उमेदवार अथवा पक्षाच्या संमतीशिवाय जाहिरात करता येणार नाही प्रसारीत

0
9

गोंदिया, दि.26 : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार राजकीय जाहिरातींचे पूर्वप्रमाणिकरण करण्यासाठी भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघासाठी  गोंदिया येथे माध्यम प्रमाणिकरण आणि संनियंत्रण समिती (एम.सी.एम.सी.) ची स्थापना जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी प्रजित नायर यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आली आहे. माध्यम  प्रमाणिकरण व सनियंत्रण समिती रूम नंबर 25, दुसरा मजला, नवीन प्रशासकीय इमारत, जयस्तंभ चौक गोंदिया येथे कार्यान्वीत आहे. राजकीय जाहिरातीचे प्रमाणिकरण करून घेण्यासाठी इच्छुकांनी आपले अर्ज दिलेल्या मुदतीत माध्यम प्रमाणिकरण समिती कक्षात सादर करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी प्रजित नायर यांनी केले.

            निवडणूक आयोगाने राजकीय प्रचार जाहिरातींबाबत नियमावली ठरवून दिली आहे. यानुसार राजकीय पक्ष व उमेदवार यांना दूरचित्रवाणी वाहिन्या, केबल नेटवर्क, केबल वृत्तवाहिन्या, सिनेमा हॉल, रेडिओ, सार्वजनिक तसेच खासगी एफएम चॅनेल्स, सार्वजनिक ठिकाणी दाखविण्याच्या दृक-श्राव्य जाहिराती,                      ई-वृत्तपत्रामध्ये प्रसिद्ध करावयाच्या जाहिराती, बल्क एसएमएस, रेकॉर्ड केलेले व्हॉईस मेसेजेस, सोशल मीडिया,  इंटरनेट संकेतस्थळे यावर दर्शविण्याच्या जाहिराती तसेच मतदानाच्या आणि त्याच्या एक दिवस आधी वृत्तपत्रात प्रसिद्ध करावयाच्या जाहिराती यांना माध्यम प्रमाणिकरण आणि संनियंत्रण समितीकडून (एम.सी.एम.सी.) पूर्वमान्यता घेणे आवश्यक आहे.

            राष्ट्रीय पक्ष, उमेदवार किंवा प्रतिनिधींनी जाहिरात प्रसारित होण्याच्या 48 तास अगोदर प्रमाणिकरणासाठी जाहिरात व अर्ज सादर करावा. अनोंदणीकृत राजकीय पक्ष किंवा इतर व्यक्तींनी किमान सात दिवस पूर्वी समितीकडे अर्ज करणे आवश्यक आहे. एम.सी.एम.सी समिती अर्ज प्राप्त झाल्यानंतर 48 तासात तो निकाली काढेल. जाहिरात नियमानुसार नसल्यास एम.सी.एम.सी. समितीला प्रमाणिकरण नाकारण्याचा अधिकार आहे. समितीच्या निर्णयाविरुद्ध राज्य समितीकडे अपील दाखल करता येते. मात्र त्यानंतर केवळ सर्वोच्च न्यायालयात दाद मागता येते. समितीने जाहिरातीत बदल सुचविल्यानंतर समितीकडून तसा संदेश प्राप्त झाल्याच्या 24 तासात राजकीय पक्ष किंवा उमेदवाराने त्यानुसार दुरुस्त्या करून नवीन निर्मिती सादर करणे आवश्यक आहे. टिव्ही चॅनलद्वारे जाहिराती जर प्रसारीत करावयाच्या असतील तर अशा जाहिराती समितीकडे प्रसारणाच्या तीन दिवस अगोदर प्रमाणिकरणासाठी सादर करणे आवश्यक आहे. समिती याबाबत दोन दिवसात निर्णय देईल.

