केंद्रीय कॅबिनेटमध्‍ये फेरबदल, आठवलेंचे नाव जवळपास निश्चित

0
6

वृत्तसंस्था
नवी दिल्ली,दि.04- केंद्रीय मंत्रिमंडळाच्‍या कॅबिनेटमध्‍ये पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या (5 जुलै) मोठे फेरबदल होऊ शकतात. मंत्रिमंडळात रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले यांचे स्थान जवळपास निश्चित मानले जात असल्याची सूत्रांनी माहिती दिली आहे. याशिवाय इतर 9 जणांचा मंत्रिमंडळात समावेश होणार आहे. त्यात महाराष्‍ट्रातील नवनिर्वाचित राज्यसभा खासदार व भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष विनय सहस्त्रबुद्धे, शिवसेनेचे खासदार अनिल देसाई यांचा समावेश आहे.दरम्यान, केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराच्या पार्श्वभूमीवर रामदास आठवले दिल्लीत दाखल झाले आहेत. भाजपाध्यक्ष अमित शाह यांची ते भेट घेणार असल्याचे समजते.
विशेष म्‍हणजे वादग्रस्‍त विधान करून चर्चेत राहणारे बिहारचे खासदार गिरिराज सिंह यांची मंत्रिमंडळातून सुट्‍टी केली जाऊ शकते. संभाव्‍य मंत्रिपदासाठी राजस्थानचे नेता ओम माथूर आणि अर्जुन मेघवाल यांच्‍यासह इतर तिघे स्‍पर्धेत आहेत.

या शिवाय उत्‍तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्‍या दृष्‍टीने मनोज सिन्हा आणि संजीव बालियान यांना ‘प्रमोट’ केले जाऊ शकते. हे दोघे सध्‍या राज्यमंत्री आहेत. ऊर्जा मंत्रालयाचा स्‍वतंत्रपणे गाडा हाकरणारे पीयूष गोयल यांनाही पक्ष ‘प्रमोट’ करू शकतो.

हे आहेत मंत्रिपदाचे दावेदार…
1. राज्यसभा सदस्‍य ओम माथूर यांना कॅबिनेटमध्‍ये स्‍थान मिळू शकते. सध्‍या त्‍यांच्‍यावर उत्‍तर प्रदेश भाजपची धुरा आहे.
2. अलाहाबादचे खासदार श्याम चरण गुप्ता यांचेही नाव जोरकसपणे चर्चेत आहे. त्‍यांना मंत्री केल्‍यास यूपी विधानसभा निवडणुकीत फायदा होऊ शकतो.
3. बिकानेरचे खासदार अर्जुन मेघवाल हेसुद्धा मंत्रिपदाच्‍या शर्यतीत आहेत.
4. आसामचे रमेन डेका यांचाही पक्ष विचार करत आहे.
5. विनय सहस्त्रबुद्धे हेसुद्धा मंत्रीपदाचे दावेदार आहेत. सध्‍या ते राज्यसभा सदस्‍य आहेत.

यांना मिळणार डच्‍चू ?
> लघू उद्योग राज्यमंत्री गिरिराज सिंह हे कायम वाद ओढून घेतात. त्‍यांना मंत्रिमंडळातून डच्‍चू मिळू शकतो.
> अल्पसंख्‍याक मंत्री नजमा हेपतुल्ला यांचेही पद धोक्‍यात आहे.
> बलात्‍काराचा आरोप असलेले रसायन मंत्री निहालचंद यांनाही डच्‍चू दिला जाऊ शकतो.