मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यावेळी जलपर्यटना दरम्यान पत्रकारांची बोट उलटली

0
358

भंडारा : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भंडारा दौऱ्यात जल पर्यटन करताना प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना घेऊन जाणारी बोट बुडून तिचे तीन तुकडे झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवित हानी झाली नसल्याचे सांगण्यात येत आहे. वैनगंगा नदीवर होत असलेल्या जागतिक दर्जाच्या जल पर्यटन प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते भूमिपूजन झाले. त्याच वेळी हा अपघात घडला आहे.

भंडारा जिल्हा दौऱ्या दरम्यान जल पर्यटन करताना प्रसारमाध्यमांचे १० ते १५ प्रतिनिधी एका बोटीत होते. हे सर्व माध्यम प्रतिनिधी नागपूरचे असल्याचे सांगण्यात येते. एका बोटीत मुख्यमंत्री तर दुसऱ्या बोटीत माध्यम प्रतिनिधी होते. काही अंतरावर गेल्यानंतर माध्यम प्रतिनिधीची बोट एका खडकावर आदळून तिचे तीन तुकडे झाल्यचे सांगण्यात येते. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली. सुदैवाने यात कोणतीही जीवित हानी झाली नाही. या घटनेबाबत जिल्हा पोलीस अधीक्षक लोहित मतांनी यांनी सांगितले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे जल पर्यटन करताना चित्रांकन करण्यासाठी दुसऱ्या एका बोटीत प्रसार माध्यमांचे प्रतिनिधी देखील होते. मात्र जल पर्यटना दरम्यान मुख्यमंत्र्यांचे फोटो काढण्याकरिता सर्व माध्यम कर्मी एका बाजूला आले त्यामुळे बोट असंतुलित झाली. मात्र तेथे असलेल्या बचाव पथकाच्या कर्मचाऱ्यांनी ताबडतोब सर्व माध्यम प्रतिनिधीना पाण्याबाहेर काढले. यात कोणताही अनुचित प्रकार घडला नसून क्षमतेनुसार प्रतिनिधींनी बोटीत असल्याचे मतांनी यांनी सांगितले.