गर्भलिंग निदान चाचणी प्रतिबंधक कायद्याची प्रभावी अंमलबजावणी व्हावी-डॉ. अनिल कावरखे 

0
49
जिल्हा सल्लागार समितीची बैठक उत्साहात
“मुलींच्या जन्माचे स्वागत करा”चा जागर
वाशिम दि.२१ ऑगस्ट-सोनोग्राफीसारख्या तंत्राचा वापर करून गर्भ लिंग जाणून घेण्यासाठी काहीजण करीत असल्याचे आजही दिसून येते. मुलींचा जन्मदर वाढविणे ही काळाची गरज आहे.जिल्ह्यातील कोणत्याही सोनोग्राफी सेंटरमध्ये गर्भलिंगनिदान चाचणी होणार नाही, यासाठी सर्व सोनोग्राफी सेंटरने दक्षता घेऊन गर्भलिंगनिदान चाचणी प्रतिबंधक कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करावी.असे निर्देश जिल्हा शल्यचिकित्सक डॉ अनिल कावरखे यांनी दिले.
         २० ऑगस्ट रोजी जिल्हा सामान्य रुग्णालयात पी.सी.पी.एन.डी.टी जिल्हा सल्लागार समितीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी सभेत श्री कावरखे बोलत होते. यावेळी ‌‌डॉ .अलका मकासरे, डॉ . जयकिशन बाहेती, डॉ. अपर्णा पुपलवाड, राजेश गोरूले, जिल्हा माहिती अधिकारी यासिरोद्दीन काझी यांच्यासह इतरही समिती सदस्यांची प्रमुख उपस्थिती होती.
         डॉ. मकासरे यांनी मुलींच्या जन्माचे स्वागत तसेच लिंग गुणोत्तर प्रमाण वाढविण्याकरिता जनजागृती करण्यात यावी अशा सुचना सदर सभेत दिल्या.
 जिल्ह्यातील लिंगगुणोत्तराच्या माहितीचे रेकॉर्ड्स तपासून पाहावे. असेही त्यांनी यावेळी सांगितले.
जिल्हयातील लिंग गुणोत्तर प्रमाण वाढविण्यासाठी, गर्भलिंग निदान प्रतिबंध आणि स्त्री भृणहत्या रोखण्यासाठी गर्भधारणापूर्व निदानतंत्रे (लिंग निवडीस प्रतिबंध) कायदा १९९४ सुधारित कायदा २००३ (पिसीपीएनडीटी) आणी वैद्यकीय गर्भपात कायदा १९७१ (एमटीपी) कायद्याची प्रभावी
अमंलबजावणी करून तक्रार नोंदविण्यासाठी तसेच शंकेचे निरसन करण्यासाठी https://amchimulgimaha.in हे संकेतस्थळ उपलब्ध करून देण्यात येत आहे.संकेतस्थळावर कोणीही तक्रार नोंदविल्यास ती तक्रार गोपणीय राहील. तक्रार देणा-यास त्याची इच्छा असल्यास त्याचे नांव देखील नोंदवु शकतील.
   पिसीपीएनडीटी कायद्याअंतर्गत कायद्या अंतर्गत तक्रार निपटारा होउन गर्भलिंग निदान करणा-या व्यक्तीवर गुन्हा दाखल होणार असून
तक्रारीची अमंलबजावणी होउन स्त्री भृणहत्या रोखण्यास यश आले तर तक्रारदारास /खब-यास शासनामार्फत खबरी बक्षीस योजनेअंतर्गत रक्कम रुपये १ लक्ष रूपये बक्षीस देण्यात येणार असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सकांनी यावेळी सांगितले. प्रास्ताविक व संचालन अॅड.राधा नरवलीया यांनी केले.
मुलींचे प्रमाण मुलांच्या तुलनेत कमी होत आहे. स्त्री भृणहत्या रोखण्याकरीता टोल फ्री क्रमांक १८०० २३३ ४४७५ तसेच १०४ व  जिल्हास्तरावरील टोल फ्री क्रमांक ८४५९८१४०६० या क्रमांकावर नागरीकांनी तक्रारीची माहिती द्यावी. तक्रारदारांची माहिती गोपनीय ठेवण्यात येईल.
बुवनेश्वरी एस, जिल्हाधिकारी वाशिम 
आज मुलींचे प्रमाण दिवसेंदिवस कमी होत आहे ही चिंतेची बाब आहे. मुलगी जन्माला येण्याचा हक्कच हिरावून घेतला जात आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा दुरुपयोग करुन उमलण्याआधीच या कळ्या खुडल्या जात आहे. कायद्याची कठोर अंमलबजावणी तर झालीच पाहिजे परंतु समाजाची मानसिकता बदलणेही तितकेच महत्वाचे आहे.
 वैभव वाघमारे, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद वाशिम