गोंदिया-शासकीय तसेच इतर विविध कामांसाठी जन्म आणि मृत्युचा दाखला आवश्यक असतो. यासाठी शासनाने आता जन्म आणि मृत्यूच्या प्रमाणपत्रासाठी महत्त्वाचे बदल केले आहेत. या दाखल्यासाठी आता २१ दिवसांच्या आत प्रमाणपत्र मिळणार असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.नितीन वानखेडे यांनी दिली आहे.
जन्म व मृत्यु सारख्या महत्वाच्या घटनाच्या नोंदणी ऑनलाईन dc.crsorgi.gov.in या पोर्टल वर करण्याच्या सुचना दिल्या. भविष्यात ज्या आरोग्य संस्था जसे जिल्हा रुग्णालये, ग्रामीण रुग्णालये,प्राथमिक आरोग्य केंद्र येथे बालकांचा जन्म होतो त्याच ठिकाणी तेथील वैद्यकिय अधिकारी यांना स्वतंत्र लॉगिन प्रणाली देण्यात आले असुन लोकांना जन्म व मृत्यु घटना झालेल्या ठिकाणी जन्म/मृत्युचे दाखले देण्याबाबत कार्यप्रणाली विकसित करण्यात आलेली आहे. तसेच आरोग्य संस्थेचे उपकेंद्र व रस्त्यात झालेल्या घटने साठी त्या कार्यक्षेत्रातील ग्रामपंचायती, नगरपरिषद, नगरपंचायती यांनी घटनेची ऑनलाईन नोंदणी करुन त्या घटनेचे प्रमाणपत्र देणे बंधनकारक आहे.
शाळेत दाखल करण्यासाठी मुलांना जन्म पुरावा महत्त्वाचा असतो.तसेच काही कारणांसाठी मृत्युचे प्रमाणपत्रही नातेवाइकांना लागते. याची नोंद होत असते. या दोन्ही प्रमाणपत्रांवर बऱ्याच गोष्टी अवलंबुन असतात. आता जन्म आणि मृत्यूच्या दाखल्यासाठी २१ दिवसांत प्रमाणपत्र दिले जाणार आहे.तसेच जन्म किवां मृत्यु घटना घडल्यानंतर उशिरा नोंदणी केल्यास त्याला निबधंकाद्वारे योग्य फीस आकारुन जन्म/मृत्यु प्रमाणपत्र दिले जाते.30 दिवसानंतर ते 1 वर्षाच्या आत लाभार्थीने नोंदणी केल्यास जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागामार्फत प्रमाणपत्राची सत्यता पडताळणीसाठी अधिकाऱ्यांची मंजुरी बंधनकारक असणार आहे.तर जन्म आणि मृत्यू प्रमाणपत्रांसाठी केंद्र शासनाच्या संकेतस्थळाचा वापर करण्यात येतो. संकेतस्थळावर काही बदल करण्यात आलेले आहेत. या प्रमाणपत्रांसाठी नागरिकांना घरबसल्या अर्ज करता येणार आहे.त्याचबरोबर प्रमाणपत्रही घरपोच मिळण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. जन्म-मृत्युची नोंदणी अधिनियम आणि त्याअंतर्गत तयार केलेल्या नियमानुसार जन्म-मृत्यूची नोंद करणे अनिवार्य आहे.
२१ दिवसांत नोंद करणे मोफत प्रमाणपत्रासाठी बंधनकारक…
जन्म आणि मृत्यूची नोंद घटनेच्या २१ दिवसांच्या आत करणे बंधनकारक करण्यात आलेले आहे. जन्म आणि मृत्यू घरी किंवा रुग्णालयात झाल्यास संबंधित ठिकाण कोठे आहे, त्यानुसार तेथील कार्यालयात ही नोंद करावी लागते.
२१ दिवसांनी अर्ज केला तर….
जन्म नोंदणी विलंब झाला तर वेगवेगळे शुल्क लागू होते. जर एखाद्याने ३० दिवसांनंतर आणि जन्माच्या एक वर्षाच्या आत जन्म प्रमाणपत्रासाठी अर्ज केला तर प्राधिकरणची लेखी परवानगी आणि नोटरी प्रतिज्ञापत्र आवश्यक असते.
कसा करायचा ऑनलाइन अर्ज…
- जन्म आणि मृत्यू नोंदणी ऑनलाईन dc.crsorgi.gov.in संकेतस्थळावर लॉगिन करणे. साईटवरून जन्म प्रमाणपत्र नोंदणी फॉर्म डाऊनलोड करणे. त्यानंतर प्रिंट मिळते. मुलाच्या जन्मानंतर २१ दिवसांच्या आत संबंधित तपशिलांसह फॉर्म योग्यरीत्या भरावा लागतो.
- तारीख, वेळ, जन्म ठिकाण, पालकांचा ओळखपत्र पुरावा, नर्सिंग होम आदीची पडताळणी केल्यानंतर प्रमाणपत्र जारी केले जाते.
ऑनलाइन करा नोंदणी…
हे प्रमाणपत्र बनविण्यासाठी शासनाने dc.crsorgi.gov.in हे संकेतस्थळ सुरु केलेले आहे. ज्यामध्ये देशातील कोणताही नागरिक जन्मदाखल्यासाठी अर्ज करू शकतो. तसेच मुलांचा जन्माचा दाखला या संकेतस्थळाद्वारे मिळवता येतो.यासाठी ऑनलाइन प्रक्रिया करणे महत्त्वाचे आहे.
ऑनलाइन स्पेलिंग बदल करता येणार…
- फक्त कुटुंबातील व्यक्तीनाच जन्म नोंदणीत दुरुस्ती करता येईल.
- आई-वडिलांचे नाव, आडनाव, पत्ता, आधार क्रमांक आदी तसेच स्पेलिंग दुरुस्ती ऑनलाइन पद्धतीने करता येणार आहे.