अर्जुनी मोरगांव- पोलीस ठाण्या अंतर्गत बाक्टी या गावामध्ये गेल्या ५० वर्षापासून सर्रासपणे दारू विक्री केली जाते आहे. येथील अवैध मोहफुलाची दारू परिसरात,तालुक्यात व शेजारील तालुक्याबरोबर जिल्ह्यात प्रसिद्ध आहे. येथील हातभट्टीची दारू विक्री बंद करण्याचा प्रयत्न पोलिसांनी अनेकदा केला. परंतु येथील अवैध दारू विक्री (Alcohol sales) बंद झाली नाही. हे येथे उल्लेखनीय आहे.
त्यामुळे बाकटी येथील अवैध मोहफुलाची व आता काही प्रमाणात देशी दारू विक्रीला आळा घालणे हे पोलीसांसमोर एक मोठे आव्हानच आहे.दिनांक २१ सप्टेंबर २०२४ रोजी बाकटी येथील तरुणांनी पुढाकार घेऊन काही झाले तरी गावची अवैध दारू विक्री बंद करायची या निर्धाराने अर्जुनी मोर पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक कमलेश सोनटक्के यांना निवेदन दिले आहे. बाकटी या गावात दिवसेंदिवस दारू विक्रेत्यांची संख्यादेखील वाढत चालली आहे. असा गंभीर प्रश्न असतांना देखील पोलीस प्रशासन दुर्लक्ष करीत आहे. असा आरोपही गावकरी करीत आहेत.
अनेकदा कारवाई करून सुद्धा अवैध दारू विक्रीवर चाप बसत नाही. त्यामुळे पोलीस प्रशासनही हवालदिल झाले आहे. आज पर्यंत फक्त प्रौढ मंडळीच या व्यसनाच्या आहारी गेली होती. पण आज चित्र बदलत आहे. गावात मुबलक प्रमाणात व सहज दारू उपलब्ध होत असल्यामुळे, अल्पवयीन वयोगटातील मुले या व्यसनाच्या आहारी जात आहेत.
गावातील कायदा व सुव्यवस्थेचा मोठा प्रश्न निर्माण होत चालला आहे
त्यामुळे गावात भांडणतंट्याचे प्रमाण वाढत चालले आहे. गावातील कायदा व सुव्यवस्थेचा मोठा प्रश्न निर्माण होत चालला आहे. तसेच गावातील लोकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होवून दारूमुळे मरणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. तरी वरिल सर्व समस्यांचा गांभीर्याने विचार करून अर्जुनी मोर पोलीस ठाण्यातंर्गत बाक्टी या गावातील पिढयानपिढ्या चालत आलेल्या या अवैद्य दारू विक्रीचा समुळ बंदोबस्त करावा. गावातील या दारूच्या अवैद्य गोरखधंदयामुळे पिडीत असलेल्या महिलांना व शिक्षणातील मुलांना न्याय द्यावा.अशी गावकऱ्यांची मागणी आहे. पूर्णपणे गावातून दारू हद्दपार झाली पाहिजे. याकरिता गावातील काही तरुण मंडळींनी शनिवारी अर्जुनी मोर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक कमलेश सोनटक्के यांना निवेदन दिले आणि यावेळी त्यांनी पूर्णपणे गावात दारू बंद करू.असे आश्वासन दिले. निवेदन देतांना रुपेश मेश्राम, प्रविण सांगोळे, गुलशन सांगोळे, अक्षय सांगोळे, शुभम मेश्राम, सचिन बोरकर, शशिकांत सांगोळे, एड.सुरज रंगारी हे उपस्थित होते.