वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे, वृक्षांना बांधू रक्षाबंधने…!

0
56

खांबी शाळेचा उपक्रम ‘वृक्षाबंधन-रक्षाबंधन’

बोंडगांव देवी,दि.२५:’वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे’, वृक्षांना बांधू रक्षाबंधने…! या जगतगुरू तुकोबाराया यांच्या अभंगातील संदेशाला अनुसरुन गेल्या शुक्रवारी (दि.२३) अर्जुनी मोरगांव तालुक्याच्या खांबी येथील जिल्हा परिषद वरीष्ठ प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी वृक्षांना राख्या बांधून वृक्षाबंधनाचा महोत्सव साजरा केला.

लोकपरंपरा आणि आपला सांस्कृतिक वारसा जपणे हे प्रत्येक मानवी संस्कृती जपणारे नागरिकांचे कर्तव्य आहे. असाच हा एक उत्सव रक्षाबंधन (राखी) आहे. मोठ्या आनंदाने बहीण ही भावाला ओवाळणी घालून रक्षाबंधन बांधून रक्षा करावी अशी मनोकामना करते. हा दृष्टांत ठेवून जिल्हा परिषद वरीष्ठ प्राथमिक शाळा खांबी येथील वर्ग पहिली ते सातवीच्या सर्व शिक्षक व विद्यार्थ्यांनी झाडांची म्हणजे वृक्षांची रक्षा करण्यासाठी रक्षाबंधने बांधली. वृक्षांची संवर्धन करावी, झाडे लावावी-झाडे जगवावी, वृक्षांची कत्तली होणार नाही. असेही याप्रसंगी सांगण्यात आले. सर्व वर्गाच्या विद्यार्थ्यांनी स्वतःमधील कला, कौशल्य अवगत करून, टाकाऊ पासून टिकाऊ वस्तू तयार करावे म्हणून रक्षाबंधन तयार केली गेले. यामध्ये तिरंगा राखी, पतंग, स्टोन, कार्टून स्माईल, धागा राखी, झेबू राखी, फ्लावर राखी, सर्कल राखी, मणी राखी, कागदी राखी, रिबन राखी, गुलाब फूल राखी अशाप्रकारे प्रत्येक वर्गांनी वर्ग शिक्षकांच्या मार्गदर्शनात तयार करून प्रदर्शन केले.

सदर उपक्रम राबविण्यासाठी शाळेतील मुख्याध्यापक भद्रावती काळसर्पे , शिक्षक नागपुरे, डाकराम बावणे, हटवार सर काशिवार मॅडम यांनी मेहनत घेतली असून ‘निसर्ग माझा सखा, करु वृक्ष-रक्षाबंधन’ ही संकल्पना शिक्षक अरविंद ऊके यांनी रोवली आणि उत्साहाने राबविण्यात आली. यावेळी शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा प्रियंकाताई खोटेले, उपाध्यक्ष राकेश कोसरे पोलीस पाटील नेमीचंद मेश्राम, प्राध्यापक घनश्याम भेंडारकर, शाळा समितीचे सदस्य घनश्याम लोणारे, प्रतिष्ठित नागरिक भगवान मेंढे, महेंद्र खोटेले, चुन्नीलाल लोणारे, सदानंद भोंडे, भुमेश्वरी खोटेले मॅडम शिक्षक वृंद नागपुरे, बावणे, हटवार, अरविंद ऊके सर काशिवार मॅडम व शाळेतील सर्व विद्यार्थी उपस्थित होते. जिल्हा परिषद वरीष्ठ प्राथमिक शाळा खांबी येथे मुलांनी स्वत: रक्षाबंधन तयार करुन शालेय परिसरातील वृक्षारोपण केलेल्या जगविलेल्या झाडांना वृक्षाबंधन बांधून रक्षाबंधन केले. यावेळी विद्यार्थ्यांनी वृक्षांची पुजा केली, गंध टिळा लावण्यात आले असून वृक्षांची ओवाळणी करण्यात आली. असे वृक्ष-रक्षाबंधन करण्यात आले. हा अनोखा सामाजिक बांधिलकी जोपासणारा व निसर्ग माझा सखा हे पाळतांना नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात आला.