बलात्कार प्रकरणानंतर सेवेत कसर ठेवणारे तीन डॅाक्टर बडतर्फ

0
8

गडचिरोली : जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्यातल्या एका दुर्गम गावात अवघ्या पाच वर्षीय बालिकेवर अमानुषपणे बलात्कार करणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यानंतर बुधवारी जारावंडी प्राथमिक आरोग्य केंद्रातील तीन मानसेवी डॅाक्टरांना बडतर्फ करून त्यांची सेवा समाप्त करण्यात आली. पीडित बालिकेवर उपचार करण्यासाठी या तिघांपैकी कोणीही हजर नसल्याने त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली. दरम्यान बलात्कारी आरोपीला फाशीची शिक्षा देण्यासोबत डॅाक्टरांवर कारवाई करण्यासाठी विविध सामाजिक व राजकीय संघटनांच्या प्रतिनिधींनी बुधवारी इंदिरा गांधी चौकात जोरदार निदर्शने केली.

या प्रकरणातील आरोपी असलेल्या आरोग्य विभागाच्या शिपायाला अटक केल्यानंतर त्याला जि.प.प्रशासनाने तातडीने निलंबित केले. दरम्यान प्रकरणाचे गांभिर्य लक्षात घेऊन जि.प.च्या मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी सिंह, जिल्हा आरोग्य अधिकारी डॅा.दावळ साळवे यांनी जारावंडी प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट दिली. यावेळी गावकऱ्यांनी तेथील डॅाक्टरांच्या सेवेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत रोष व्यक्त केला.

जारावंडी प्राथमिक आरोग्य केंद्रात तीन मानसेवी डॅाक्टरांची सेवा घेतली जाते. आरोग्य केंद्राच्या परिसरातच ते वास्तव्यास होते. त्यापैकी डॅा.हिरेखन हे दोघे पती-पत्नी आणि डॅा.जागृती गावडे ही महिला डॅाक्टर आहे. पण बलात्काराच्या घटनेनंतर बालिकेला उपचारासाठी आणले त्यावेळी या तिघांपैकी एकही डॅाक्टर आरोग्य केंद्रात उपलब्ध नव्हते. त्यामुळे त्या बालिकेला आधी गडचिरोली आणि नंतर पुढील उपचारासाठी नागपूरला हलविण्यात आले. सध्या तिची प्रकृती स्थिर आहे.