भंडारा जिल्ह्यात जिल्हाधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे हस्ते जलरथ अभियानाचा शुभारंभ

0
17

     जलरथाद्वारे जल जीवन मिशन, स्वच्छ भारत मिशन व जल युक्त शिवार योजनेची जनजागृती

भंडारा,दि. 28 :  जल जीवन मिशन, स्वच्छ भारत मिशन (ग्रा.) टप्पा 2 व जल युक्तशिवार योजनेची ग्रामस्तरावर व्यापक जनजागृती  करण्यासाठी आज बुधवारी (28 फेब्रुवारी 2024) भंडारा जिल्ह्यात जलरथ अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. भंडारा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी  योगेश कुंभेजकर आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी  समीर एम. कुर्तकोटी यांचे शुभ हस्ते जलरथाला जिल्हाधिकारी कार्यालयात हिरवी झेंडी दाखवून जलरथ गावस्तरावर मार्गस्थ करण्यात आले.

            यावेळी जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी कमलाकर रणदिवे, प्रकल्प संचालक (जजीमि) माणिक एस. चव्हाण, भंडाराऱ्याचे गट विकास अधिकारी डॉ. संघमित्रा कोल्हे, साकोलीचे व्हि.पी. जाधव, लाखनीचे अरूण गिऱ्हेपुंजे, पवनीचे गट विकास अधिकारी  सिंगणजुडे यांचेसह विभाग प्रमुखांची उपस्थिती होती.

            सर्वप्रथम जिल्हाधिकारी यांचे हस्ते, जलरथाचे विधीवत पूजन करण्यात आले. या प्रसंगी  जिल्हाधिकारी यांनी, जलरथाचे माध्यमातून गावस्तरावर जल जीवन मिशन, स्वच्छ भारत मिशन व जलयुक्त शिवार योजनेची व्यापक प्रसिध्दी होणार आहे.

           याकरीता शासकिय यंत्रणा तसेच ग्राम पंचायतस्तरीय ग्राम पंचायत पदाधिकारी, पाणी पुरवठा व स्वच्छता समिती पदाधिकारी शिवाय अन्य समित्यांचे पदाधिकारी आणि नागरिकांनी या जलरथाद्वारे होणाऱ्या जनजागृती अभियानात सहभागी व्हावे असे आवाहन केले. त्यानंतर जल जीवन मिशनचे प्रकल्प संचालक माणिक एस. चव्हाण यांनी, जलरथ अभियानांर्तगत जिल्ह्यात जल जीवन मिशन, स्वच्छ भारत मिशन टप्पा 2 व जल युक्त शिवार योजनेची प्रचार प्रसिध्दी करण्यात येणार आहे.

           जिल्ह्यातील पंचायत समितीस्तरावर सात जलरथाद्वारे व्यापक जनजागृती करण्यात येणार आहे. सर्व जलरथावर प्रचारकांची नियुक्ती करण्यात आली आहे. सोबत जलरथावर जल जीवन मिशन, स्वच्छ भारत मिशनच्या प्रचार प्रसिध्दीकरीता जिंगल वाजविले जाणार आहेत. सोबतच जलयुक्त शिवार योजनेकरीता पोस्टर व पत्रके गावस्तरावर दर्शनी भागात लावून ग्राम पंचायत पदाधिकारी, पाणी पुरवठा व स्वच्छता समिती सदस्य व नागरिकांचे प्रबोधन केले जाणार असल्याची माहिती प्रास्ताविकातून दिली.

          त्यांनतर जलरथाला जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर, मुख्य कार्यकारी अधिकारी समीर एम. कुर्तकोटी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी कमलाकर रणदिवे यांचे हस्ते हिरवी झेंडी दाखवून जलरथ अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. त्यानंतर गावस्तरावर वितरीत करण्यात येणाऱ्या जलयुक्त शिवार योजनेच्या प्रचार प्रसिध्दीचे पोस्टरचे लोर्कापण  जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे हस्ते करण्यात आले.

              ग्रामीण भागातील कुटूंबांना  नियमित पाणी पुरवठा व्हावा या उद्देशाने केंद्र व राज्य शासनाच्या वतीने जल जीवन मिशन कार्यक्रमाची अंमलबजावणी सुरू आहे. पाण्याचे विश्वासार्ह स्त्रोत निर्माण करणे, विद्यमान स्त्रोतांचे बळकटीकरण करणे यावर अभियानात लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे. राज्य दुष्काळमुक्त करण्याच्या उद्देशाने राज्य शासनामार्फत अभियानाची या माध्यमातून जनजागृती करण्यात येणार आहे. पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत दूषित होण्यापासून रोखण्यासाठी स्वच्छतेचे महत्व नागरिकांमध्ये पटवून दिले जाणार आहे.

            केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाच्या तसेच राज्यशासनाच्या माध्यमातून जल जीवन मिशन, स्वच्छ भारत मिशन तसेच राज्य शासनाच्या माध्यमातून जलयुक्त शिवार योजना (स्त्रोत बळकटीकरण) अशा विविध योजनांची या जलरथाचे माध्यमातून व्यापक जनजागृती  करण्यात येणार आहे.

जलरथ अभियानाच्या शुभारंभा प्रसंगी जिल्हा परिषद, पंचायत समितीस्तरावरील अधिकारी, कर्मचारी तसेच जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्षातील तज्ञ सल्लागार, गट संसाधन केंद्राचे (पाणी व स्वच्छता) गट समन्वयक, समुह समन्वयक, अंमलबजावणी सहाय संस्थेच्या कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.