍य रुग्‍णालयात दाखल केले. पण, तो बेशुद्धावस्‍थेत असल्‍याने त्‍याचा जबाब अद्याप नोंदवता आलेला नाही. या प्रकाराची माहिती प्रवीणच्‍या कुटुंबीयांना देण्‍यात आली. तेही जिल्‍हा सामान्‍य रुग्‍णालयात पोहचले, पण त्‍यांच्‍यासाठी ही घटना अकल्पित अशीच होती.गेल्‍या काही दिवसांपासून प्रवीण हा अबोल झाला होता. कुटुंबीयांशी देखील तो मनातील काही बोलला नाही. त्‍याने आत्महत्येचा प्रयत्‍न केला, याची काहीच माहिती नसल्‍याचे प्रवीणच्‍या आईने पोलिसांना सांगितले. येथील जिल्‍हा सामान्‍य रुग्‍णालयात प्रवीणवर उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे मात्र पंचवटी चौकात खळबळ उडाली होती.