विशेष सर्वेक्षण मोहिमेतुन डेंग्यु जनजागृती
डासांची उत्पत्ती रोखा आणि हिवताप,डेंग्यू आणि तापाच्या प्रादुर्भावाला दूर हटवा
घरी येणार्या पथकाला सहकार्य करण्याचे आवाहन
गोंदिया,दि.१३ः- जिल्ह्यात अनेक भागात डेंग्यू, चिकनगुण्या, हिवताप आणि तापाचा प्रादुर्भाव दिसत असतो.जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे गावोगावी पाणी साचण्याचे डबके तयार झालेले दिसत आहे. पाणी साचण्याच्या जागेत डासांची उत्पत्ती होते. यामुळे नागरिकांनी परिसर स्वच्छता, कोरडा दिवस पाळणे आणि घराजवळ पाणी साचण्याच्या जागा नष्ट कराव्यात, जेणेकरून डासांची उत्पत्ती होणार नाही, याची काळजी घेण्याचे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.नितीन वानखेडे यांनी केले आहे.
आरोग्य विभाग, जिल्हा हिवताप विभाग डेंग्यू, चिकनगुण्या आणि तापाचा प्रादुर्भाव होऊ नये, यासाठी सर्वतोपरी प्रयत्नशील आहे. कीटकजन्य आजार नियंत्रणासाठी जिल्ह्यात 15 मे ते 30 मे दरम्यान विशेष सर्वेक्षण मोहिम राबविण्यात येत असल्याची माहिती जिल्हा हिवताप अधिकारी डॉ.विनोद चव्हाण यांनी दिली आहे. सदर मोहिमे दरम्यान आरोग्य कर्मचारी, आरोग्य सेविका, आशा सेविका कार्यक्षेत्रातील प्रत्येक गावात घरांना भेटी देऊन कीटकशास्त्रीय सर्वेक्षण करणार आहे. घरातील वापरण्यासाठी भरण्यात येणारे पाणी साठे तपासुन पाणीसाठ्यात डासाच्या अळ्या आढळून आल्यास ती भांडी रिकामी करणार आहेत.रिकामे करता न येणाऱ्या पाणी साठ्यामध्ये टेमिफॉस किंवा बेटचे द्रावण टाकणार आहे. तरी घरी येणार्या पथकाला सहकार्य करण्याचे आवाहन आरोग्य प्रशासनातर्फे करण्यात येत आहे.
एडीस एजिप्ती डासाची उत्पती साठवलेल्या स्वच्छ पाण्यात होत असल्याने आरोग्य कर्मचाऱ्यांच्या मार्फत कंटेनर तपासणी करण्यात येत आहे.
डॉ. विनोद चव्हाण यांनी डेंग्यूबाबत दिलेली माहिती पुढीलप्रमाणे, डेंग्यू हा एक विषाणूमुळे होणारा आजार आहे. या विषाणूंचे चार उपप्रकार आहेत. एडिस इजिप्ती व एडिस अलेबोपिक्टस या डासांच्या चाव्यामुळे हा रोग पसरतो. संक्रमणात्मक डासाच्या चाव्यानंतर पाच-सहा दिवसानंतर मनुष्याला आजार होतो. डेंग्यू हा सामान्यतः आपोआप बरा होणारा रोग आहे. बहुतांश रुग्ण बरे होतात. डेंग्यू ताप, डेंग्यू रक्तसावी ताप, डेंग्यू शॉक सिंड्रोम अशा तीन प्रकारे होवु शकतो. डेंग्यू रक्तस्रावात्मक ताप अधिक तिव्र स्वरुपाचा आजार असुन यामुळे मृत्यू ओढवू शकतो.
डेंग्यू ताप-
लहान मुलांमध्ये मुख्यतः सौम्य स्वरूपाचा ताप येतो. मोठ्या माणसांमध्ये अधिक तीव्रतेचा ताप असतो. सोबत डोके डोळे दुखणे, अंगदुखी, अशक्तपणा, चव आणि भूक न लागणे, मळमळणे, उलट्या, अंगावर लाल रंगाचा चट्टा येऊ शकतो. अंगदुखी तीव्र स्वरूपात असू शकते म्हणून याला हाडे मोडणारा ताप असेही म्हणतात.
डेंग्यू रक्तस्रावात्मक ताप-
हा गंभीर स्वरूपाचा प्रकार असून यात तापाबरोबरच बाह्य रक्तसाव चट्टे उठणे, हिरड्यांमधून रक्तसाव, अंतर्गत रक्तसाव, आतड्यांमधून रक्तस्राव, प्लेटलेट्सची संख्या कमी होणे, रक्कासह किंवा रक्ताविना वारंवार उलट्या होणे, श्वास घेताना त्रास इत्यादी प्रकार होऊ शकतात. तसेच छातीत, पोटामध्ये पाणी जमा होऊ शकते. बाकी लक्षणे डेंग्यू तापाप्रमाणेच असतात.
