सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात दलित,आदिवासी वओबीसी रस्त्यावर

0
301

देवरी,दि.२१:सर्वाेच्च न्यायालयाच्या अनुसूचित जाती आणि जमातीच्या आरक्षण उपवर्गीकरणाच्या निर्णयाविरोधात पुकारण्यात आलेल्या ‘भारत बंद’ला आज बुधवारी(दि.२१) देवरी तालुक्यात उत्फूर्त प्रतिसाद मिळाला. याप्रसंगी स्थानिक बौद्धविहार येथून रॅली काढून सांगता उपविभागीय कार्यालय येथे करण्यात आली. यावेळी भारताच्या राष्ट्रपतींच्या नावे एक निवेदन उपविभागीय अधिकारी यांना सोपविण्यात आले.

सर्वाेच्च न्यायालयाच्या अनुसूचित जाती आणि जमातीच्या आरक्षण उपवर्गीकरणाच्या निर्णयाविरोधात पुकारण्यात आलेल्या ‘भारत बंद’ला दलित,आदिवासी आणि ओबीसी संघटनांचा चांगलाच प्रतिसाद मिळाला. देवरी शहरासह संपूर्ण तालुक्यात व्यापारी संंघटनेने बंदला समर्थन जाहीर केल्याने बाजारपेठ सकाळपासूनच बंद होती. सकाळी दहा वाजतापासून तालुक्यातील  विविध भागांतून मोठ्या संख्येने नागरिक मोटारसायकल रॅली,पदयात्रा काढत स्थानिक बौद्धविहार परिसरात एकत्र आले. बौद्धविहारात जमलेल्या समुदायाने डॉ. आंबेडकर,क्रांतिसूर्य बिरसा मुंडा, महात्मा ज्योतिबा फुले आणि छत्रपती शाहू महाराजांच्या प्रतिमेला अभिवादन करून रॅलीची सुरवात करण्यात आली. ही रॅली शहरातील प्रमुख मार्गाने भ्रमण करीत उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालयावर धडकली. यानंतर मोर्च्याचे रुपांतर सभेत झाले. या सभेत प्रमुख वक्त्यांनी सर्वोच्च न्यायालयाचे निकाल सामाजात दुही निर्माण करून अनुसूचित जाती/ जमातीचे हक्क आणि अधिकार कसे संपूष्टात आणले आहे, यावर सविस्तर मार्गदर्शन केले.

अनुसूचित जातीसाठी असलेले आरक्षण देताना त्यात वर्गीकरण करण्याचा अधिकार राज्यांना असल्याचा महत्त्वपूर्ण निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला. हा निकाल देताना सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील सात सदस्यीय घटनापीठाने अनुसूचित जाती हा एकसंघ गट नसून त्यातील विविध जातींमध्ये विषमता असल्याचे निरीक्षण नोंदविले. सोबतच अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींमधील आरक्षणाचा लाभ योग्य घटकांपर्यंत पोहोचवण्यासाठी या वर्गातही ‘क्रीमिलेयर’ लावण्याची गरज असल्याचे मत सर्वोच्च न्यायालयाने दिले. याविरोधात दलित आणि आदिवासी संघटनांनी बुधवारी ‘भारत बंद’ची हाक दिली होती. सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निर्णय मागे घ्यावा, अशी प्रमुख मागणी होत आहे. ओबीसींची जातनिहाय जनगणना करुन त्यांनाही लावलेली क्रिमिलेयरची अट रद्द करण्यात यावी, असे आरक्षण बचाव संघर्ष समितीचे म्हणणे आहे.

या मोर्च्याला देवरीच्या उपविभागीय अधिकारी कविता गायकवाड ह्या सामोऱ्या गेल्या. यावेळी समाजिक एकता मंच, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि ओबीसी संघटनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपविभागीय अधिकारी यांना भेटलेल्या शिष्टमंडळात दिलीप जुळा, के. सी शहारे. आनंद सतदेवे, टी एम सलामे, कृष्णा ब्राम्हणकर यांचा समावेश होता.