मागासांच्या कल्याणासाठी झटणारे शाहू महाराज हे आदर्श समजासुधारक -बडोले

0
14

सामाजिक न्याय दिन साजरा
गोंदिया दि.२7 :- धर्माच्या आणि जातीच्या पलीकडे जाऊन छत्रपती शाहू महाराजांनी दलीत, बहुजन व इतर समाजाच्या कल्याणासाठी आयुष्य वेचले. या समाजासाठी आपल्या संस्थानात आरक्षणाची तरतूद केली. मागास घटकांच्या कल्याणासाठी झटणारे शाहू महाराज हे आदर्श समाजसुधारक होते. असे प्रतिपादन पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी केले.
रविवारी छत्रपती शाहू महाराज यांची १४३ वी जयंती सामाजिक न्याय दिन म्हणून सामाजिक न्याय भवनात साजरी करण्यात आली. यानिमित्ताने आयोजित कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून पालकमंत्री बडोले बोलत होते. अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष श्रीमती उषा मेंढे होत्या. प्रमुख अतिथी म्हणून जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, अपर जिल्हाधिकारी मंगेश मोहिते, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जयवंत पाडवी, जि.प. समाज कल्याण समिती सभापती देवराज वडगाये यांची तर मंचावर समाज कल्याणचे सहायक आयुक्त मंगेश वानखेडे, प्रभारी जिल्हा समाज कल्याण अधिकारी मिलींद रामटेके यांची उपस्थिती होती.
थोर समाजसुधारकांच्या विचारांचे प्रत्यक्षात आचरण प्रत्येकाने केले पाहिजे असे सांगून श्री. बडोले म्हणाले, संपूर्ण समाज शिक्षीत झाला पाहिजे. शिक्षणाशिवाय पर्याय नाही. डॉ. आंबेडकरांना लंडन व कोलंबिया येथे उच्च शिक्षण घेण्यासाठी शाहू महाराजांनी आर्थिक मदत केली. विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी शाळा व वसतीगृहे शाहू महाराजांनी उघडली. भविष्यात जिल्हयातील बेरोजगार युवक/युवतींना रोजगार किंवा नोकरी मिळावी यासाठी जिल्हयात स्पर्धा परिक्षांची तयारी करण्यासाठी स्पर्धा परिक्षा मार्गदर्शन केंद्र सुरु करण्यात येईल. ओबीसीच्या शिष्यवृत्तीबाबतच्या अडचणी सोडविण्यात येतील. येणाऱ्या काही दिवसांमध्ये ओबीसींची क्रिमीलेअरची मर्यादा साडेचार लाख रुपयांवरुन ६ लाख करण्यात येईल. भटक्या जाती, जमातींच्या लोकांना जातीचे प्रमाणपत्र देण्याचा कार्यक्रम हाती घ्यावा. जिल्हयातील ढिवर व भोई बांधवांच्या वस्त्यांच्या तांडा वस्ती सुधार योजनेतून कायापालट करण्यात येईल. असेही त्यांनी सांगितले.
अध्यक्षस्थानावरुन बोलतांना श्रीमती मेंढे म्हणाल्या, समाजातील विविध घटकांनी सामाजिक न्याय विभागाच्या योजनांचा लाभ घ्यावा. शाहू महाराजांनी त्याकाळी सुरु केलेल्या विविध योजना शासन आजही राबवित आहे. समाज कल्याण विभागाच्या योजना सामाजातील ८० टक्के लोकांसाठी आहे. या योजनांचा लाभ घेवून प्रगती करावी. मुलामुलींनी उच्च शिक्षण घेवून युपीएससी, एमपीएससीसारख्या परिक्षेत यश मिळवून समाजाची सेवा करावी. असेही त्या म्हणाल्या.
डॉ. पुलकुंडवार म्हणाले, समस्यांच्या गर्तेत खितपत पडलेल्या समाजाला दिशा देण्याचे काम शाहू महाराजांनी केले. संविधानात वंचित घटकांच्या कल्याणाच्या तरतुदी नसत्या तर समाज कुठे असता हा प्रश्न आहे. शिका, संघटीत व्हा आणि संघर्ष करा हा मुलमंत्र बाबासाहेबांनी दिला. या मुलमंत्राचे आचरण प्रत्येकाने करावे. संविधानाची जाण प्रत्येकाला असली पाहिजे. मुलभूत कर्तव्याची जाणीव प्रत्येकास असली पाहिजे.
यावेळी पालकमंत्र्यांच्या हस्ते सामाजिक न्याय विभागाच्या निवासी शाळेत शिक्षण घेऊन १० वी व १२ वीच्या परिक्षेत चांगल्याप्रकारे उत्तीर्ण झालेल्या कुलदिप वैद्य, मुनेश्वर कोसमे, हर्षल रामटेके, देवयाणी चव्हाण, अंजली वालदे, करिष्मा रहांगडाले, जितेश जांभुळकर, अमित साखरे, मंजुषा नंदागवळी, शिवाणी वगारे, प्रिया राऊत यांचा तर निवासी शाळेचा १०० टक्के निकाल लागल्याबद्दल मुख्याध्यापिका बबिता हुमणे, संध्या दहीवले यांचा सत्कार करण्यात आला. अनुसूचित जाती जमाती अन्याय अत्याचार प्रतिबंधक कायदयांतर्गत श्रीमती शकुंतला तांडेकर यांना मदतीचा धनादेश, इतर मागासवर्ग विकास महामंडळाच्या वतीने व्यवसाय सुरु करण्यासाठी कमलेश पारधी यांना बीज भांडवल धनादेश, महात्मा फुले मागासवर्ग विकास मंडळाचे व्यवसायासाठी अनुदानाचा धनादेश नितू बागडे, विद्यासागर खोब्रागडे, कैलास बन्सोड यांना, अंपग वित्त व विकास महामंडळाच्या योजनेचा धनादेश संजय हरकुंडे, बबिता मेश्राम, गणीता बघेले यांना तर आंतरजातीय विवाह प्रोत्साहन योजनेअंतर्गत इंद्रकुमार सांगोळे-दिक्षा ब्रम्हे, उमेश शहारे- दिपलता गायकवाड, निखील मेश्राम-ज्योती मेश्राम यांच्यासह ७ जोडप्यांनी आंतरजातीय विवाह केल्याबद्दल प्रत्येकी ५० हजार रुपयांचे धनादेश या जोडप्यांना पालकमंत्री बडोले यांच्या हस्ते वितरीत करण्यात आले.
कार्यक्रमाला सुनिल केलनका, भरत क्षत्रिय, दलितमित्र डॉ. राऊत, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजकुमार पुराम, प्रा. संगिता घोष यांचेसह विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी, सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, स्पर्धा परिक्षांची तयारी करणारे युवक-युवतीं तसेच नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. प्रास्ताविक सहायक आयुक्त मंगेश वानखेडे यांनी संचालन सविता बेदरकर यांनी केले तर उपस्थितांचे आभार मिलींद रामटेके यांनी मानले.