• जिल्ह्यातील सर्वच शाळेत आयोजन
• 1664 शाळांमधील विद्यार्थ्यांचा सहभाग
गोंदिया, दि.1 : मतदार जागृती कार्यक्रमांतर्गत गोंदिया जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या सर्व शाळांमध्ये वैविध्यपूर्ण उपक्रम राबविण्यात आले. विद्यार्थी व शिक्षकांनी वेगवेगळ्या माध्यमातून लोकशाहीच्या संवर्धनासाठी मतदान करण्याचा संदेश दिला. या उपक्रमात नाविन्यपूर्ण कल्पनांचा मोठ्या प्रमाणात वापर करण्यात आला. गोंदिया जिल्ह्याचा मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी हा उपक्रम निश्चितच फायद्याचा ठरणार आहे.
29 फेब्रुवारी 2024 ला जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी प्रजित नायर, मुख्य कार्यकारी अधिकारी एम. मुरुगानंथम यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम जिल्हाभर राबविण्यात आला. जिल्हा स्वीप नोडल अधिकारी शिखा पिपलेवार, अतुल गजभिये व स्वीप टीमने या उपक्रमाचे नियोजन केले होते.
मतदार जागृती कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यातील सर्वच शाळेत विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमात जिल्ह्यातील 1664 शाळांमधील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. यामध्ये निबंध स्पर्धा, घोषवाक्य स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, पालकांना पत्र लिहणे, बॅनर स्पर्धा, भाषण स्पर्धा, अशा विविध स्पर्धांचा यात समावेश होता. विद्यार्थ्यांनी कल्पकता वापरून अतिशय उत्तम रांगोळी, चित्र तयार करुन यातून मतदार जागृतीचा संदेश देण्याचे काम केले. पालकांना पत्र लिहून मतदान करण्याचे आवाहन करण्यात आले. ही स्पर्धा मतदार जागृती बरोबरच मुलांना लिहत करणारी होती. या स्पर्धेतही शाळकरी मुला-मुलींनी उत्तम व कल्पक पत्र लिहली. प्रत्येक स्पर्धेत विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग होता. आयोजनामध्ये सर्वच शाळेतील विद्यार्थ्यानी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदविला. जिल्हा परिषद शिक्षण विभागाने यासाठी उत्तम नियोजन केले. या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षणाधिकारी डॉ. महेंद्र गजभिये, सर्व उपविभागीय अधिकारी, तहसिलदार व गटशिक्षणाधिकारी यांनी परिश्रम घेतले.