आपत्तीवर मात करण्यासाठी यंत्रणांनी सज्ज राहावे-जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस.

0
7
मान्सूनपूर्व आढावा सभेत आपत्ती व्यवस्थापन माहितीपत्रकाचे जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते विमोचन
वाशिम, दि. २९ : पावसाळ्याच्या दिवसात येणाऱ्या आपत्तीवर मात करण्यासाठी यंत्रणांनी सज्ज राहावे.असे निर्देश जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस.यांनी दिले.आज २९ एप्रिल रोजी मान्सूनपूर्व तयारीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयातील वाकाटक सभागृहात जिल्हाधिकारी श्रीमती बुवनेश्वरी एस. यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली यावेळी त्या बोलत होत्या.सभेला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी वैभव वाघमारे, सहाय्यक जिल्हाधिकारी अपूर्वा बासूर व निवासी उपजिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे यांची प्रमुख उपस्थिती होती.
           श्रीमती बुवनेश्वरी म्हणाल्या, पावसाळ्याच्या दिवसात संपर्क तुटणाऱ्या गावांना पुरेशा प्रमाणात धान्य पुरवठा करण्यासाठी नियोजन करावे.जिल्ह्यातील सर्व प्रकल्पाचे स्ट्रक्चर सुस्थितीत असल्याची खात्री संबंधित विभागाने करावी.विजेला अटकाव करणारी यंत्र सुस्थितीत असावी. नादुरुस्त स्थितीत असलेली विज अटकाव यंत्र तात्काळ दुरुस्त करून घ्यावीत. शहरी व ग्रामीण भागातील नाले सफाई त्वरित करण्यात यावी. त्यामुळे वस्तीत पावसाळ्याच्या दिवसात पाणी साचणार नाही. धोकादायक इमारती व झाडांची पाहणी करुन योग्य ती कार्यवाही करावी.पाटबंधारे व जलसंपदा विभागाने आपल्या प्रकल्पावर बिनतारी संदेश यंत्रणा कार्यान्वीत करुन सूचना फलक लावावे.असेही त्यांनी यावेळी सांगितले.अंगणवाड्या व शाळेच्या ईमारतींची आवश्यक त्या दुरुस्त्या करण्यात याव्यात. शालेय पोषण आहार मुबलक प्रमाणात उपलब्ध करून ठेवावा.
           पावसाळ्याच्या दिवसात आरोग्य विभागाने राहणे आवश्यक असल्याचे सांगत श्रीमती बुवनेश्वरी म्हणाल्या की, जलजन्य आजाराला आळा घालण्यासाठी आवश्यक तेवढा औषधीसाठा प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रात उपलब्ध असावा. पावसाळ्याच्या आधी पीएचसी/आर एचसीच्या इमारतींची डागडुजी करून घ्यावी.प्रसुतीगृहाचे वाटर प्रुफींग करावे . गरोदर मातांची गैरसोय होणार नाही याची दक्षता घ्यावी. स्वच्छतेबाबत जनजागृती करावी.नियंत्रण कक्ष स्थापन करुन आरोग्य पथके सज्ज ठेवावी.वीज वितरण कंपनीने वाकलेले पोल व तारेवरच्या झाडांच्या फांद्या वेळीच तोडाव्यात. तोडलेल्या फांद्याची व्यवस्थित विल्हेवाट लावावी. दुरुस्ती पथके तैनात करावी.रस्त्यावरील धोकादायक वाळलेली झाडे तोडणे,पीकाच्या नुकसानीचे मोजमाप व सर्वेक्षण करण्यासाठी संबंधित विभागाने आपली जबाबदारी पार पाडावी.
           शोध व बचाव साहित्य सुस्थितीत असल्याची खात्री करावी, ज्या गावांना व शहरातील वार्डाना अतिवृष्टीचा धोका पोहचू शकतो, अशा ठिकाणची नालेसफाई तातडीने करण्यात यावी.तालुका नियंत्रण कक्ष कार्यरत ठेवून तेथील दूरध्वनी सुरु असल्याची खात्री करावी. तालुकास्तरावर या काळात सेवाभावी संस्थांची मदत घेण्यासाठी त्याच्या संपर्कात राहावे.अतिवृष्टीमुळे गावात गावतलावाचे पाणी येणार नाही यासाठी गावपातळीवर उपाययोजना करण्याचे काम गट विकास अधिकारी यांनी करावे.
           मान्सूनपूर्व तयारीची माहिती श्री.घुगे यांनी दिली. जानेवारी ते डिसेंबर २०२३ या कालावधीत जिल्ह्यात ९४२.०८ मि.मी असा १०६.४५ टक्के पाऊस झाला.जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे पैनगंगा नदीला येणाऱ्या पुराच्या पाण्याच्या वेढयामुळे वाशिम तालुक्यातील उकळीपेन आणि रिसोड तालुक्यातील बाळखेड,पेनबोरी व चिचांबापेन आणि नाल्याला येणाऱ्या पुरामुळे मंगरुळपीर तालुक्यातील बोरव्हा (खु) या गावाचा नेहमी संपर्क तुटतो.नदी व अतिवृष्टीमुळे १५६ गावे व वार्डांना धोका पोहचतो.जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडून शोध व बचाव पथकासाठी तालुकानिहाय उपलब्ध असलेल्या साहित्याची माहिती यावेळी श्री. घुगे यांनी दिली.
   यावेळी जिल्हा आपत्त्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने तयार केलेल्या भिंतीपत्रीकेचे विमोचन जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते करण्यात आले. सभेदरम्यान उष्मा लाटेसंदर्भात आढावाही घेण्यात आला.या सभेला वाशिम उपविभागीय अधिकारी वैशाली देवकर , कारंजाचे उपविभागीय अधिकारी कैलास देवरे, मंगरूळपीर उपविभागीय अधिकारी राजेंद्र जाधव, सर्व तहसिलदार, सर्व गट विकास अधिकारी व नगरपरिषद/नगरपंचायतचे मुख्याधिकारी व सेवाभावी संस्थेचे श्याम सवाई, गजानन मेसरे व जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी शाहू भगत यांच्यासह विविध यंत्रणा प्रमुखांची उपस्थिती होती.