            प्रमाणिकरणासाठीचा अर्ज हा विहित नमुन्यात सादर करावा लागेल. त्यात अर्जदाराचे नाव व पत्ता, उमेदवार किंवा पक्षाचे नाव किंवा सदर जाहिरात एखादी संस्था-ट्रस्ट- संघटना यांच्याकडून दिली जात असल्यास त्यांचे नाव, मतदार संघाचे नाव, राजकीय पक्षाचे मुख्यालयाचा पत्ता, ज्या चॅनल/केबल नेटवर्कवर जाहिरात प्रसारित करायची आहे त्याबाबत स्पष्ट माहिती कोणत्या उमेदवाराच्या हितासाठी सदर जाहिरात करण्यात आली आहे त्याबाबत माहिती, जाहिरात सादर करित असल्याचा दिनांक, जाहिरातीसाठी वापरण्यात आलेली भाषा,  त्याच्या ट्रास्‍कींपच्या साक्षाकिंत दोन प्रती, जाहिरातीचे शिर्षक, जाहिरात निर्मितीचा खर्च, जाहिरात जर चॅनेलव्दारे  प्रसारित केली जात असेल तर किती वेळा ती प्रसारित केली जाणार, त्याचे प्रस्तावित केलेले दर, यासाठी लागलेला एकूण खर्च आदी माहिती अर्जदाराने निवडणूक आयोगाने दिलेल्या विहित नमून्यात स्वाक्षरीसह सादर करणे आवश्यक आहे.

जाहिरातीमध्ये आदर्श आचारसंहितेनुसार दिलेल्या निर्देशाचे पालन होणे आवश्यक आहे. या प्रामुख्याने  राष्ट्रीय एकात्मतेला हानी पोहोचविणाऱ्या बाबी, धार्मिक भावना दुखावणे, भारतीय घटनेचा अवमान करणे, गुन्हा दाखल करण्यास प्रवृत्त करणे, कायदा व सुव्यवस्थेस बाधा निर्माण करणे, गुन्हेगारीचे उदात्तीकरण, महिलांचे चुकीचे चित्रण, तंबाखूजन्य किंवा नशा आणणाऱ्या पदार्थाच्या जाहिराती, हुंडा, बालविवाह यांना उत्तेजन देणाऱ्या जाहिराती प्रसारित करण्यास प्रतिबंध आहे. इतर देशावर टिका नसावी. न्यायालयाचा अवमान जाहिरातीतून होता कामा नये. राष्ट्रपती व न्याय संस्था यांच्या बाबत साशंकता नसावी. राष्ट्रीय एकात्मतेला, सौहार्दतेला आणि एकतेला बाधा पोहचविणारा मजकूर यात नसावा. सुरक्षा दलातील कोणतेही सैनिक, व्यक्ती, अधिकारी यांची अथवा सैन्य दलाचे छायाचित्र जाहिरातीत नसावे. कोणत्याही व्यक्तीच्या खाजगी / वैयक्तिक जीवनातील घटनांना धरुन त्यावर भाष्य नसावे. व्हिडीओ व्हॅनद्वारे प्रचारासाठी उपयोगात आणले जाणारे साहित्य याचे माध्यम प्रमाणिकरण व सनियंत्रण समितीकडून प्रमाणित करुन घेणे आवश्यक आहे. या वाहनाची निवडणूक विभागाकडून रितसर परवानगी घेतली पाहिजे.

            एखाद्या व्यक्तीला उमेदवार किंवा राजकीय पक्ष यांच्या संमतीशिवाय प्रचार करणाऱ्या जाहिराती  देता येणार नाहीत. अनुमतीशिवाय जाहिराती प्रकाशित झाल्यास प्रकाशकावर गुन्हा दाखल केला जाईल. मतदानाच्या दिवशी व मतदानाच्या एक दिवस अगोदर मुद्रीत माध्यमाद्वारे प्रकाशित करावयाची जाहिरात प्रमाणिकरणसाठी एमसीएमसी समितीकडे अनुक्रमे दोन दिवस अगोदर सादर करणे आवश्यक आहे.