राष्ट्रीय पशुधन अभियान योजनेंतर्गत कार्यशाळा संपन्न

0
4340

गोंदिया, दि.28 : राष्ट्रीय पशुधन अभियान योजनेअंतर्गत जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समिती सभागृहात 27 ऑगस्टला एक दिवशीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. कार्यशाळेचे उद्घाटन जिल्हाधिकारी प्रजित नायर यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी एम. मुरुगानंथम होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.तानाजी लोखंडे, जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ. जे.के.तिटमे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ.कांतीलाल पटले उपस्थित होते.

        यावेळी जिल्हाधिकारी प्रजित नायर, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी एम. मुरुगानंथम व अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.तानाजी लोखंडे यांनी कुक्कुट पालन, शेळी/मेंढी पालन, वराह पालन, पशु खाद्य व वैरण आदी योजनेचा लाभार्थ्यांना लाभ घेण्याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले.

         राष्ट्रीय पशुधन अभियान योजनेविषयी तांत्रिक मार्गदर्शन सहायक आयुक्त पशुसंवर्धन डॉ.संजय गायगवळी यांनी केले. सदर अभियानांतर्गत विविध उद्योगाबाबत प्रकल्प अहवाल तयार करण्याविषयी भुपेंद्र पुंडे यांनी मार्गदर्शन केले. शेळी/मेंढी पालन या विषयावर पशुवैद्यकीय महाविद्यालय नागपूर येथील सहायक प्राध्यापक डॉ.गिरीधर शेंडे यांनी सविस्तर मार्गदर्शन केले.

        या योजने अंतर्गत अनुदान हे 50 – 50 टक्के अशा दोन टप्प्यात देण्यात येते. अनुदानाचा 50 टक्क्याचा पहिला टप्पा हा केंद्र शासनाने प्रकल्प मंजूर केल्यावर, अर्जदाराने प्रकल्पाचे बांधकाम सुरु केल्यानंतर जिल्हा समितीचा तपासणी अहवाल प्राप्त झाल्यावर देण्यात येतो. अनुदानाचा 50 टक्क्याचा दुसरा व अंतिम टप्पा हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर व सर्व देयके सादर केल्यावर देण्यात येतो. प्रकल्पाकरीता सर्व प्रवर्गातील लाभार्थी लाभ घेण्यास पात्र असतील. सर्वांना अनुदानाची मर्यादा सारख्या प्रमाणात आहे. एक व्यक्ती एकापेक्षा जास्त प्रकल्पासाठी अर्ज करु शकतो. अर्जदाराने www.nlm.udyamimitra.in या पोर्टलवर अर्ज ऑनलाईन पध्दतीने भरणे आवश्यक आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली.

        कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ. जे.के.तिटमे यांनी केले. संचालन पशुधन विकास अधिकारी (विस्तार) डॉ. प्रकाश गंगापारी यांनी केले. कार्यक्रमास राष्ट्रीय पशुधन अभियान योजनेअंतर्गत अर्ज केलेले व लाभ घेण्यास इच्छुक शेतकरी व गोपालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांचे आभार सहायक आयुक्त पशुसंवर्धन डॉ. संजय गायगवळी यांनी मानले.