‘स्वच्छ माझे अंगण’ उपक्रमांत सहभागी व्हा !: उत्कृष्ठ व्यवस्थापन करणाऱ्या कुटूंबाचा होणार सत्कार

0
1068

मुख्य कार्यकारी अधिकारी मुरूगानंथम एम. यांचे आवाहन :

गोंदिया, ता. 5 : कौटूंबिकस्तरावर नित्यनेमाने स्वच्छतेचा अंगीकार करून स्वच्छतेची लोकचळवळ निर्माण करण्यासाठी संपूर्ण जिल्हयात राज्यशासनाच्या आदेशान्वये पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग आणि ग्रामविकास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने ‘स्वच्छ माझे अंगण’ हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमांत जिल्हयातील सर्वच कुटूंबियांनी सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा परिषद गोंदियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी मुरूगानंथम एम. यांनी केले आहे.
स्वच्छ भारत मिशन ग्रामीण टप्पा दोन अंतर्गत जिल्हयातील सर्वच गावे हागणदारीमुक्त अधिक मॉडेल करावयाची आहेत. त्या अनुषंगाने ग्रामीण भागातील कुटूंबियांसाठी राज्यशासनाच्या निर्देशान्वये जिल्हा परिषद गोंदिया अंतर्गत एक सप्टेंबर ते 25 सप्टेंबर दरम्यान हा उपक्रम राबविण्यात येत आहे. कुटूंबस्तरावर वैयक्तीक स्वच्छता पाळणे आवश्यक आहे. त्यासाठी प्रत्येक कुटुंबाकडे वैयक्तीक शौचालय असावे. त्याचा नियमित वापर असावा. यासोबतच प्रत्येक कुटूंबाकडे सांडपाणी व्यवस्थापनाकरीता शोषखड्डा, परसबाग अथवा पाझरखड्डा असावा. घनकचरा व्यवस्थापनाकरीता कंपोस्ट खतखड्डा, अथवा घरगुती खत खड्डा आणि कुटूंबस्तरावर कचराकुंडयांची उपलब्धता असायला हवी. कुटूंबस्तरावर दैनंदिन घनकचऱ्याचे ओला आणि सुका असे वर्गीकरण करणे आवश्यक आहे. दरम्यान घरगुती खतखड्डा अथवा परसबाग, वैयक्तीक शोषखड्डा अथवा पाझरखड्डा, वैयक्तीक शौचालय आणि घरगुती कचराकुंडया असलेल्या तथा त्यांचा सुयोग्य वापर करणाऱ्या कुटूंबाची ग्रामपंचायतस्तरावर ग्रामपंचायत कार्यालयातील पाणी व स्वच्छता समिती मार्फत 26 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर दरम्यान पडताळणी करण्यात येणार असल्याची माहिती पाणीव स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी आनंदराव पिंगळे यांनी दिली. निकषाच्या अनुषंगाने ग्रामपंचायत कार्यालयाच्या सूचना फलकावर निवड केलेल्या कुटूंबाची यादी प्रसिध्द करून त्यांना राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीदिनी 2 ऑक्टोबर रोजी आयोजित ग्रामसभेत प्रशस्तीपत्र देवून गौरविण्याचे निर्देश ग्रामपंचायतींना देण्यात आले असल्याचेही त्यांनी सांगितले.
गावांत दवंडी द्या
अभियानाचा कालावधी हा 1 सप्टेंबर ते 25 सप्टेंबर असा आहे. 26 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर दरम्यान कुटूंबाची पडताळणी करण्यात येणार आहे. त्यानंतर पात्र कुटुंबाची यादी ग्रामपंचायत कार्यालयात प्रसिध्द करण्यात येईल. दरम्यान 1 ऑक्टोबर रोजी पात्र कुटुंबाना लेखी निमंत्रण देवून 2 ऑक्टोबरच्या ग्रामसभेत त्यांचा प्रशस्तीपत्र देवून सत्कार करण्यात येणार आहे. उपक्रमांच्या माहितीसाठी गावांत दवडी द्यावी, तथा ग्रामपंचायत कार्यालय, शाळा, अंगणवाडी, प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र, सोसायटी कार्यालय, तलाठी सज्जा याठीकाणात उपक्रमांची सूचना सूचना फलकावर लावण्यात यावी.