जि. प. शाळेच्या अनागोंदी कारभाराचा मुद्दा आमसभेत गाजला

0
12

चौकशी समिती नेमण्याचे आमदार चंद्रिकापुरे यांनी दिले निर्देश
अर्जुनी मोर.Pयेथील जिल्हा परिषद हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात गेल्या पाच वर्षापासून सावळा गोंधळ सुरू आहे. दिवसेंदिवस शाळेची पटसंख्या कमी होत आहे. नियमित मुख्याध्यापक नाही. शाळेत अनेक आर्थिक अनियमितता आहेत. शाळेत शासकीय मालमत्तेची नोंद असलेले स्टॉक बुक नाही. शाळेचे अनेक साहित्य लंपास करण्यात आले. पैशाची उचल करून मुख्याध्यापकांनी विद्यार्थिनींना सायकल दिल्याच नाही. असे एक ना अनेक गैरप्रकार शाळेत आहेत. आमसभेत उपस्थित झालेल्या या प्रश्नावर आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांनी तत्कालीन मुख्याध्यापकावर कारवाई करावी. सखोल चौकशी करण्यासंदर्भात आयुक्त नागपूर व मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना पत्रव्यवहार करावा. दहा वर्षापासूनच्या कारभाराची चौकशी करण्यासाठी समिती स्थापन करावी असे निर्देश दिले.
स्थानिक पंचायत समिती कार्यालयात गुरुवारी (२२) वार्षिक आमसभा पार पडली. सभेच्या अध्यक्षस्थानी आमदार मनोहर चंद्रिकापुरे होते. यावेळी गोंदिया जि. प. चे उपाध्यक्ष यशवंत गणवीर, पंचायत समिती सभापती सविता कोडापे, उपसभापती होमराज पुस्तोडे, जि प सदस्य श्रीकांत घाटबांधे, पंचायत समिती सदस्य चंद्रकला ठवरे, कुंदा लोगडे, संदीप कापगते, नूतनलाल सोनवाने, नाजूक कुंभरे, प्रमोद लांडगे, घनश्याम धामट, भागेश्वरी सयाम, प्रभारी गटविकास अधिकारी विलास निमजे उपस्थित होते.
या आमसभेत तालुक्यातील ग्रामस्थांनी विविध मुद्दे उपस्थित केले. उमेदच्या कार्यप्रणालीवर आमदारांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. कार्यक्रम व्यवस्थापक अनुपस्थित असल्याने त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे निर्देश दिले. जिल्हा परिषद व पंचायत समिती मार्फत गावागावात होणा-या भूमिपूजन प्रसंगी सरपंच व पदाधिकाऱ्यांना बोलाविले जात नाही याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली . ग्रामपंचायत हद्दीत विकास कामे होत असताना ग्रामपंचायतीला माहिती देणे व सरपंच पदाधिकाऱ्यांना भूमिपूजन प्रसंगी बोलावणे आवश्यक असल्याचे आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांनी सांगितले.
बरडटोली शाळेची समस्या त्वरित मार्गी लावा
बरडटोली (अर्जुनी मोरगाव) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ही इटियाडोह धरणाच्या कालव्या नजिक आहे. कालवा पूर्ण क्षमतेने वाहत असल्यास झिरपणाद्वारे शाळेच्या पटांगणात गुडघ्यावर पाणी साचून राहते. याचा विद्यार्थ्यांना धोका संभवतो. याविषयी प्रदीर्घ काळापासून पत्रव्यवहार सुरू असूनही प्रशासन लक्ष घालत नसल्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. त्यावर तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांनी दिले.
हेवेदावे विसरून प्रशासनात गती आणा
घरकुल योजनेत अक्षम्य दुर्लक्ष होत आहे. लाभार्थ्यांचा प्राधान्य क्रम योग्यरीत्या ठरवावा. मनरेगा योजनेचा लाभ सामान्य माणसापर्यंत पोहोचला पाहिजे. ग्रामसेवकांनी ग्रामस्थांचे प्रश्न प्राधान्य क्रमाने निकाली काढावे. जनसामान्याच्या प्रश्नाची उकल योग्य रीतीने होण्याच्या दृष्टीने आमसभेसाठी जिल्हास्तरावरील अधिकाऱ्यांना निमंत्रन दिले जाते. मात्र ते उपस्थित राहत नसल्याबद्दल आमदारांनी खंत व्यक्त केली. त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे निर्देश दिले. अधिकारी कर्मचाऱ्यांना उपदेश करताना हेवे दावे बाजूला सारून प्रशासनात गती आणण्याचे आवाहन आमदार मनोहरराव चंद्रिकापुरे यांनी केले.