त्या अपघाताशी महावितरणचा संबंध नाही
नागपूर, दि. 21 ऑगस्ट :- मौझा पेवठा येथील कमलेश उईके आणि नितेश बागबंडे यांचा आशिष मेश्राम यांच्या शेतात झालेल्या विद्युत प्राणांतिक अपघाताशी महावितरणचा दुरान्वयानेही संबंध नसून सदर अपघात हा वीज तारा चोरीच्या उद्देशाने वीज तारा तोडून टाकत असतांना झाला असल्याची पुष्टी विद्युत निरीक्षक आणि स्थानिक पोलीसांनी केली असल्याची माहिती महावितरणतर्फ़े देण्यात आली आहे.
याशिवाय, शेतमालक आशिष मेश्राम यांनी त्यांच्या लेखी जबाबात या दोन्ही मृत व्यक्ती त्यांचाकडे कामावर नव्हती आणि त्यांना शेतात जाऊन कामे करण्यास सांगितले नव्हते असे नमूद केले आहे. सदर शेत हे शेतीशिवारात आतमधील भागात असून शेतात पावसामुळे संपूर्ण चिखल असल्याने मृत व्यक्तींचा शेतीची कामे, जागरण अथवा रखवाली करण्यास जाण्याचा संबंधच येत नसल्यचे शेतमालकाने स्पष्ट केले आहे. आशिष मेश्राम यांच्या शेतात लघुदाब वाहिनीचा कट-प्वाईंट (सिमेंट खांबावर) असून त्यातून पुढे एका लघुदाब वाहिनीचा खांब आहे. कट-प्वाईंट पुधील वीजतारा चोरी झाल्याने या खांबाला जाणारा वीजपुरवठा पूर्वीपासूनच खंडित करण्यात आला असल्याचेही महावितरणकडून स्पष्ट करण्यत आले आहे.
मयत कमलेश आणि नितेश हे दोघेही वीजतारा चोरी करण्यासाठी आशिष मेश्राम यांच्या शेतात मध्यरात्री गेले असावे त्यावेळी त्यांनी सिमेंट खांबावरील तारा तोडून ती गोळा करून ते कट-प्वाईंट दिशेने आले असावे आणि तारा खेचण्याच्या नादात एक तार विद्युत भरीत असलेल्या एका फेजच्या तारेला स्पर्श होऊन उभयतांचा जबर शॉक बसून विद्युत प्राणांतिक अपघात घडलेला असावा असे प्राथमिकदृष्ट्या महावितरण तसेच सहाय्यक विद्युत निरीक्षक यांनी केलेल्या निदर्शनात दिसून येते. रोहीत्रावरील एक फेज चा फ्युजतार तुटलेल्या अवस्थेत आढळली असून पोलिसांनीसुद्धा त्यांच्या पंचनाम्यात मयत व्यक्ती हे वीज तार चोरी करीत असल्याचा उल्लेख केला आहे. त्यामुळे एकंदरीत घटनास्थळाचा आढावा घेता हा अपघात वीज वाहिनीचा तार अकस्मात तुटून झालेला नसून चोरीच्या उद्देशाने वीज तारा तोडून टाकत असतांना झाल्याचे प्रथमदर्शनी दिसत असल्याचे महावितरणकडून स्पष्ट करण्यात आले आहे.