निवडणूक खर्चाचे तपशील काटेकोरपणे तपासा

0
5
  • निवडणूक खर्च निरिक्षक एस. वेणूगोपाल
  • नोडल अधिकारी यांचा आढावा

गोंदियादि. 22 : लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी राजकीय पक्ष व उमेदवार यांच्याकडून होणाऱ्या विविध प्रकारच्या खर्चाचा तपशील काटेकोरपणे तपासण्याचे निर्देश गडचिरोली लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक खर्च निरिक्षक एस. वेणूगोपाल यांनी दिले. गोंदिया जिल्ह्यातील 66- आमगाव विधानसभा मतदार संघाचा समावेश गडचिरोली लोकसभा मतदारसंघात येत असल्याने त्यांनी आमगाव विधानसभा क्षेत्राचा आढावा गोंदिया जिल्हाधिकारी कार्यालयात घेतला.

            जिल्हाधिकारी प्रजित नायर, अप्पर जिल्हा पोलीस अधीक्षक नित्यानंद झा, अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क मनोहर आनचुळे, निवासी उपजिल्हाधिकारी  विजया बनकर, उपजिल्हाधिकारी निवडणूक किरण अंबेकर, उपविभागीय अधिकारी कविता गायकवाड, नोडल अधिकारी खर्च जनार्धन खोटरे, जिल्हा माहिती अधिकारी  रवी  गिते व अधिकारी  उपस्थित होते.

आमगाव विधानसभा क्षेत्रात 310 मतदान केंद्र व एक सहाय्यक मतदान केंद्र आहे. या मतदारसंघात 1 लाख 31 हजार 80 पुरुष व 1 लाख 30 हजार 867 स्त्री असे एकूण 2 लाख 61 हजार 948 मतदार असून हा मतदार संघ अनुसूचित जमातीसाठी राखीव असल्याची माहिती बैठकीत देण्यात आली. श्री. वेणूगोपाल यांनी विषय निहाय आढावा घेतला. आचारसंहिता, विविध भरारी पथक, अनाधिकृत मद्यसाठा व रोख रक्कम जप्ती, जाहिरात प्रमाणिकरण, राजकीय पक्षांच्या सभा व बैठकांना परवानगी  याबाबत सविस्तर माहिती घेतली.

            लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने नागरिकांकडून प्राप्त तक्रारीचे निवारण करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा तक्रार निवारण केंद्र स्थापन करण्यात आले आहे. श्री. वेणूगोपाल यांनी या कक्षाला भेट देऊन पाहणी केली. आतापर्यंत या कक्षाकडे छायाचित्र मतदार ओळखपत्र व अन्य 106 तक्रारी प्राप्त झाल्या असून त्यांचे निवारण करण्यात आले आहे. तसेच सीव्हिजिलवर तीन तक्रारी कक्षाला मिळाल्या असून त्यांचेही निवारण करण्यात आले आहे.

आमगाव विधानसभा क्षेत्रातील नागरिकांच्या निवडणूक संबंधी काही तक्रारी असतील किंवा काही माहिती द्यायची असल्यास त्यांनी निवडणूक खर्च निरिक्षक वेणूगोपाल यांना 9420067690 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.