निवडणूक निरीक्षकांनी घेतला यंत्रणेचा आढावा

0
3

गोंदिया दि. 29 :- लोकसभा निवडणुकीसाठी आयोगाने निर्देशित केलेल्या मार्गदर्शक तत्त्वानुसारच सर्व यंत्रणांनी काम करणे अपेक्षित आहे. सोबतच निवडणूक कर्तव्यासाठी नियुक्त अधिकारी कर्मचाऱ्यांना योग्य प्रशिक्षण देणे आवश्यक आहे. निवडणूक प्रक्रिया पारदर्शकरित्या पार पाडण्यासाठी गांभीर्याने काम करा अशा सूचना निवडणूक निरिक्षक (सामान्य) विनय सिंग यांनी केल्या. 11 भंडारा- गोंदिया लोकसभा मतदारसंघासाठी नियुक्त निरीक्षक विनय सिंग यांनी आज निवडणूक यंत्रणेसाठी नियुक्त नोडल अधिकारी यांच्या कामाचा आढावा घेतला.

जिल्हाधिकारी प्रजित नायर यांनी यावेळी निवडणूक यंत्रणांनी केलेल्या पूर्वतयारीचा, घेतलेल्या प्रशिक्षणाचा, उपलब्ध मनुष्यबळाचा तसेच पोलीस निखिल पिंगळे यांनी निवडणूक प्रक्रियेसाठी लागणाऱ्या पोलीस दलाच्या  मनुष्यबळाचे व्यवस्थापन आणि अंतर सीमा तपासणीसाठी गठीत पथकांची माहिती यावेळी सादर केली.

यावेळी बोलताना विनय सिंग यांनी गोंदिया जिल्ह्यातील निवडणूक विषयक कामकाज व पूर्वतयारीबाबत समाधान व्यक्त केले. तसेच निवडणुकीसाठी प्रभावी पद्धतीने प्रतिसाद प्रणाली गोंदिया जिल्ह्याने तयार केली असल्याचे मत नोंदवले.

मतदान प्रक्रियेमध्ये 85 पेक्षा अधिक वय असलेले जेष्ठ नागरिक तसेच दिव्यांग आणि घरी जाऊन मतदान करण्याच्या व्यवस्थेबाबत त्यांनी माहिती घेतली. ही मतदान प्रक्रिया अत्यंत गोपनीय असावी असे ते म्हणाले. सोबत ज्यांच्याकडे मतदानासाठी चमू जाणार आहे त्यांनी संबंधित मतदरांकडे सीसीटीव्ही कॅमेरे नाहीत ना याची खातरजमा करून घ्यावी. घरी जाऊन मतदान घेणाऱ्या अधिकाऱ्यांनी संवेदनशीलतेने व गुप्ततेने मतदान प्रक्रिया पार पाडावी अशी सूचना त्यांनी यावेळी केली.

            या आढावा बैठकीला जिल्हाधिकारी प्रजित नायर, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद                    एम. मुरुगानंथम, जिल्हा पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी किरण अंबेकर, निवासी उपजिल्हाधिकारी विजया बनकर, उपजिल्हाधिकारी भैय्यासाहेब बेहरे, मानसी पाटील, उपविभागीय अधिकारी तथा सहायक निवडणूक अधिकारी वरुणकुमार सहारे, पर्वणी पाटील, पूजा गायकवाड यासह सर्व नोडल अधिकारी उपस्थित होते.