रतनारा येथे स्वमर्जीनेच सरपंचाने केला सिमेंट रस्ता,तर विजचोरीतून महिला बचत भवनाचे बांधकाम

0
968
वाढदिवसाच्या शुभेच्छा

गोंदिया,दि.१५ः-तालुक्यातील रतनारा येथे ग्रामपंचायतीच्यावतीने एका सिमेंट रस्त्याचे बांधकाम करण्यात आलेले आहे.त्या सिमेंट रस्त्याचे कार्यारंभ आदेश अद्याप निघालेले नसून १५ व्या वित्त आयोगाच्या निधीतून सदर रस्ता बांधकाम करण्याचे फक्त ठरविलेले असताना सरपंच सतिश दमाहे यांनी ग्रामपंचायतीच्या पदाधिकार्यांना विश्वासात न घेताच स्वमर्जीनेच एक आठवड्यापुर्वीच बांधकाम केल्याचे दिसून आले.त्यामध्ये सदर रस्त्याचे बांधकाम करतांना मोजमापाकडेही दुर्लक्ष करण्यात आले असून गुणवत्तेवरही शंका उपस्थित करण्यात आली आहे.

महिलाबचत भवनाच्या बांंधकामात विजचोरीचा वापर करण्यात येत असल्याचे हे व्हिडीओचित्रण

महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना व स्थानिक आमदार यांच्या निधीतून तयार करण्यात आलेल्या अभिसरण योजनेतून  ग्रामपंचायतीच्यावतीने पाणी टाकीजवळच महिला बचत गटाकरीता सुमारे २५ लाख रुपये किमतीच्या महिला बचत भवनाचे बांधकाम सुरु करण्यात आले आहे.मात्र सदर बांंधकामाकडे लक्ष दिल्यास १२-१५ लाख रुपयातच सदर बांधकाम होत असल्याची चर्चा असून आज १५ सप्टेंबर रोजी या महिला बचत भवनाच्या कामावर विद्युत विभागाकडून कुठलीही परवानगी न घेता आकडा घालून विजचोरी करुन त्या चोरीच्या विजेचा वापर करीत काम करण्यात आल्याचेही बघावयास मिळाले.या बांधकामाच्या देखऱेखीकडे मग्रारोहयो अभियंतासह जिल्हा परिषदेच्या अभियंत्याचेही दुर्लक्ष स्पष्टपणे दिसून येत असून वीज विभागाने तत्काळ याप्रकरणात कंत्राटदारासह अभियंत्यावरही गुन्हा दाखल करायला हवे. या दोन्ही कामाच्या संदर्भात रतनारा येथील सरपंच सतिश दमाहे यांंच्या भ्रमणध्वनीवर अनेकदा संपर्क केला असता त्यांनी  प्रतिसाद दिला नाही.

तर ग्रामसेवक जी.एस.ठाकूर यांना विचारणा केली असता सिमेंट रस्त्याचे नियोजन १५ व्या वित्त आयोगात आहे,मात्र काम सुरु करण्यासंदर्भात कुठलीच प्रकिया झालेली नसून सरपंचानी स्वतःच काम केल्याचे सांगितले.