जिल्ह्यातील 43 मतदान केंद्रांचे नियंत्रण महिलांच्या हाती

0
16
  • लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024

        गोंदिया, दि.10 : लोकशाही प्रणाली देशात मतदानाचा मुलभूत अधिकार 18 वर्षे पूर्ण झालेल्या प्रत्येक नागरिकाला आहे. मतदान करणे हे आपले राष्ट्रीय कर्तव्य असतांना सुध्दा कित्येक महिला पुरुषांच्या गर्दीत जाण्याचे टाळत आपला मतदानाचा हक्क बजावत नाही. शासन व प्रशासनाकडून प्रत्येक मतदाराने आपला मतदानाचा हक्क बजवावा यासाठी प्रयत्न केले जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून महिलांना मतदानासाठी प्रोत्साहित करण्यासाठी भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघात येत असलेल्या जिल्ह्यातील चारही विधानसभा मतदारसंघातील 43 मतदान केंद्रांचे नियंत्रण पूर्णपणे महिलांच्या हाती देण्यात आले आहे. अर्थातच येथील अधिकाऱ्यांपासून ते कर्मचाऱ्यांपर्यंत सर्व जबाबदारी महिला पार पाडणार आहेत.

         भारत निवडणूक आयोगाकडून लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम 16 मार्च 2024 रोजी जाहीर झालेला असून 11-भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघात 19 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. आजची महिला ही पुरुषांपेक्षा कमी नसून त्यांच्या बरोबरीने काम करीत आहे. विशेष म्हणजे जिल्ह्यात पुरुषांच्या तुलनेत महिला मतदारांची संख्या जास्त असूनही प्रत्यक्ष मतदानात मात्र महिलांना मागे टाकून पुरुषांची टक्केवारी नेहमीच जास्त असल्याचे दिसून येते. पुरुषांच्या गर्दीत जाऊन मतदान करण्यापेक्षा घरीच रहावे हा विचार करुन कित्येक महिला राष्ट्रीय कर्तव्य बजावत नाही. एकीकडे जास्तीत जास्त मतदान व्हावे यासाठी शासन व प्रशासनाकडून विविध उपक्रमांच्या माध्यमातून प्रयत्न केले जात आहेत, मात्र काही महिला आपला मतदानाचा हक्क बजावत नाही असे निदर्शनास आले आहे.

        महिलांना मतदानासाठी प्रोत्साहित करावे व त्यांच्या मनात असलेली शंका-कुशंका काढून टाकावी यासाठी जिल्हा प्रशासनाने पुढाकार घेऊन भंडारा-गोंदिया लोकसभा मतदानसंघातील 43 मतदान केंद्र महिलांच्या सुपूर्द केले आहे. म्हणजेच या मतदान केंद्रांच्या मतदान केंद्र अधिकाऱ्यांपासून ते त्यांच्या सहकारी कर्मचाऱ्यांची सर्व जबाबदारी महिलाच सांभाळणार आहेत.

         ज्या मतदान केंद्रात पुरुष मतदारांच्या तुलनेत महिला मतदारांची संख्या जास्त आहे अशा ठिकाणी साधारणत: महिला मतदान केंद्राची निर्मिती करण्यात आलेली आहे. लोकशाही बळकट करण्यासाठी जास्तीत जास्त महिलांनी निवडणूक प्रक्रियेत सहभागी होऊन आपला मतदानाचा हक्क बजवावा हा या केंद्रांच्या निर्मितीमागील उद्देश आहे.

         अशी आहेत महिला मतदान केंद्र :– 63-अर्जुनी मोरगाव विधानसभा मतदारसंघ : 98-खजरी, 112-वडेगाव/सडक, 128-कोदामेडी, 133-डुग्गीपार, 107-बाम्हणी/सडक,  257-निलज, 239-झरपडा, 245-तावशी, 251-अर्जुनी मोरगाव, 267 मालकनपूर. 64-तिरोडा विधानसभा मतदारसंघ : 72-तिरोडा, 74-तिरोडा, 78-तिरोडा, 83-तिरोडा, 85-तिरोडा, 121-चुरडी, 192-निमगाव, 252-कुऱ्हाडी, 262-कटंगी, 265-गोरेगाव, 275-हिरडामाली, 285-घोटी. 65-गोंदिया विधानसभा मतदारसंघ : 93-पांढराबोडी कॉलेज टोली, 94-पांढराबोडी कॉलेज टोली, 225-गोंदिया, 226-गोंदिया, 227-गोंदिया, 228-गोंदिया, 232-गोंदिया, 233- गोंदिया, 257-गोंदिया, 258-गोंदिया, 259-गोंदिया. 66-आमगाव विधानसभा मतदारसंघ : 59-रिसामा, 78-आमगाव, 80-आमगाव, 82-आमगाव, 84-आमगाव, 171-सालेकसा, 241-देवरी, 243-देवरी, 247-देवरी, 249-देवरी.

          आपल्या देशाला एक सशक्त राष्ट्र बनविण्यासाठी सर्वांनी मतदान करणे गरजेचे आहे. जिल्हा प्रशासनाकडून मतदान करण्यासाठी जनजागृती करण्यात येत असली तरी प्रत्येक नागरिकांनी स्वयंस्फुर्तीने मतदान करण्यासाठी पुढे येण्याची गरज आहे. मतदान करणे हा आपला मुलभूत अधिकार असून त्याची प्रत्यक्षरित्या अंमलबजावणी करणे हे आपले सर्वांचे कर्तव्य आहे. त्यामुळे जिल्ह्यातील 18 वर्षे पूर्ण झालेल्या प्रत्येक नागरिकांनी सर्व कामे दूर सारुन 19 एप्रिल रोजी मतदान करुन आपला मतदानाचा हक्क बजावून जिल्ह्याची मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी आपले योगदान द्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी प्रजित नायर यांनी केले आहे.