जिल्हाधिकार्‍यांच्या हस्ते ग्रंथोत्सवाचे उदघाटन

0
2
मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांचे मार्गदर्शन
ग्रंथालय हे सगळ्यांसाठी मातृस्थानी
लेखक बाबाराव मुसळे यांचे प्रतिपादन
वाशीम, दि. २3- ग्रंथालय हे सगळ्यांसाठी मातृस्थानी असते. तिची दोन लाडकी अपत्ये आहेत. पैकी तिच्या उजव्या हाती ग्रंथ असतात, तर डाव्या हाती वाचक. या दोघांचा उत्तम समन्वय ही मातृसंस्था करीत असते, असे प्रतिपादन सुप्रसिद्ध लेखक बाबाराव मुसळे यांनी आज येथे केले. जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाच्या परिसरात आयोजित वाशीम ग्रंथोत्सव २०२३ च्या उद्धाटन सोहळ्यात ते बोलत होते.
प्रारंभी जिल्हाधिकारी श्रीमती बुवनेश्वरी एस. यांनी दीप प्रज्ज्वलन, प्रतिमापूजन करून ग्रंथोत्सवाचे उद्घाटन केले. तद्वतच फित कापून जिल्हाधिकार्‍यांनी ग्रंथप्रदर्शनीचेही उद्घाटन केले. त्यानंतर झालेल्या उद्धाटन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री. बाबाराव मुसळे होते. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी वैभव वाघमारे, अमरावती विभागाचे सहाय्यक ग्रंथालय संचालक राजेश पाटील, या मान्यवरांसह ग्रंथालय निरीक्षक राजेश कोलते, शेंदूरजना घाट येथील डॉ. श्यामप्रसाद मुखर्जी कला महाविद्यालयाचे ग्रंथपाल डॉ. राजेश बोबडे, राजे वाकाटक वाचनालयाचे अध्यक्ष माधवराव शेवलकर, जिल्हा ग्रंथालय संघाचे कार्यवाह प्रभाकरराव घुगे, जिल्हा माहिती अधिकारी यासिरूद्दिन काझी, जिल्हा ग्रंथालय अधिकारी बालाजी कातकडे मंचावर उपस्थित होते.
 मुख्य कार्यकारी अधिकारी वैभव वाघमारे यांनीही यावेळी मार्गदर्शन केले. ते म्हणाले, ग्रंथ हे आपले मित्र असतात. आपले व्यक्तित्व घडविणारे असतात. जगातील सर्व महापुरूषांना वाचन आणि जीवनानुभवांनीच घडविले आहे. ग्रंथांच्या सान्निध्यात जीवन सुखकर होते, असे ते म्हणाले. सहाय्यक ग्रंथालय संचालक राजेश पाटील यांचेही समयोचित भाषण झाले. उपस्थित वाचनालय प्रतिनिधींशी हद्य संवाद साधून काही उपयुक्त सूचना केल्या.
जिल्हा ग्रंथालय अधिकारी बालाजी कातकडे यांनी नेटक्या आणि समर्पक शब्दांमध्ये प्रास्ताविक करून ग्रंथोत्सव आयोजित करण्याबाबत भूमिका मांडली. प्रा. संजय धांडे यांनी उद्धाटन सत्राचे सूत्रसंचलन केले. जिल्हा समन्वय समिती सदस्य प्रभाकरराव घुगे यांनी आभार मानले. यावेळी जिल्हाभरातील ग्रंथालयांचे प्रतिनिधी आणि श्रोते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
00 चौकट 00
वाचकांचा झाला सत्कार
यावेळी उत्तम आणि सुजाण वाचक असलेले प्राचार्य भास्कर गायकवाड, प्रभाकर गायकवाड, गोविंद व्यवहारे, गजानन उचित, राजू काकडे, कविता खिल्लारे, राहुल सोमटकर या वाचकांचा यथोचित सत्कार करण्यात आला.