टी-९’ वाघ पाठोपाठ ‘टी-४’ वाघिणीचा बछडा आढळला मृतावस्थेत

0
1063
वाढदिवसाच्या शुभेच्छा

गोंदिया,दि.२३ : नागझिरा अभयारण्यात सलग दुसऱ्या दिवशी आणखी एका वाघाचा मृतदेह आढळल्याने नवेगाव नागझिरा व्याघ्रप्रकल्प प्रशासनाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत.नागझिराचा राजा अशी ओळख असणारा ‘टी-९’ हा वाघ काल रविवारला मृतावस्थेत सापडला होता. तर आज सोमवारला सकाळी ‘टी-४’ या वाघिणीचा बछडा मृतावस्थेत सापडल्याने खळबळ उडाली आहे.नागझिरा अभयारण्यांतर्गत सहवनक्षेत्र नागझिरा संकुल, नियत क्षेत्र नागझिरा एक, कक्ष क्र. ९६ मधील मंगेझरी रोड नागदेव पहाडी परिसरात बिटरक्षक गस्तीवर असतांना साधारणतः सकाळी दहा वाजताच्या सुमारास एक नर वाघ अंदाजे वय वर्षे नऊ ते दहा मृत अवस्थेत दिसून आला.

घटनेची माहिती मिळताच उपवनसंरक्षक जयरामे गौडा, उपसंचालक राहूल गवई, सहाय्यक वनसंरक्षक एम.एस. चव्हाण, वनपरिक्षेत्र अधिकारी व्ही. एम. भोसले घटनास्थळी दाखल झाले. राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाच्या प्रमाणभूत कार्यपध्दतीनुसार गठीत समितीद्वारे घटनास्थळ परिसराची पाहणी करण्यात आली. या समितीमध्ये मानद वन्यजीव रक्षक सावन बहेकार, मानद वन्यजीव रक्षक रुपेश निंबरते, छत्रपाल चौधरी उपस्थित होते. पशुवैद्यकीय अधिकारी डॉ शितल वानखेडे, डॉ सौरभ कबते, डॉ. समिर शेंदरे, डॉ. उज्वल बावनथडे वाघाचे शवविच्छेदन केले.

बाजीराव हा मूळ ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पाच्या कोळसा वन परीक्षेत्रातील वाघ होता. डिसेंबर- २०१६ मध्ये हा वाघ ताडोबावरून वाघांच्या नियमित नैसर्गिक भ्रमण मार्गाने नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पाच्या नागझिरा जंगलात स्थलांतर करून आला होता. तब्बल नऊ वर्ष त्याने या जंगलावर आपले अधिराज्य गाजवले.

गेल्या दोन दिवसापासून नागझिरा व्याघ्रप्रकल्पाच्या कार्यक्षेत्रात वाघांचा मृत्यू होत असतानाही या विभागाने स्वतःच तयार केलेल्या व्हाटसअप गृपवर पत्रकारांना माहिती देण्याचे सातत्याने टाळले आहे.त्यामुळे एनएनटीआर प्रकल्पाचे  अधिकारी हे प्रसारमाध्यमांना जाणिवपूर्वक टाळत असल्याचे दिसून येत आहे.