गोंदिया-गणेशोत्सव मंडळांकडून उत्सवाच्या कालावधीत विविध प्रकारचे उपक्रम हाती घेतले जातात.सामाजिक उपक्रमांसोबत किटकजन्य आजार जनजागृती उपक्रमांवर भर देण्याचे आवाहन जिल्हा हिवताप अधिकारी डॉ.विनोद चव्हाण यांनी जिल्ह्यातील गणेश मंडळाना केले आहे.
गोंदिया हा राज्यातील टोकावरचा आदिवासी व जंगलव्याप्त जिल्हा म्हणुन ओळखला जातो. गोंदिया जिल्हा हा भात शेतीसाठी प्रसिद्ध आहे.भात शेतीसाठी पाणीयुक्त चिखलची गरज भासते व तलावांचा जिल्हा म्हणून गोंदिया जिल्ह्याची वेगळीच ओळख आहे.तसेच जंगलव्याप्त भाग,घनदाट झाडी व झुडपे यामुळे डास व डास अळीसाठी पोषक वातावरण असते.जिल्ह्यात बाराही महिने हिवताप आजाराचे रुग्ण निघत असतात.त्यामुळे हिवतापाचा जर प्रसार रोखायचा असेल तर मच्छरांसोबत डास अळी सुद्धा नष्ट करणे गरजेचे बनलेले आहे.
जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्या असल्याने डासोत्पत्ती स्थानांमध्ये वाढ झाली आहे.त्यामुळे जिल्ह्यात कीटकजन्य आजाराचे प्रमाण वाढत असल्याचे दिसून येत आहे.कीटकजन्य आजार डेंग्यु, हिवताप, मेंदुज्वर व चिकुनगुनिया आजाराविषयी जनतेमध्ये व्यापक प्रमाणात जनजागृती होण्याच्या दृष्टीने जिल्ह्यातील गणेशोत्सव आयोजक मंडळ स्तरावरून शहर व गाव पातळीवर जनजागृती करण्यात यावी.जेणेकरून शहरी व ग्रामीण भागातील नागरिक उत्सवा दरम्यान गणेशजीनां वंदन व पूजा अर्चना करण्यात आल्यावर त्यांना कीटकजन्य आजाराबाबत माहिती मिळेल.तसेच किटकजन्य आजारावर नियंत्रण मिळवण्यास सहकार्य मिळेल.
शहरी भागाच्या गणेशोत्सव मंडळाकडे एलसीडी स्क्रीन उपलब्ध आहे त्या मंडळांनी संबंधित आजराबाबत व्हिडिओ चालवून जनजागृती करण्यात येण्याचे आवाहन जिल्हा हिवताप प्रशासनामार्फत करण्यात येत आहे.गणेश मंडळाने सामाजिक बांधिलकी म्हणून ऑडीओ, व्होडीओ सीडी गणपती मंडपात सुरू ठेवावी, तसेच मंडपात हिवताप,डेंग्यूपासून बचाव करण्यासाठी काय करता येईल, याची सविस्तर माहिती असलेला बॅनर लावावा, असे आवाहन करण्यात येत आहे.
वाढते शहरीकरण, जीवनशैलीतील बदल व सदोष जलव्यवस्थापन यामुळे डासांच्या उत्पत्तीचा वेग वाढत आहे.जिल्ह्यात हिवताप व डेंग्यूची तीव्रता वाढत असताना नागरिकांनी स्वत: खबरदारी घेणेही तितकेच गरजेचे आहे. आरोग्य विभाग तथा प्रशासन यावर अवलंबून राहण्यापेक्षा स्वयंस्फूर्तीने जलसाठय़ाची स्वच्छता राखण्याची खबरदारी घ्यावी, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.नितीन वानखेडे यांनी केले आहे. नागरिकांनी आपली नैतिक जबाबदारी म्हणून डेंग्यूचा फैलाव होऊ नये यासाठी परिसर स्वच्छतेकडे लक्ष देणे गरजेचे आहे.आरोग्य विभाग नागरिकांना आरोग्य सेवा देत आहे तरी पाणीसाठय़ाची ठिकाणे नष्ट करणे हे आपल्या हातात आहे. याखेरीस डासांनी चावा घेऊ नये यासाठी डासविरोधी मलम अंगाला लावणे, मच्छरदाणीचा वापर करणे, अंगभर कपडे घालणे, आठवड्यातुन एक दिवस कोरडा दिवस पाळणे आदी उपाय नक्कीच करता येतील. शिवाय वैयक्तिक, घराभोवतालची स्वच्छता ठेवल्यास डेंग्यू व अस्वच्छतेमुळे होणारे इतर अनेक आजार आपण टाळू शकत असल्याची माहिती सुद्धा दिली आहे.