पालकांनी जागृत राहून बालकांचे नियमीत लसीकरण करावे- जिल्हाधिकारी

0
4
  • जिल्हा टास्कफोर्स समितीची सभा

       गोंदिया, दि.29 : बालमृत्यू व कुपोषण रोखण्यासाठी लसीकरण हे एक प्रभावी साधन आहे. सर्व आजारांवर लढण्यासाठी बाळाला जन्मापासूनच वेगवेगळ्या वयोगटात लसीकरण दिल्यास रोगाविरुध्द लढण्यासाठी प्रतिकारशक्ती निर्माण होते. त्यामुळे आरोग्य विभागाने जिल्ह्यातील प्रत्येक गावात लसीकरण सत्राचे आयोजन करुन कोणताही बालक लसीकरणापासून वंचित राहणार नाही यादृष्टीने नियोजन करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी प्रजित नायर यांनी दिले.

          जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आज नियमीत लसीकरण सक्षमीकरण कार्यक्रमांतर्गत जिल्हा टास्कफोर्स समितीची सभा आयोजित करण्यात आली होती, त्यावेळी ते बोलत होते. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.नितीन वानखेडे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अमरीश मोहबे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (महिला व बालकल्याण) संजय गणवीर, जिल्हा माता व बाल संगोपन अधिकारी डॉ.रोशन राऊत व पोलीस निरीक्षक दिनेश लबडे यांची यावेळी प्रामुख्याने उपस्थिती होती.

          जिल्हाधिकारी श्री. नायर म्हणाले, बाळ जन्मल्याबरोबर अर्ध्या तासात केलेले स्तनपान म्हणजे बाळाचे पहिले लसीकरण होय. लसीकरणामुळे आजाराची तीव्रता कमी करण्यास मदत होते, त्यामुळे बाळाची रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी नियमीत लसीकरण करणे आवश्यक आहे. प्रत्येक पालकांनी आपल्या बालकांचे आरोग्य सुदृढ ठेवण्यासाठी शासकीय रुग्णालयात मोफत लसीकरण करुन बालकांचे सुरक्षा कवच म्हणून नियमीत लसीकरण करावे असे त्यांनी सांगितले.

          नियमीत लसीकरण सक्षमीकरण कार्यक्रमाचे सादरीकरण जिल्हा माता व बालसंगोपन अधिकारी डॉ.रोशन राऊत यांनी केले. जिल्ह्यात सर्व शासकीय आरोग्य संस्थेत बीसीजी, हिपॅटायटीस-बी, पोलिओ, पेंटाव्हॅलंट, रोटा व्हायरस, पीसीव्ही, आयपीव्ही, गोवर-रुबेला, जेई, डीपीटी, व्हिटॅमीन-अ डोज इत्यादी विविध प्रकारचे लसीकरण मोफत दिले जात आहे असे त्यांनी सांगितले.

         सभेला सर्व तालुका आरोग्य अधिकारी, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक, केटीएस जिल्हा सामान्य रुग्णालयाचे तसेच बाई गंगाबाई स्त्री रुग्णालयाचे व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे वैद्यकीय अधिकारी व बालरोग्य तज्ञ, तसेच जिल्हा परिषदेचे प्रचार व प्रसिध्दी अधिकारी प्रशांत खरात उपस्थित होते.