विभागीय आयुक्त डॉ. पाण्डेय यांनी घेतला निवडणूक पूर्वतयारीचा आढावा

0
3
निवडणूक प्रक्रिया पारदर्शक, नि:ष्पक्ष व भयमुक्त वातावरणात
पार पडण्यासाठी जबाबदारीने प्रयत्न करा
  – विभागीय आयुक्त डॉ. निधी पाण्डेय
वाशिम/अमरावती, दि. 17 : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या दुसऱ्या टप्प्यासाठी अमरावती विभागातील चार लोकसभा मतदारसंघात 26 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. तर दि. 4 जूनला मतमोजणी होऊन निकाल जाहीर होणार आहे. याअनुषंगाने भारत निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक तत्वांनुसार प्रत्येक नियमांचे व सूचनांचे विभागातील सर्व जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी काटेकोर पालन करुन निवडणूक प्रक्रिया पारदर्शक, नि:ष्पक्ष व भयमुक्त वातावरणात पार पडण्यासाठी जबाबदारीपूर्वक प्रयत्न करावे, अशा सूचना विभागीय आयुक्त डॉ. निधी पाण्डेय यांनी संबंधित जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांना आज दिल्या.
विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने निवडणूक पूर्वतयारीचा आढावा विभागीय आयुक्तांनी आज घेतला. त्यावेळी त्या बोलत होत्या. उपायुक्त संजय पवार, समाजकल्याण प्रादेशिक उपायुक्त सुनील वारे, विधी अधिकारी प्रत्यक्षरित्या तसेच पाचही जिल्ह्यांचे जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी व उपजिल्हा निवडणूक अधिकारी दूरदृश्यप्रणालीच्या माध्यमातून बैठकीला उपस्थित होते.
श्रीमती पाण्डेय म्हणाल्या की, लोकशाहीच्या सक्षमीकरणासाठी प्रत्येक मतदाराचे मतदान महत्त्वपूर्ण व निर्णायक आहे. प्रत्येकाने मतदानाचा हक्क बजाविल्याशिवाय लोकशाहीला पूर्णत्व नाही. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने राज्यघटनेने दिलेल्या मतदान करण्याच्या अधिकाराचा वापर करावा. पुढे बोलतांना त्या म्हणाल्या की, मतदार जागृती व साक्षरतेसाठी स्वीप मोहिमे अंतर्गत विविध उपक्रम राबविण्यात यावे. युवा मतदारांना मतदानाच्या राष्ट्रीय उत्सवात उत्स्फूर्तपणे सहभागी होण्यासाठी प्रोत्साहीत करावे. जिल्ह्यातील ज्येष्ठ व दिव्यांग मतदारांचे गृहमतदान अधिक प्रमाणात होण्यासाठी प्रयत्न करावे. आदर्श आचारसंहितेचे उमेदवारांकडून काटेकोरपणे पालन होत असल्याची खात्री करावी, अशा सूचना डॉ. पाण्डेय यांनी केल्या.
            मतदान केंद्रे, मतदारांची माहिती, मतदानाची ठिकाणे व तेथील व्यवस्था, माध्यम सनियंत्रण व प्रमाणिकरण समिती, प्रशिक्षण कार्यक्रम, मनुष्यबळ, आचारसंहिता कक्ष, सीव्हीजील ॲप, खर्च सनियंत्रण समिती पथक, आदर्श आचारसंहितेचे पालन, कायदा व सुव्यवस्थेच्या अनुषंगाने जिल्ह्यांच्या सीमावर्ती भागात चेकपोस्टव्दारे तपासणी, वनविभागाचे चेकपोस्ट, उमेदवारांच्या निवडणूक खर्चाची तपासणी, राजकीय प्रचाराच्या जाहिराती व चित्रफीतींचे माध्यम प्रमाणिकरण व सनियंत्रण समितीकडून पूर्व प्रमाणिकरण, पेड न्यूज आदी लोकसभा निवडणूक अनुषंगाने विविध विषयांचा विभागीय आयुक्तांनी संबंधित जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांकडून सविस्तर आढावा घेतला.