डेंग्यू शॉक सिंड्रोम–
ही डेंग्यू रक्तस्त्राराच्या तापाचीच पुढची अवस्था असून काही टक्के लोकांमध्येच हि दिसून येते. यात रुग्णाचे अस्वस्थ होणे,थंड पडणे, नाडी मंदावणे किंवा अती जलद होणे, रक्तदाब कमी होणे आणि शेवटी मृत्यू ओढवू शकतो.
उपचार-
डेंग्यु विषाण्युजन्य आजार असल्याने विशिष्ट औषधोपचार नाहीत, मात्र लक्षणे आणि चिन्हानुसार औषधे दिली जातात. ताप आणि अंगदुखी कमी करण्यासाठी वेदनाशामक पॅरासिटीमॉल औषध गुणकारी आहे. स्पिरीन, ब्रुफेन, स्टिरॉइडस, प्रतिजैविके औषधे वापरू नयेत. रुग्णाच्या शरीरातील पाणी, रक्ताचे प्रमाण कमी झाल्यास शिरेवाटे काढून अथवा प्लेटलेटस देणे गरजेचे असते. दुसऱ्या आणि तिसऱ्या प्रकारातील रूग्णाला तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली त्वरित उपचार द्यावे लागतात..
डासांच्या आजारापासून असे राहा दूर
* आठवड्यातून एक दिवस सर्वांनी कोरडा दिवस पाळावा.
* घरासमोर पाणी साचू देऊ नका, घर व परिसर स्वच्छ ठेवा.
* पाण्याचे टँक तथा बैरेल स्वच्छ ठेवा, टँक उघडे ठेवू नका.
* सायंकाळी दरवाजे, खिडक्या बंद करून ठेवाव्यात; खिडक्यांना जाळ्या बसवाव्यात.
* झाडांच्या कुंड्यांत पाणी साचू देऊ नका; त्या ठिकाणी स्वच्छता ठेवा.
* घरातील फ्रिज, कुलरमधील पाणी वारंवार बदलावे.
डेंग्यू कसा ओळखाल
* सर्दी, ताप आणि वारंवार खोकला येतो.
* अंगावर लहान-लहान पुरळ येतात.
* जेवल्यावर अथवा जेवण केलेले नसतानाही उलट्या अन् मळमळ होते.
* रक्तातील प्लेटलेट्स कमी होऊन अशक्तपणा जाणवतो.
* घरासमोर झाडे लावल्यानंतर नागरिकांनी त्या कुंड्यांत पाणी साचू देऊ नये. डासांच्या बहुतेक अळ्या त्याच ठिकाणी आढळतात. आरोग्य विभागातर्फे उपाययोजना सुरू आहेत, परंतु नागरिकांनी खबरदारी म्हणून घर व परिसर स्वच्छ ठेवावा. पाणी उघडे ठेवू नये, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नितीन वानखेडे यांनी केले आहे.
डेंग्यु ला रोखणे हे केवळ आरोग्य विभागाचे काम नसून त्यासोबत इतर विभाग जसे शिक्षण ,बांधकाम, ग्रामपंचायत, महिला व बालकल्याण, पाणीपुरवठा व स्वच्छता, नगरपरिषद/ पंचायत, विविध पदाधिकारी, राजकीय पदाधिकारी, प्रतिभावंत, समाजसेवक या सर्वांनी एकत्रितपणे काम केल्यास निश्चितच डेंग्यु वर नियंत्रण मिळवु शकतो. जिल्ह्यात सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रातील समुदाय आरोग्य अधिकारी, आरोग्य सेविका, आरोग्य सेवक ,आशा सेविका आपल्या कार्यक्षेत्रातील गावांमध्ये प्रतिबंधात्मक उपाययोजना स्वतः व लोकांकडून करीत आहेत. जिल्ह्यात प्रत्येक आरोग्य संस्थेत डेंग्यू प्रतिबंधात्मक बॅनर वितरित करण्यात आलेली असून व्यापक प्रमाणात जनजागृती करण्यात येत आहे. पण गरज आहे ती लोकसहभागाची. स्वतः लोकांनी जागृत झाल्यास नक्कीच डेंग्यु वर नियंत्रण मिळवता येत असल्याचे प्रतिपादन डॉ. वानखेडे यांनी केले आहे.
कीटकजन्य आजार नियंत्रणासाठी जिल्ह्यात 15 मे ते 30 मे दरम्यान विशेष सर्वेक्षण मोहिम राबविण्यात येणार आहे.लोकांनी स्वंयमपुर्तीने कंटेनर सर्वेक्षण,डासोत्पत्ती स्थाने नष्ट करणे,कोरडा दिवस पाळणे, डासोत्पत्ती स्थानकामध्ये गप्पी मासे सोड्णे ई. विविध उपक्रम लोकसहभागातुन लोकांनी राबवुन आरोग्य विभागाला सहकार्य करावे.