34.8 C
Gondiā
Tuesday, June 16, 2026
Home विदर्भ वयोश्री योजनेचा लाभ घेण्यासाठी सामाजिक न्याय विभागाशी साधा संपर्क

वयोश्री योजनेचा लाभ घेण्यासाठी सामाजिक न्याय विभागाशी साधा संपर्क

0
140

31 ऑगस्टपर्यंत अर्ज जमा करणे आवश्यक

          गोंदिया, दि.21 : राज्यातील 65 वर्ष  किंवा त्याहून अधिक वय असलेल्या नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात सामान्य स्थितीत जगण्यासाठी आधार लागतो. त्यांना वयोमानपरत्वे येणाऱ्या अपंगत्व, अशक्तपणा यावर उपाययोजना करण्यासाठी आवश्यक सहाय्य साधने, उपकरणे खरेदी करण्याकरीता तसेच मनःस्वास्थ्य केंद्र, योगोपचार केंद्राद्वारे त्यांचे मानसिक स्वास्थ्य अबाधित ठेवण्यासाठी राज्यात ज्येष्ठांना वयोश्री योजनेचा आधार मिळणार आहे. योजनेचा अर्ज www.acswnagpur.in संकेतस्थळावरुन उपलब्ध करुन घ्यावा किंवा सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मागे, गोंदिया येथे संपर्क करावा, असे आवाहन समाज कल्याण सहायक आयुक्त विनोद मोहतुरे यांनी केले आहे.

           जिल्ह्यातील शहरी तथा ग्रामीण भागातील मुख्यमंत्री वयोश्री योजनेच्या लाभार्थ्यांनी क्यु-आर कोडमध्ये अर्ज स्कॅन करुन आवश्यक कागदपत्रासह सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, गोंदिया या कार्यालयात 31 ऑगस्टपर्यंत अर्ज जमा करणे आवश्यक आहे.

       योजनेच्या अटी व शर्ती : मुख्यमंत्री वयोश्री योजनेंतर्गत 31 डिसेंबर 2023 पर्यंत 65 वर्षे पूर्ण झालेले नागरिक पात्र आहेत. 65 वर्ष किंवा त्याहून अधिक वय असलेले नागरिकांकडे आधार कार्ड असावा किंवा आधारकार्डसाठी अर्ज केलेला असावा किंवा आधार नोंदणीची पावती असणे आवश्यक आहे.

           लाभार्थी पात्रतेसाठी जिल्हा प्राधिकरणाकडून प्रमाणपत्र किंवा बीपीएल राशनकार्ड किंवा राष्ट्रीय सामाजिक सहाय्यक कार्यक्रमांतर्गत इंदिरा गांधी राष्ट्रीय वृध्दापकाळ निवृत्ती वेतन योजनेंतर्गत किंवा राज्य केंद्र शासित सरकारच्या इतर कोणत्याही पेंशन योजनेंतर्गत वृध्दापकाळ निवृत्ती वेतन मिळत असल्यास पुरावा सादर करण्यात यावा. लाभार्थ्यांचे कौटुंबिक वार्षिक उत्पन्न दोन लाखाच्या आत असावे. याबाबत लाभार्थ्यांचे स्वयंघोषणापत्र सादर करणे आवश्यक आहे. लाभार्थ्यांनी मतदान कार्ड सोबत जोडावे. राष्ट्रीयकृत बँकेच्या बँक पासबुकची झेरॉक्स प्रत सादर करावे. पासपोर्ट आकाराचे दोन फोटो व दोन वेगवेगळे घोषणापत्र सोबत जोडावे. शासनाने ओळख पटविण्यासाठी विहित केलेली अन्य कागदपत्रे व शाळा सोडल्याचा दाखला, वैद्यकीय प्रमाणपत्र सोबत जोडावे.

          हे मिळणार साहित्य : पात्र वृध्द लाभार्थ्यांना त्यांच्या शारिरीक असमर्थता, दुर्बलतेनूसार सहाय्यभूत साधने, उपकरणे 3 हजारापर्यंत खरेदी करता येईल. यामध्ये चष्मा, श्रवण यंत्र, ट्रायपॉड, स्टिक व्हील चेअर, फोल्डिंग वॉकर, कमोड खुर्ची, नि-ब्रेस लंबर बेल्ट व सर्वाइकल कॉलरचा समावेश आहे.