लैंगिक अत्याचार प्रकरणी किशोर दर्डांना अटक

0
12

विशेष प्रतिनिधी
यवतमाळ,दि.4 – चिमुकल्या बालिकांवर झालेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणात जवाहरलाल दर्डा एज्युकेशन सोसायटीचे सचिव किशोर दर्डा यांना आज (सोमवार) पहाटे साडेतीन वाजता नागपूरमधून अटक करण्यात आली आहे.

किशोर दर्डा यांच्याविरुद्ध रविवारी गुन्हा दाखल करण्यात आला होता. अटक टाळण्यासाठी ते फरार झाले होते. अखेर पोलिसांनी त्यांना नागपूरमधून अटक केली आहे. त्यांना शोधण्यासाठी अनेक ठिकाणी मोहीम राबविण्यात आली. मात्र, ते कुठेच आढळले नव्हते. त्यांच्या अटकेसाठी विविध ठिकाणी पथकेही रवाना करण्यात आली होती. या प्रकरणासाठी विशेष पोलिस तपास पथक (एसआयटी) स्थापन करण्यात आले होते. दोषींना मोकळे सोडण्यात येणार नाही, अशी ग्वाही विशेष पोलिस महानिरीक्षक संजीवकुमार सिंघल यांनी दिली होती.

किशोर दर्डा यांच्याविरुद्ध बाल लैंगिक अत्याचारविरोधी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. अत्याचाराची माहिती मिळाल्यानंतर सक्षम यंत्रणेला न कळविल्याबद्दल त्यांच्यावर हा गुन्हा दाखल झाला आहे, असे सिंघल म्हणाले. दरम्यान, रविवारी यवतमाळात पुन्हा आंदोलन झाले. पोलिस व आंदोलकांमध्ये धुमश्‍चक्री झाली. आंदोलकांवर पोलिसांकडून लाठीमार करण्यात आला. यामध्ये दोघे गंभीर जखमी झाले असून, एकाला नागपूर येथे हलविण्यात आले आहे. चाळीसवर आंदोलक किरकोळ जखमी झाले आहेत.

येथील यवतमाळ पब्लिक स्कूलमध्ये झालेल्या चिमुकल्या विद्यार्थिनींवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी गेल्या चार दिवसांपासून पालक न्यायाची मागणी करीत आहेत. दर्डांना अटक करा, या मागणीसाठी आंदोलक किशोर दर्डा यांच्या घराजवळ जमले होते. तिथे पोलिस व आंदोलकांत धुमश्‍चक्री झाली. पोलिसांनी आंदोलकांना पांगविण्यासाठी अश्रुधुरांच्या दहावर नळकांड्या फोडल्या. तरीसुद्धा किशोर दर्डा यांच्या अटकेची मागणी तीव्र होत गेली आणि दगडफेक सुरू झाली. पोलिसांनी जमावाला रोखण्यासाठी लाठीमार सुरू केला. यात अनेक महिला, पत्रकार, आंदोलक जखमी झाले. आंदोलकांकडूनही दगडफेक करण्यात आली. काही नागरिकांना पोलिसांकडून अत्यंत निर्दयी मारहाण करण्यात आली. आंदोलकांनी पोलिसांचे एक वाहन फोडले. या घटनेत अशोक पुरी व अमित बदनोरे हे दोघे गंभीर जखमी झाले. यापैकी अशोक पुरी यांची प्रकृती चिंताजनक असून, त्यांना नागपूर येथील रुग्णालयात हलविण्यात आले आहे.पोलिस अधीक्षक अखिलेश सिंह हे घटनास्थळावर आले. किशोर दर्डा यांना अटक करणार आहोत. त्यांना शोधण्यासाठी पोलिस पथके रवाना झालेली आहेत, असे सांगून केवळ 24 तासांत त्यांना अटक करू, असे आश्‍वासनही त्यांनी दिले.

लाठीमार अनावश्‍यक – अहीर
“पालकांवर झालेला लाठीमार अनावश्‍यक होता. पोलिसांना हे प्रकरण नीट हाताळता आले नाही. ज्या वेळी मुख्याध्यापकाला अटक केली, तेव्हाच किशोर दर्डांनाही अटक करायला हवी होती. पोलिसांचा अभ्यास कमी पडला. येथील गुप्तचर यंत्रणा तर निकामीच झाली आहे. पोलिस अधीक्षकांचा हा सामाजिक गुन्हा आहे,‘‘ अशी टीका केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी येथे केली.पत्रकारांवर नाहक लाठीमार झाला. या प्रकरणाची चौकशी करणार आहोत,‘‘ असे त्यांनी सांगितले. आमदार मदन येरावार यांनीही “लाठीमार चुकीचा होता‘, असे सांगितले. या वेळी आमदार राजेंद्र नजरधने, आमदार राजू तोडसाम, आमदार संजीव रेड्डी बोदकुरवार, भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र डांगे उपस्थित होते.