नगर परिषदेचे जीर्ण छत कोसळले

0
12

गोंदिया ः येथील नगर परिषदेच्या वरच्या माळ्यावरील कर विभागाचे जीर्ण छत कोसळले. ही घटना गुरुवारी (ता. ४) दुपारी साडेतीनच्या सुमारास घडली. अचानक घडलेल्या या घटनेमुळे कर्तव्यावर असलेल्या कर्मचाऱ्यांनी समयसूचकता दाखविल्याने मोठा अनर्थ टळला.
नगर परिषदेची संपूर्ण इमारत जीर्ण झाली आहे. दरवर्षी पावसाळ्यात छत गळत असते. त्यामुळे जीव मूठीत घेऊन कर्मचाऱ्यांना कर्तव्य पार पाडावे लागतात. आचारसंहिता संपल्यानंतर या जीर्ण इमारतीला पाडून नवीन इमारतीचे बांधकाम केले जाणार आहे. याकरिता ३० कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. हे खरे असले तरी अजूनही कर्मचारी जीव धोक्यात घालून नगर परिषदेच्या जीर्ण इमारतीत कामे करीत आहेत. गुरुवारी कर विभागात १० ते १५ कर्मचारी कर्तव्यावर असताना दुपारी साडेतीनच्या सुमारास अचानक छताचे प्लास्टर कोसळले. टेबलांवर प्लास्टर कोसळल्याने आणि आवाज आल्याने सर्व कर्मचारी समयसूचकता दाखवून बाहेर पडले. त्यामुळे मोठा अनर्थ टळला.