जिल्हाधिकाऱ्यांनी गोळ्या सेवन करुन केले हत्तीरोग दुरीकरण मोहिमेचे जिल्हास्तरीय उद्घाटन

0
15

हत्तीरोग प्रतिबंधात्मक गोळ्यांचे सेवन करुन सुरक्षीत रहा

 गोंदिया, दि.26 :  जिल्ह्यातून हत्तीपाय रोगाबाबतची विकृती कमी करण्यासाठी आरोग्य विभागामार्फत 26 मार्च ते 5 एप्रिल 2024 दरम्यान सामुदायिक औषधोपचार मोहीम गोंदिया, तिरोडा, गोरेगाव व अर्जुनी मोरगाव या तालुक्यात राबवली जात असून लोकांनी आरोग्य कर्मचाऱ्यांसमोर गोळ्यांचे सेवन केल्याने हत्तीरोगाचा प्रतिबंध होऊ शकतो. त्यामुळे हत्तीरोग प्रतिबंधात्मक गोळ्यांचे सेवन करुन सुरक्षीत रहा, असे आवाहन जिल्हाधिकारी प्रजित नायर यांनी केले.

        जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आज हत्तीरोग दुरीकरण मोहिमेचे जिल्हास्तरीय उद्घाटन जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते करण्यात आले, त्यावेळी श्री. नायर बोलत होते. जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी एम. मुरुगानंथम,  पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नितीन वानखेडे, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. विनोद चव्हाण, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. तृप्ती कटरे व अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नितीन कापसे यांची यावेळी प्रामुख्याने उपस्थिती होती.

         जिल्हाधिकारी श्री. नायर म्हणाले, जिल्ह्यात 2023 च्या सर्व्हेक्षणानुसार 733 हत्तीपाय रुग्ण तसेच 562 अंडवृध्दी रुग्णांची नोंद झालेली आहे. त्यामुळे केंद्र शासनाच्या 2023 च्या मार्गदर्शक सूचनेनुसार प्रिटास ॲडीशनल एमएफ सर्वेक्षणात अयशस्वी ठरलेल्या गोंदिया जिल्ह्यातील गोंदिया, तिरोडा, गोरेगाव व अर्जुनी मोरगाव या चार तालुक्यात 26 मार्च ते 5 एप्रिल 2024 पर्यंत हत्तीरोग सार्वत्रिक औषधोपचार मोहीम राबविण्यात येत आहे. हत्तीरोग हा डासांपासून होणारा रोग आहे. या रोगात रुग्णांचे पाय आकाराने जाड होतात व रुग्णास हालचाल करणे अवघड जाते. हत्तीरोगामुळे शरीर विद्रुप होऊन अकार्यक्षम होतो. हत्तीरोग क्युलेक्स विचकी फॅसिएटस नावाच्या जंतूमुळे होतो, हे जंतू डासांच्या चाव्याद्वारे पसरतात. निरोगी व्यक्तीस डास चावल्यामुळे संक्रमण होते. हत्तीरोगावर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून आरोग्य विभागातर्फे मोहीम राबवून डी.ई.सी. व अल्बेंडाझॉल गोळ्यांचे वितरण करण्यात येत आहे. घरी आलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांकडून प्राप्त गोळ्यांचे सेवन त्यांच्या समक्ष करावे, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले.

          हत्तीरोग झाल्यावर त्यावर कोणताही परिणामकारक उपाय नाही. त्यामुळे हत्तीरोग होऊ नये यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून सामुदायिक औषधोपचार मोहिमेदरम्यान डी.ई.सी. व अल्बेंडाझॉल गोळ्यांचे सेवन करणे आवश्यक आहे. आरोग्य विभागामार्फत 26 मार्च ते 5 एप्रिल 2024 दरम्यान सामुदायिक औषधोपचार  मोहीम गोंदिया, तिरोडा, गोरेगाव व अर्जुनी मोरगाव तालुक्यात राबविली जात आहे. डी.ई.सी. व अल्बेंडाझॉल गोळ्या खाल्ल्यामुळेच हत्तीरोगास प्रतिबंध होऊ शकतो. घरी आलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांसमोरच गोळ्यांचे सेवन करावे. हत्तीरोग जीवघेणा आजार नसला तरी शरिराला विकृती निर्माण करुन कायमचे अपंगत्व होणारा आजार आहे. डी.ई.सी. व अल्बेंडाझॉल गोळ्या सुरक्षीत असून नागरिकांनी कुठलाही गैरसमज, संकोच न बाळगता गोळ्यांचे सेवन करावे. या मोहिमेदरम्यान आरोग्य कर्मचारी दोन प्रकारच्या गोळ्या देणार आहेत. डी.ई.सी. गोळी वयोमानानुसार व अल्बेंडाझॉल ही गोळी प्रत्येकी एक याप्रमाणे देण्यात येणार आहे. या गोळ्यांचे सेवन दोन वर्षाखालील बालकांनी, गरोदर मातांनी आणि अती गंभीर आजारी व्यक्तींनी सेवन करु नये. गोळ्या उपाशी पोटी खाऊ नये, जेवण झाल्यानंतरच सदर गोळ्यांचे सेवन करावे असे जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. विनोद चव्हाण यांनी सांगितले.

        यावेळी मंदा आनंद नागरीकर, मालनबाई भिकाजी बनकर व सिताराम गणपत सोनवाणे या लाभार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते एमएमडीपी किट वाटप करण्यात आली. तसेच हत्तीपाय आजाराबाबत जनजागृती साहित्यांचे मान्यवरांच्या हस्ते विमोचन करण्यात आले. कार्यक्रमास जिल्हा साथरोग अधिकारी डॉ. निरंजन अग्रवाल, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. बी.डी. जायसवाल, जि.प.चे जिल्हा आयईसी अधिकारी प्रशांत खरात व इतर विभागाचे प्रमुख उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जिल्हा हिवताप कार्यालयाचे पंकज गजभिये, किशोर भालेराव, आशिष बल्ले, रविंद्र त्रिवास, मिलिंद नंदागवळी, रविंद्र शेंडे, वर्षा भावे यांनी परिश्रम घेतले.