मानवतावादी विचार आत्मसात करण्याचा संकल्प घ्या -सावन कटरे

0
16

दिवंगत पेमेंद्र चव्हाण यांना श्रद्धांजली

गोंदिया ता. 9 जून :-तथागत बुद्धाने आत्मा, ईश्वर, स्वर्ग,आदि नाकारले आहे,त्यांनी समताधिष्टीत समाज व्यवस्था निर्माण करण्याची शिकवण दिली. तेव्हा बुद्ध तत्वज्ञानावर आधारित मानवतावादी विचारांचा समाज निर्माण करण्याचा संकल्प घ्या असे आवाहन ओबीसी चळवळीचे नेते सावन कटरे यांनी (ता. 9) केले.
येथील बुद्धिस्ट समाज संघ प्रणित संथागारात आयोजित ओ बी सी चळवळीचे प्रणेते दिवंगत पेमेंद्र चव्हाण सर यांच्या श्रद्धांजली कार्यक्रमात ते मुख्य मार्गदर्शक म्हणून बोलत होते.मंचावर सामाजिक कार्यकर्ते उमेश कोराम, श्रीमती माधुरी पेमेंद्र चव्हाण, सेवानिवृत्त तलाठी मुकेश मेश्राम उपस्थित होते.या कार्यक्रमाचे आयोजन सामाजिक कार्यकर्त्या आयुष्मती अल्का सुनील भरणे यांनी केले होते.
पुढे बोलताना श्री कटरे आणि श्री कोराम यांनी पेमेंद्र सरांच्या जीवनावर प्रकाश टाकला. याप्रसंगी श्रीमती माधुरी पेमेंद्र चव्हाण यांना समृतचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन त्यांचं सांत्वन करण्यात आले. दरम्यान श्रीमती अल्का भरणे यांच्यावतीने भोजन दान देण्यात आले. त्यानंतर इंजि. अरविंद माळी यांच्या कॅडर कॅम्पचे आयोजन करून बुद्ध फुले आंबेडकरी विचारातून समाज घडविण्याची प्रेरणा देण्यात आली.कार्यक्रमाचे संचालन गौतम गजभिये यांनी करून, माझेही भले हो तुमचेही कल्याण हो या संकल्प प्रार्थनेने कार्यक्रमाची सांगता झाली.

OBC समाजात जन्मलेले आणि पेशाने शिक्षक असलेले पेमेंद्र चव्हाण यांचे बुधवारी 3 जून रोजी नागपूरच्या एका
इस्पितळात अल्पशा आजाराने निधन झाले.त्यांचं हृदय हे फुले आंबेडकरी विचाराने अथांग भरले होते. याचं तत्वज्ञानावर आधारित त्यांनी OBC चळवळ उभी केली होती. त्यांनी सामाजिक काम करताना कश्याचीही भिती बाळगली नाही. “डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या पुण्याईने मला नॊकरी मिळाली,फुले – आंबेडकरी चळवळीचे काम करतांना नॊकरी गेली तरी चालेल” अशी त्यांची विचारसरणी होती.त्यांच्या निधनानंन्तर पारंपरिक धार्मिक संस्कारांना तिलांजली देऊन त्यांच्या कुटुंबाने 13 दिवसांच्या तेरवी ऐवजी 3 दिवसात श्रद्धांजली कार्यक्रम आयोजित केला होता.हा कार्यक्रम पोवार बोर्डिंग येथे पार पडला.यावेळी सत्यनारायण पूजा न करता यां कार्यक्रमाऐवजी OBC बांधव गुरूदास येडेवार यांनी ग्रामगितेचे वाचन केले.यावेळी उपस्थित वक्त्यांनी श्रद्धांजली वाहताना महापुरुषांचे विचार मांडले.मृताच्या आत्म्याला शांती प्रदान करणेसाठी मुंडण करणे ही निव्वळ अंधश्रद्धा समजून कोणताही कर्मकांड, केशवपण (मुंडण ) करण्यात आलेला नाही.हे विशेष.