रानभाज्या आरोग्याच्या दृष्टीने अतिशय उपयुक्त- मुनेश्वर रहांगडाले

0
461
  • जिल्हास्तरीय रानभाजी महोत्सव

गोंदिया, दि.12 : मानवी जीवनात सकस अन्नाचे अनन्य साधारण महत्व आहे. रानभाज्यामध्ये शरीराला आवश्यक असणारे अन्न घटक, जीवनसत्वे व खनिजे आणि औषधी गुणधर्म जास्त प्रमाणात असतात. त्यामुळे रानभाज्या आरोग्याच्या दृष्टीने अतिशय उपयुक्त आहेत. असे प्रतिपादन पंचायत समितीचे सभापती मुनेश्वर रहांगडाले यांनी केले.

कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) व कृषि विभाग गोंदिया यांच्या संयुक्त विद्यमाने 12 ऑगस्ट रोजी नविन प्रशासकीय इमारत, गोंदिया येथे आयोजित जिल्हास्तरीय रानभाजी महोत्सवात ते बोलत होते.प्रमुख अतिथी म्हणून तहसिलदार समशेर पठाण, जिल्हा माहिती अधिकारी रवि गिते, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी अजित आडसुळे, तालुका कृषि अधिकारी पवन मेश्राम उपस्थित होते.

मुनेश्वर रहांगडाले पुढे म्हणाले, दिवसेंदिवस लुप्त होत चाललेल्या रानभाज्यांची नविन पिढीला ओळख होण्यासाठी व त्याचे महत्व समजण्याकरीता रानभाजी महोत्सव हा एक स्तुत्य उपक्रम आहे. आपले पुर्वज रानभाज्यांचा समावेश आहारात करीत होते, त्यामुळे ते निरोगी व सुदृढ राहत होते. शरिराची रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी रानभाज्यांचा समावेश आपल्या आहारामध्ये केला पाहिजे, जेणेकरुन आपले आरोग्य उत्तम राहील असे त्यांनी सांगितले.

समशेर पठाण म्हणाले, रानभाजी महोत्सव विदर्भाचे वैशिष्ट आहे. जिल्ह्यातील जैवविविधता व राजभाज्या याचे आकर्षण निसर्गाशी जवळीकता साधणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या मनामध्ये असते. रानभाज्या या केवळ आहार आणि  चवीशीच निगडीत नसून अनेक औषधी गुणतत्वे राजभाज्यांमध्ये दडलेली असून पिढ्यांपिढया पासून याच्या सेवनाला आपण अधिक महत्व देतो असे त्यांनी सांगितले.

रवि गिते म्हणाले, मानवी जीवनात सकस आहाराचे अनन्यसाधारण महत्व असून प्रत्येकाने प्रोटिनयुक्त आहार घ्यायला पाहिजे. शरीर सुदृढ व निरोगी राहण्यासाठी तसेच शरिरासाठी आवश्यक असणारी प्रथिने, खनिजे व जीवनसत्व वाढविण्यासाठी रोजच्या आहारात रानभाज्या सारख्या सकस आहाराचा समावेश करणे गरजेचे आहे असे त्यांनी सांगितले.

अजित अडसुळे यांनी प्रास्ताविकातून सांगितले की, नविन पिढीला रानभाज्यांचे महत्व कळण्यासाठी रानभाजी महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. त्यानुसार गोंदिया येथे जिल्हास्तरीय रानभाजी महोत्सव आयोजित करण्यात आला असून याचा लाभ जिल्ह्यातील नागरिकांनी घ्यावा असे त्यांनी यावेळी आवाहन केले.

यावेळी जवळपास 150 स्टॉल्स लावण्यात आले होते. यामध्ये काटवल, सुरण, तरोटा, खापरखुटी, आंबाडी, सेवगा, मटारु, घोळभाजी, कोचईचे पाने, मशरुम, केना, पातुर इत्यादी रानभाज्यांचा समावेश होता. यावेळी मान्यवरांच्या हस्ते रानभाज्यांची माहिती पुस्तिकेचे विमोचन करण्यात आले. रानभाज्या महोत्सवात सहभागी झालेल्या शेतकरी व बचत गटांच्या प्रतिनिधींना प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन तालुका कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापक सुनिल खडसे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी कृषि अधिकारी मुनेश्वर ठाकुर तसेच सर्व कृषि सहाय्यक, तालुका कृषि अधिकारी कार्यालय व जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी कार्यालयाचे सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतले. कार्यक्रमास जिल्ह्यातील बचत गटातील महिला, शेतकरी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.