मी मतदान करणारच ‘ सर्वांनी निर्धार करा – उपविभागीय अधिकारी वरुणकुमार सहारे

0
4

मतदान जनजागृती बाईक (दुचाकी) रॅली संपन्न
अर्जुनी मोर-” येत्या 19 एप्रिल ला भंडारा गोंदिया लोकसभा मतदार संघात निवडणूक होऊ घातलेली आहे. या निवडणूक प्रक्रियेत सर्वांनी सहभागी होऊन मतदान करावे. आपण सर्वांना मतदानाचे महत्त्व पटवून देऊन सर्वांना मतदानाचे कर्तव्य पार पाडायचे आहे. ‘मी मतदान करणारच’ हा निर्धार सर्वांनी करा… आणि लोकशाहीला अधिक बळकट करा “असे आवाहन सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी वरुणकुमार सहारे यांनी केले आहे. अर्जुनी मोरगाव येथे बाईक(दुचाकी) रॅली काढून सर्वांना या बाबतीत जागरूक करण्यात आले,याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी पोलीस निरीक्षक विजयानंद पाटील, नगरपंचायत मुख्याधिकारी राजू घोडके, प्राचार्य डॉ ईश्वर मोहुर्ले, नायब तहसीलदार मंगेश क्षीरसागर, तसेच स्वीपच्या नोडल अधिकारी स्वाती तायडे आदी मान्यवर उपस्थित होते.
दुर्गा चौकातून या रॅलीची सुरुवात झाली. पुढे हातझाडे मोहल्ला, बरडटोली, सिंगलटोली, कापगते कॉम्प्लेक्स मुख्य बाजार लाईन सिव्हील लाईन शिक्षक कॉलनी फ्रेन्डस कॉलनी रेल्वे स्टेशन परिसर आदी प्रमुख मार्गावरून ही रॅली फिरविण्यात आली
यात सहभागी सर्वांनी पांढरा शर्ट आणि काळा पँट, तसेच महिलांनी पांढरा सलवार किंवा साडी परिधान केली होती.
या रॅलीचा समारोप उपविभागीय कार्यालयात झाला. यावेळी वरुणकुमार सहारे यांनी सहभागी झालेल्या सर्वांचे आभार व्यक्त केले. या रॅली मध्ये पोलीस विभाग, महसूल विभाग, नगर पंचायत, उपविभागीय कार्यालय, तहसील कार्यालय येथील सर्व कर्मचारी तसेच बहुसंख्येने नागरिक उपस्थित होते.