वडेगाव येथे निधीची अफरातफर; चौकशीच्या नावावर ग्रामस्थांची दिशाभूल

0
132
वाढदिवसाच्या शुभेच्छा

तिरोडा ,दि.१५: तालुक्यातील वडेगाव ग्रामपंचायत येथे सामान्य फंड व १५ व्या वित्त आयोग निधीची सरपंच व सचिवाने विल्हेवाट लावल्याचा आरोप गावकर्‍यांनी केला असून चौकशीच्या नावावर अधिकारी ग्रामवासियांची दिशाभूल करीत आहेत.सदर निधीच्या वापरासंदर्भात इतर ग्राम पंचायत सदस्यांनाही विश्वासात घेण्यात आले नाही.सदर निधीतून साहित्य खरेदीचा कांगावा करण्यात आला.परंतु, साहित्य गावात कुठे लावण्यात आले, हे दिसून येत नसल्याने निधीची अफरातफर झाल्याची तक्रार ग्राम पंचायत सदस्य व माजी उपसरपंचाने पंचायत समितीसह जिल्हा परिषदेच्या वरिष्ठाकडे केली.परंतु, या प्रकरणी चौकशी करण्याऐवजी अधिकार्‍यांकडून लोकप्रतिनिधीच्या दबावाखाली गावकर्‍यांची दिशाभूल केली जात असल्याने तक्रारदार व ग्राम पंचायत सदस्यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे.

वडेगाव येथील सरपंच शामराव बिसेन व ग्रामसेवक जे.बी. तिडके यांनी संगनमत करून कोणत्याही सदस्याला विश्वासात न घेता आपल्या मनमर्जीने वाटेल तिथे सामन्य फंड व १५ व्या वित्त आयोगाच्या निधीची परस्पर विल्हेवाट लावली. त्याचप्रमाणे गावात पाणी पुरवठ्याची कामे, रोजगार हमी योजनेतून निकृष्ट दर्जाचे सिमेंट रस्ता बांधकाम व इतर साहित्य खरेदीमध्ये निधीची अफरातफर केल्याचा आरोप उपसरपंचासह ग्राम पंचायत सदस्यांनी केला. या संदर्भात माजी उपसरपंच सिबीर चोले यांनी वरिष्ठ कार्यालयात तक्रार केली. तसेच माहिती अधिकार अधिनियमातंर्गत माहिती घेण्यासाठी अर्ज केला. परंतु, यावरही ग्रामसेवकाने माहिती देण्यास टाळाटाळ करून अधिनियमाची अवहेलना केली.

सदर प्रकरणाच्या चौकशीकरीता गटविकास अधिकारी यांनी विस्तार अधिकारी बडोले यांची नेमणूक केली. परंतु, चौकशीच्या नावावर कागदापुरती करण्यात आल्याची चर्चा आहे.तर एका लोकप्रतिनिधीने या प्रकरणी दबावतंत्र आणून प्रकरणावर पांघरूण घालण्याचे काम केल्यामुळे अधिकार्‍याकडून चौकशी थंडबस्त्यात असल्याचा आरोप तक्रारकर्त्यांनी केला आहे.दोषींवर कारवाई होत नसल्याने तक्रारदार व ग्राम पंचायत सदस्यानी ग्राम पंचायत कार्यालयासमोर आंदोलनावर बसण्याचा इशारा दिला आहे.