वीज बिल भरणा केंद्रे सार्वजनिक सुट्टीतही खुली!

0
4

नागपूरदि. 22 मार्च :- महावितरणच्या नागपूर परिमंडलातील ग्राहकांना वीज बिलाचा भरणा करणे शक्य व्हावे यासाठी येत्या सार्वजनिक सुट्टीच्या दिवशीही वीज बिल भरणा केंद्रे खुली राहणार आहेत. यामुळे ग्राहकांनी त्यांच्याकडील नियमित वीज बिल आणि थकबाकीचा भरणा करुन वीजपुरवठा खंडित होण्याची कटू कारवाई टाळण्याचे  आवाहन महावितरणतर्फ़े करण्यात आले आहे.

           मार्च महिना संपायला काही दिवस शिल्लक आहेत त्यातच या महिन्यात 23, 24, 29, 30 आणि 31 मार्च रोजी शनिवार आणि रविवार हे सार्वजनिक सुट्टीचे दिवस आहेत, या सुट्ट्यांच्या दिवशी ग्राहकांना वीज बिलाचा भरणा करणे सहज शक्य व्हावे यासाठी या दिवशी नागपूर परिमंडलातील महावितरणची वीज बिल भरणा केंद्र सुरु ठेवण्याचा निर्णय महावितरणने घेतला आहे. या केंद्रांवर ग्राहकांना रोखीने अथवा चेकव्दारे वीजबिलाचा भरणा करता येतो याशिवाय कुठुनही आणि केव्हाही वीजबिलाचा भरणा करता यावा यासाठी महावितरणने संकेतस्थळ, मोबाईल ॲप, पेमेंट वॉलेटस आणि इतरही ऑनलाईन सुविधा उपलब्ध करुन दिल्या आहेत.

वीज ग्राहकांनी मुदतीपूर्वी वीजबिलाचा भरणा केला तर त्यांना प्रॉम्प्ट पेमेंटसाठी अर्थात तत्पर बिल भरणा केल्याबद्दल एक टक्का सवलत मिळते. हे बिल भीम ॲप, गुगल पे, पेटीएम किंवा बँकेच्या ॲपवरून किंवा महावितरणच्या वेबसाईटवरून असे ऑनलाईन पद्धतीने भरले तर पाव टक्का सवलत मिळते. याखेरीज ग्राहकांनी छापील कागदी बिलाच्या ऐवजी ईमेलने बिल स्वीकारण्याचा गो ग्रीनचा पर्यावरण पूरक पर्याय निवडला तर प्रत्येक बिलात दहा रुपये सवलत मिळते. विजेची बिले ऑनलाईन भरणे आणि ती दिलेल्या मुदतीच्या आधी भरणे हे वीज ग्राहकांना सहज शक्य आहे. त्यामुळे त्यांचा वेळ आणि श्रम वाचतात आणि बिलातही सवलत मिळते. त्यासोबत महावितरणच्या वेबसाईटवरून अथवा ॲपवरून एकदा गो ग्रीनसाठी नोंदणी केली तर प्रत्येक बिलात दहा रुपये सवलत मिळत राहते. त्यामुळे अधिकाधिक ग्राहकांनी नियमित वीज बिलांचा भरणा करुन या सवलतींचा लाभ घेण्याचे आवाहन महावितरनकडून करण्यात आले आहे.

थकबाकीदार ग्राहकांना डिजीटल नोटिस

थकबाकीदार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्यासाठी भारतीय विद्युत कायदा 2003  मधील कलम 56 नुसार डिजिटल मोडनुसार व्हॉट्स अॅप एसएमएस, ई-मेलव्दारे नोटीस पाठवून थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करता येतो. यामुळे ग्राहकांनी आपल्या वीजबिलाचा नियमित भरणा करुन कटू कारवाई टाळण्याचे आवाहन महावितरणतर्फ़े करण्यात आले आहे.

महत्वाचे…….

  • दंड भरण्यापासून वाचता येईल.
  • ग्राहकांना वीजपुरवठा खंडित होण्यापासून वाचता येईल.
  • महावितरणची थकबाकी कमी  होण्यास मदत होईल.
  • कारवाई टाळण्यासाठी वेळेवर बिल भरा.
  • दंड भरण्यापासून वाचण्यासाठी वेळेवर बिल भरा.
  • वीज बिल भरण्यासाठी विविध पद्धती उपलब्ध आहेत. आपल्या सोयीनुसार पद्धत निवडा.