सोमठाणा येथील विषबाधेची परिस्थिती नियंत्रणात

0
6

बुलढाणा-: लोणार तालुक्यातील सोमठाणा येथे झालेल्या विषबाधेची परिस्थिती नियंत्रणात आहे. यातील विषबाधा झालेल्या सुमारे १९२ जणांवर बीबी, लोणार ग्रामीण रुग्णालय आणि मेहकर येथे उपचार करण्यात आले. यातील सर्व जणांना कोणताही धोका नसल्याने रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. तसेच वयोवृद्धांवर विशेष लक्ष ठेवण्यात येत आहे. जिल्हा प्रशासन या संपूर्ण प्रकरणावर पूर्ण लक्ष ठेवून आहे.
सोमठाणा येथे विषबाधा झालेल्या नागरिकांवर बीबी येथे १४२, मेहकर येथे ३५ आणि लोणार ग्रामीण रुग्णालयात १५ अशा एकूण १९२ नागरिकांवर यशस्वी उपचार करण्यात आले. विषबाधेची माहिती रात्रीपासूनच घेण्यात आली. यातील संपूर्ण नागरिकांवर रुग्णालयात उपचार करण्यात आले.
विषबाधा झालेल्या नागरिकांची संख्या अधिक असल्याने ग्रामीण रुग्णालयात असलेल्या डॉक्टरांसह खासगी डॉक्टरांचीही या आपत्कालीन परिस्थितीत मदत घेण्यात आली. यातील कोणत्याही नागरिकांना धोका पोहोचला नाही. त्यामुळे सर्व नागरिकांना उपचारानंतर रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली.
याप्रकरणी जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी अन्न व औषध प्रशासन आणि पोलिसांना तपासाचे आदेश दिले आहे. त्यानुसार अन्न व औषध प्रशासन विभागाने विषबाधा झालेल्या अन्नाचे नमुने घेतले आहे. या ठिकाणी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण आणि डॉक्टरांच्या पथकाने भेट दिली. नागरिकांच्या वैद्यकीय सोयीसाठी दिवसभर वैद्यकीय पथक तैनात करण्यात आले आहे. विषबाधा झालेल्या सर्व नागरिकांची प्रकृती स्थिर आहे. या संपूर्ण परिस्थितीवर जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील हे वैयक्तिकरित्या लक्ष ठेवून आहेत.