गोंदिया,दि.०८ ः ठरवून दिलेले सर्वसाधारण क्षेत्र वगळता राखीव क्षेत्रात शिरून तेंदूपत्ता संकलनाचे काम जोमात सुरू आहे. या प्रकाराला संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांचेही पाठबळ असल्याचे बोलले जाते. त्यामुळे जंगले व वन्यप्राण्यांचे अस्तीत्व धोक्यात आले आहे.
दरवर्षी तेंदूपत्ता संकलनातून कोट्यवधी रुपयांचे व्यवहार होतात, टेंडर काढले जातात, त्यानुसार मजूर रोज पहाटे किंवा सकाळी जंगलात जातात, तेंदूपत्ता गोळा करतात आणि तेंदू युनिटमध्ये विकतात. शंभर पुड्यांवर २८५ ते ३०० रुपये मिळतात. तथापि, सर्वात मोठा रोजगार देणारा हंगाम असल्याने मजुरांना मोठा दिलासा मिळाला आहे. परंतु, ठराविक
सर्वसाधारण क्षेत्र वगळता राखीव क्षेत्रातून तेंदूपत्ता संकलन केले जात आहे. हा प्रकार नवेगाव-नागझिरा अभयारण्याअंतर्गत येणाऱ्या मंगेझरी, कोडेबर्रा, बोदलकसा व परिसरात सर्रास सुरू आहे. मजूर मोठ्या संख्येने राखीव क्षेत्रात शिरून तेंदूपत्ता संकलन करीत आहेत. जंगलात वाघ, बिबट, अस्वल, रानगवा अशा हिंस्त्रपशुंचा अधिक वावर आहे. त्यामुळे मजुरांसह या
वन्यजीवांनाही धोका आहे. वन्यप्राणी-मनुष्य असा आधीपासून असलेला संघर्ष पुन्हा चव्हाट्यावर येण्याची शक्यता आहे. मागील वर्षी अशीच एक घटना घडली होती. त्यात एका महिलेचा वाघाने जीव घेतला होता.
वन्यप्राण्यांचे हल्ले या हंगामात हमखास होत असले तरी, टेंडर घेणारे संबंधित अधिकाऱ्यांच्या संगणमताने मजुरांना खुली सुट देत आहेत. हे मजूर राखीव क्षेत्रात शिरून तेंदूपत्ता संकलन करत आहेत. मग वन्यप्राण्याने हल्ला केल्यास, जीव गेल्यास कोण जबाबदार राहणार हा खरा प्रश्न आहे. विशेष म्हणजे, काही दिवसांपूर्वी तिरोडा वनविभागाअंतर्गत येणाऱ्या
राखीव क्षेत्रात तेंदूपत्ता संकलन करणाऱ्या काही मजुरांना वनविभागाने पकडले होते. परंतु, टेंडर घेणाऱ्याच्या दबावापोटी अधिकाऱ्यांनी कारवाई न करता त्यांना अभय दिले. यात मजुरांचा दोष नाही. मात्र, त्यांना राखीव जंगलात तेंदूपत्ता संकलन करण्यासाठी पाठविणाऱ्यांवर कारवाई होणे अपेक्षित आहे. परंतु, अधिकाऱ्यांचे पाठबळ असल्यामुळे कारवाई टाळली
जात असून, राखीव क्षेत्रात तेंदूपत्ता संकलन करण्यास खुली सुट दिली जात आहे.
वन्यजीवांसह मजुरांच्याही जीवाला धोका
राखीव क्षेत्रात मजूर तेंदूपत्ता संकलन करीत आहेत. त्यामुळे या क्षेत्रात वावर असलेल्या वन्यजीवांपासून मजुरांच्या जीवाला अधिक धोका आहे. सोबतच जंगले विरळ होत असल्याने वन्यजीव गावाकडे मोर्चा वळवित आहेत. त्यामुळे वन्यजीवांची शिकारही होण्याची शक्यता अधिक आहे.
सर्वसाधारण क्षेत्रातच तेंदूपत्ता संकलन करावे, अशा सूचना मजुरांना दिल्या आहेत. मात्र, ते राखीव क्षेत्रात शिरून तेंदूपत्ता संकलन करतात, हे खरे आहे. पुढे असे होऊ नये, याकरिता सक्त ताकीद दिली जाईल.
-राघवेंद्र मून, आरएफआे, तिरोडा.