सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात दलित,आदिवासी,ओबीसी संघटना रस्त्यावर
गोंदिया: सर्वाेच्च न्यायालयाच्या अनुसूचित जाती आणि जमातीच्या आरक्षण उपवर्गीकरणाच्या निर्णयाविरोधात पुकारण्यात आलेल्या ‘भारत बंद’ला दलित,आदिवासी,ओबीसी व मुस्लीम संघटनांची एकता दिसून आली.गोंदिया शहरासह सर्वच तालुक्यात शाळा काॅलेजला सुट्टी देण्यात आली होती,तर व्यापारी संंघटनेने बंदला समर्थन जाहीर केल्याने बाजारपेठ सकाळपासूनच बंद होती. PFN सकाळी दहा वाजतापासून शहराच्या विविध भागांतून हजारोंच्या संख्येने नागरिक मोटारसायकल रॅली,पदयात्रा काढत प्रशासकीय इमारतीसमोरील डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेसमोर एकत्र आले. येथे झालेल्या सभेतून सर्वाेच्च न्यायालय आणि केंद्र सरकारवर सडकून टीका करण्यात आली.विशेष म्हणजे शेजारी शेजारीच दोन मंडप तयार करुन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
अनुसूचित जातीसाठी असलेले आरक्षण देताना त्यात वर्गीकरण करण्याचा अधिकार राज्यांना असल्याचा महत्त्वपूर्ण निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला. हा निकाल देताना सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील सात सदस्यीय घटनापीठाने अनुसूचित जाती हा एकसंघ गट नसून त्यातील विविध जातींमध्ये विषमता असल्याचे निरीक्षण नोंदविले. सोबतच अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींमधील आरक्षणाचा लाभ योग्य घटकांपर्यंत पोहोचवण्यासाठी या वर्गातही ‘क्रीमिलेयर’ लावण्याची गरज असल्याचे मत सर्वोच्च न्यायालयाने दिले. याविरोधात दलित आणि आदिवासी संघटनांनी बुधवारी ‘भारत बंद’ची हाक दिली. सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निर्णय मागे घ्यावा, अशी मागणी होत आहे. या निर्णयामुळे अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींच्या घटनात्मक अधिकारांचे उल्लंघन होत असल्याचे तसेच ओबीसींची जातनिहाय जनगणना करुन त्यांनाही लावलेली क्रिमिलेयरची अट रद्द करण्यात यावे असे आरक्षण बचाव संघर्ष समितीचे म्हणणे आहे. या भारत बंदला भारतरत्न प.पु.डाॅ.बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्तस्व समिती,आदिवासी पिपल्स फेडरेशन,मुस्लीम मायनारिटी ट्रस्ट,ओबीसी संघर्ष कृती समिती,संंघर्ष वाहिनी,आर.टी.फाऊंडेशन,भारतीय बौध्द महासभा,समता सैनिक दल,चर्मकार महासंंघ,संविधान मैक्षा संघ, बहूजन समाज पार्टी, वंचित बहूजन आघाडी, भारत मुक्ती मोर्चा,गोंदिया जिल्हा काँग्रेस कमिटी,मुस्लीम जमात गोंदिया, ओबीसी अधिकार मंच,ओबीसी सेवा संघ,महात्मा फुले समता परिषद,ओबीसी जनमोर्चा,बहुजन युवा मंंच, यांच्यासह विविध दलित आणि आदिवासी ओबीसी संघटनांसह बहुतांश विरोधी पक्षांनी पाठिंबा दिला आहे.
अर्जुनी मोर. तालुक्यात कडकडीत बंद
अर्जुनी मोर.- सुप्रीम कोर्टाने 1 ऑगस्ट 2024 ला अनु. जाती ,अनुसूचित जमाती च्या विरोधात दिलेल्या संविधान विरोधी निर्णयाचे निषेधार्थ व अनुसूचित जाती-जमाती, ओबीसी, बहुजनांच्या हक्क अधिकारांसाठी आज संपुर्ण भारत बंद ची हाक देण्यात आली.त्यानुसार आज अर्जुनी मोर. तालुका कडकडीत बंद पाडण्यात आला.तर दुर्गा चौक ते तहशिल कार्यालयापर्यंत हजारोंच्या संख्येने अत्यंत शांततेत मोर्चा काढुन तहसिलदार अनिरुद्ध कांबळे यांना निवेदन देण्यात आले.तालुक्यातील केशोरी, महागाव, नवेगाव बांध इथेही बंद पाडण्यात आला. अर्जुनी मोरगाव शहरात सर्व व्यापारी बंधूंनी आपली प्रतिष्ठाने बंद ठेवून या भारत बंदला पाठिंबा देत कडकडीत बंद पाडला. सकाळी 11 वाजता अनुसूचित जाती- जमाती, आदिवासी गोवारी समाज ओबीसी समाज व इतर मागासवर्गीय समाजाचे लोक दुर्गा चौक अर्जुनी मोर येथे जमा झाले. त्यानंतर दुर्गा चौकातून विविध घोषणा देत हजारोच्या संख्येने मोर्चा शहारातील मुख्य मार्गावरून तहसील कार्यालयात नेण्यात आला. व त्या ठिकाणी अनेक मान्यवरांनी मोर्चाला मार्गदर्शन केले. व त्यानंतर तहसीलदारांना निवेदन सादर करण्यात आले.या मोर्च्यात अनुसूचित जाती-जमाती, ओबीसी,आदिवासी गोवारी,व ईतर मागासवर्गीय समाजातील महिला, पुरुष,व तरुण वर्ग हजारोच्या संख्येने सहभागी झाले होते.