जिल्ह्यातील सर्व मतदार केंद्रावर प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध

0
1292

मतदार याद्यांचा दुसरा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम

         गोंदिया, दि.6 : 1 जुलै 2024 या अर्हता दिनांकावर (Qualifying Date) आधारीत मतदार याद्यांचा दुसरा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम (Special Summary Revision) घोषित झाला असून 6 ऑगस्ट 2024 (मंगळवार) रोजी गोंदिया जिल्हयातील सर्व मतदान केंद्रावर प्रारुप मतदार यादी प्रसिध्द करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी प्रजित नायर यांनी दिली आहे.

         सदर संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम अंतर्गत 10 ऑगस्ट 2024 (शनिवार) व 11 ऑगस्ट 2024 (रविवार) आणि 17 ऑगस्ट 2024 (शनिवार) व 18 ऑगस्ट 2024 (रविवार) रोजी विशेष मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. सबब संबंधित विशेष मोहिम अंतर्गत 18-19 वयोगटातील मतदार, तृतीय पंथीय, देह व्यवसाय करणाऱ्या स्त्रिया आणि दिव्यांग मतदार यांनी जास्तीत जास्त सहभागी होऊन आपले नाव मतदार यादीत समाविष्ट करावे, असे आवाहन त्यांनी केले.

        याकरिता आपण आपल्या जवळच्या मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) यांचेकडे जाऊन मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी नमुना 6 चे अर्ज भरुन दयावे किंवा NVSP, VHA व VPORTAL या पोर्टलवर लॉगीन करुन आपले नांव समाविष्ट करण्याबाबत ऑनलाईन अर्ज सादर करावे. त्यानुसार मतदान यादीत नाव समाविष्ट असलेल्या मतदारांच्या नावामध्ये दुरुस्ती, रहिवाशाचे स्थलांतरण (विधानसभा अंतर्गत/ बाहेरील, मतदार ओळखपत्र बदलून देणे, दिव्यांग म्हणून चिन्हांकीत करावयाचे असल्यास नमुना 8 तसेच आपले मतदार ओळखपत्राशी आधार कार्ड जोडणी करण्याकरिता नमुना 6-ब भरुन संबंधीत आपल्या जवळच्या मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) किंवा NVSP, VHA व VPORTAL या पोर्टलवर लॉगीन करुन संबंधीत अर्ज ऑनलाईन पध्दतीने सादर करुन विशेष मोहिमेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी प्रजित नायर यांनी मतदारांना केले आहे.