विदर्भात बनावट महादेव अ‍ॅप सक्रिय

0
5

नागपूर : छत्तीसगडमधील क्रिकेट बुकींनी सुरू केलेल्या महादेव अ‍ॅपमधून देशभरातून कोटय़वधीचा क्रिकेट सट्टाबाजार उघडकीस आला होता. त्याच धर्तीवर चंद्रपुरातील क्रिकेट बुकींनी बनावट महादेव २ अ‍ॅप तयार करून संपूर्ण विदर्भासह राज्यभरात नेटवर्क उभारले आहे. या अ‍ॅपच्या माध्यमातून कोटय़वधीची सट्टेबाजी सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

राजस्थानचा जहाँगीर या मुख्य क्रिकेट बुकीने भिलाईच्या संगणक तज्ज्ञ असलेल्या सौरव चंद्राकर आणि रवी उप्पल नावाच्या दोन युवकांशी संगनमत करून महादेव बुक नावाने क्रिकेट सट्टेबाजीचे अ‍ॅप तयार केले होते. राजस्थानातून सुरू झालेल्या महादेव बुक अ‍ॅपने संपूर्ण देशभरात क्रिकेटच्या सट्टेबाजीचे जाळे तयार करीत हजारो कोटींची माया जमवली होती. त्याच धर्तीवर चंद्रपुरातील धीरज-नीरज, संपत-सिराज महेश आणि राजिक यांनी महादेव टू नावाने ऑनलाईन क्रिकेट सट्टेबाजीचे अ‍ॅप तयार केले असून त्याचे मुख्य केंद्र चंद्रपूर बनवले आहे. नागपुरातील कोटय़धीश असलेल्या सिराजने धीरज-नीरज, संपत आणि राजिक यांच्याशी भागीदारी केली. ‘नाईस ७७७’ नावाने बुकिंग सुरू करून ऑनलाईन क्रिकेट सट्टेबाजी सुरू केली. त्यासाठी पाच जणांनी ७ जणांची टीम तयार केली आहे. खायवाडी-लगवाडीसाठी कॉल सेंटरसुद्धा उभारले आहे. राज्यभरातून हजारो क्रिकेट चाहते महादेव टू अ‍ॅपच्या माध्यमातून सट्टेबाजी खेळतात. तर धीरज-नीरज हे दोघेही लाखोंमध्ये खायवाडी-लगवाडी करतात. चंद्रपुरात १६ क्रिकेट बुकींनी महादेव टू अ‍ॅपची आयडी-पासवर्ड देण्यात आला असून त्यांच्या माध्यमातून राज्यभरातून हजारो ग्राहकांकडून कोटय़वधीमध्ये खायवाडी—लगवाडी करण्यात येत असल्याची माहिती आहे. गेल्या काही महिन्यांपासून धीरज, नीरज, सिराज, राजिक आणि महेश यांची दिवसाला कोटी रुपयांमध्ये कमाई सुरू असल्याची चर्चा आहे.