अर्जुनी मोर.-तालुक्यातील सामाजीक कार्यकर्ते तथा वरिष्ठ पत्रकार अमरचंद ठवरे यांच्या सामाजीक कार्यातुन पहांदी पारो कुपार लिंगो बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने अर्जुनी मोर. तालुक्यातील अनाथ मुलांना अन्नधान्य व जीवनावश्यक वस्तुचे वाटप मिंलींद बुध्द विहार बोंडगावदेवी च्या प्रांगणात ता.22 रोजी अर्जुनी मोरचे तहसिलदार अनिरुद्ध कांबळे यांचे हस्ते करण्यात आले.
या समाजशिल उपक्रमाला सामाजीक कार्यकर्त्या प्रा.डाॅ. सविता बेदरकर ,समाजशिल शिक्षक अनिल मेश्राम, तलाठी भगवान नंदागवळी,धनेंद्र भुरले, सुनिता भेलावे, पत्रकार अमरचंद ठवरे, सुनिल सांगोळकर, व इतर मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी अर्जुनी मोर तालुक्यातील 30 अनाथ मुलांना वेळोवेळी सर्वोतोपरी मदतीचा हात मिळावा म्हणून अमरचंद ठवरे हे सातत्याने प्रयत्न करीत असतात.त्यासाठी जिल्ह्यातील दानदाते सुध्दा मोठ्या प्रमाणात मदत करीत असतात.22 सप्टेंबर ला मिंलींद बुध्द विहारात तालुक्यातील अनाथ मुलांना मदतीचे वाटप करण्यात आले. यामधे बोंडगावदेवी, निमगाव, बाकटी, वडेगाव रेल्वे, ताडगाव, खामखुरा, मांडोखाल, येथील अनाथ व निराधार बालकांना अन्नधान्य व जीवनावश्यक वस्तुचे वाटप करण्यात आले.
यावेळी अर्जुनी मोरगाव चे तहसीलदार अनिरुद्ध कांबळे म्हणाले की जीवन जगत असताना स्वतःच्या परिस्थितीची लाज वाटता कामा नये. आपल्याकडे आहे त्यातच समाधानी राहून प्रबळ इच्छा शक्ती सदोदित कायम ठेवावी. जन्मदात्या मायबापांचे छत्र हिरावलेल्या निरागस मुलांनी एकटेपणाची भावना ठेवू नये. जिद्द चिकाटी कसोटी तसेच प्रबळ आत्मविश्वास अंगी बाळगूनच प्रतिकूल परिस्थितीवर मात करून प्रगतीचे शिखर गाठणे सहज शक्य आहे. यशाची शिखर गाठण्यासाठी खडतड प्रवास करावाच लागतो. प्रबळ इच्छाशक्तीने जीवनाचे सार्थक करा असे आवाहन केले.
अनाथांना पालकत्वाची जोड द्या
इतरत्र वारेमाप पैसा उधळण्यापेक्षा जन्मदात्यांना हिरावून बसलेल्या निरागस अनाथ मुलांना पालकत्वाची जोड देणे गरजेचे आहे. स्वतःसाठी प्रत्येक जण जगतो परंतु इतरांसाठी जगण्यातच खरी महानता आहे. अनाथ मुलांचे भाग्य घडविण्यासाठी दानदात्यांनी पुढे येणे ही काळाची गरज आहे. असे मत जेष्ठ सामाजिक कार्यकर्त्या सविता बेदरकर यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाचे संचालन अमरचंद ठवरे यांनी केले. प्रास्ताविक सविता बेदरकर यांनी केले. तर आभार भगवान नंदागवळी यांनी मानले. कार्यक्रमासाठी कपिल सुखदेवे, निलेश मेश्राम, राजू ठवरे, अशोक रामटेके, जयंत ठवरे, केवळ भैसारे, लता ठवरे, निशा लोणारे ,शितल ठवरे, जितेंद्र मेश्राम, मारुती रामटेके, दिगंबर रामटेके यांनी विशेष सहकार्य केले.