गोंदिया, दि.22 : पावसाळा सुरु असल्यामुळे शहरातील नाल्या सद्यस्थितीत तुंबलेल्या आढळून येत असल्यामुळे नाल्यांमध्ये डासांची उत्पत्ती जास्त प्रमाणात होत आहे. सर्वत्र पाणी साचून किटकजन्य आजार वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही, त्यामुळे शहरातील नाल्या व इतर डासोत्पत्ती स्थाने वाहती करण्यात यावी, अशा सूचना जिल्हाधिकारी प्रजित नायर यांनी नगरपरिषद व नगरपंचायत प्रशासनाला दिल्या.
अशा करा उपाययोजना : नगर परिषद कार्यक्षेत्रातील नाल्या/गटारांची साफसफाई नियमीत करुन पाणी तुंबणार नाही याची दक्षता घ्यावी. टायर्स विक्रेते, भंगार विक्रेते यांच्यामुळे किटकजन्य आजारांच्या उद्रेकाला हातभार लागत असल्याने साथरोग नियंत्रण अधिसूचनेनूसार कायदेशिर कार्यवाही करावी. निरुपयोगी प्लास्टिकच्या वस्तूंची विल्हेवाट लावावी. सर्व शौचालयाचे (खाजगी व सार्वजनिक) व्हेंट पाईपला जाळ्या किंवा कापड बांधण्याची मोहिम राबविण्यात यावी. बांधकाम होत असलेल्या परिसरात पाणी साचून डासोत्पत्ती होणार नाही याबाबत संबंधितांना सूचना द्यावे. नगर परिषद कार्यक्षेत्रातील सर्व खाजगी व सार्वजनिक निरुपयोगी विहिरीमध्ये गप्पी मासे सोडण्याची धडक मोहिम राबविण्यात यावी.
केंद्र शासनाने डेंग्यू हा आजार अधिसूचित (नोटीफायेबल) आजार घोषित केला असल्यामुळे कार्यक्षेत्रातील सर्व खाजगी रुग्णालयात उपचारीत होणाऱ्या संशयीत डेंग्यू रुग्णांची माहिती नगर प्रशासनाला व आरोग्य विभागाला देणेबाबत आपले स्तरावरुन सूचित करावे. रिकाम्या भूखंडावर कचरा व पाणी साचले जाणार नाही याची दक्षता घ्यावी. किटकजन्य आजार नियंत्रणाकरीता आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस पाळण्याबाबत नगर परिषद प्रशासनातर्फे जनजागृती करण्यात यावी. नगरपरिषद कार्यक्षेत्रातील सर्व हॉटेल्स व चहा विक्रेते यांच्या दुकानात पाण्याकरीता ठेवण्यात येणाऱ्या साठ्यामध्ये डासांच्या अळ्या तयार होण्याची शक्यता असल्याने त्यांना नगर परिषदेतर्फे पाण्याचे साठे झाकून ठेवण्याबाबत व त्याची योग्य निगा राखण्याबाबत पत्राद्वारे कळविण्यात यावे.
जनावरांना पाणी पिण्यासाठी शहरात तयार करण्यात आलेले कृत्रिम पाणवठे पावसाळयात सुद्धा पाण्याने भरलेले असतात. त्यामुळे या पाणवठ्यांमध्ये डासांच्या अळया तयार होण्याची शक्यता असल्याने त्यांना नगर परिषदेतर्फे पाण्याचे साठे झाकून ठेवण्याबाबत व त्याची योग्य निगा राखण्याबाबत सूचना देण्यात यावे. पाण्याच्या साठयांमध्ये तयार होणाऱ्या डासांच्या अळया नष्ट करण्याकरीता टेमिफॉस अळीनाशक हे नगर परिषदेतर्फे खरेदी करुन ठेवण्यात यावे. नगर परिषद कर्मचाऱ्यांकडून नियमित डास अळी सर्वेक्षण करण्यात यावे. धूर फवारणीकरीता नगर परिषदेकडून सायफॉनोथ्रीन किटकनाशक खरेदी करुन कार्यक्षेत्रात नियमित धूरफवारणी करण्यात यावी. कार्यक्षेत्रात शोषखड्डे तयार करण्यात यावे तसेच फुटलेल्या पाईपलाईनची व गळतीची त्वरित दुरुस्ती करावी.
शाळेतील विद्यार्थ्यांमार्फत प्रभातफेरी काढावी तसेच प्रार्थनेच्या वेळी डेंग्यू, हिवताप व किटकजन्य आजाराविषयी माहिती देवून प्रतिबंधात्मक उपाययोजनांची जनजागृती करण्यात यावी. याकरीता संबंधीत तालुका आरोग्य अधिकारी यांचेशी समन्वय साधावा. मच्छरदान्यांचा वापर करण्याबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करावी. गावातील शेणखताचे उकिरडे व कचऱ्याचे ढिगारे हे लोकवस्तीपासून लांब अंतरावर ठेवण्याबाबत
कार्यवाही करावी. नगर परिषद कार्यक्षेत्रातील घराच्या परिसरात नळाच्या पाण्याकरीता बांधण्यात आलेल्या सिमेंटच्या भूमिगत टाक्यात डासांच्या अळया तयार होणार नाही याची खबरदारी घ्यावी. नगर परिषद कार्यक्षेत्रात योग्य दाबाने पिण्याचे पाणीपुरवठा होईल याबाबत कार्यवाही करावी, जेणेकरुन भूमिगत टाके नागरिक तयार करणार नाहीत. कार्यक्षेत्रातील किटकजन्य आजाराचे उद्रेक व मृत्यू होणार नाहीत याबाबत प्रतिबंधात्मक कार्यवाही करावी.





